#यूथटॉक : परदेशात शिक्षणाचे धडे गिरविताना...

Education
Education

लहानपणापासूनच मला परदेश आणि परदेशी लोकांविषयी आकर्षण आहे. कमी काळात प्रगतीची शिखरं परदेशी लोकच का काबीज करतात? संशोधनाची सर्व पेटंट परदेशी लोकांकडेच का आहेत? असे एक ना अनेक प्रश्‍न माझ्या मनात होते आणि म्हणूनच बारावीनंतर ठरवून परदेशी विद्यापीठात प्रवेश घ्यायचं ठरवलं. सुदैवानं चांगले गुण असल्यानं कुठलीही प्रवेश परीक्षा न देता सरळ मुलाखत होऊन ब्रिटनमधील ऑक्‍सफर्ड ब्रुक्‍स युनिव्हर्सिटीत प्रवेश मिळाला. मॅनेजमेंट हा आवडीचा विषय असल्यानं मी त्यात ग्रॅज्युएशन करायचं ठरवलं आणि आता एक वर्ष पूर्ण झालंय. 

हे करीत असताना सर्वसामान्य भारतीय विद्यार्थ्यांना परदेशी विद्यापीठांमध्ये शिक्षण घेताना ज्या अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं, त्याचा ऊहापोह इथं करावासा वाटतो. परदेशात शिक्षण घेताना सर्वांत महत्त्वाचं आव्हान असतं ते भाषेचं. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलंच पाहिजे. इंग्रजी चांगलं लिहिता-बोलता आल्याशिवाय या विद्यापीठांमध्ये चांगल्या प्रकारे टिकाव धरता येत नाही. साधारणतः आपल्याकडील शिक्षण पद्धतीत बोलणं आणि लिहिणं यापैकी बोलण्यावर भर असतो. बरेच जण इंग्रजी चांगलं बोलू शकतात. पण, लिहिताना त्यांना जड जातं. त्यामुळे ज्यांना मोठ्या विद्यापीठात शिक्षण घेण्याची इच्छा आहे, त्यांनी भाषा विषयाकडे लिहिणं, बोलणं या दोन्ही बाबींकडे आवर्जून लक्ष द्यावं.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा असतो खर्चाचा! परदेशातला खर्च थोडा जास्त असतो. साधारणपणे आपण मध्यमवर्गीय लोक इतर बाबींवर खर्च करतो. पण, शाळेची फी भरताना ती आपल्याला नेहमीच जास्त वाटते. पण, शिक्षण ही आवश्‍यक बाब आहे आणि त्यावर खर्च केलाच पाहिजे, ही मानसिकता तयार झाली पाहिजे. तो खर्च न मानता ती गुंतवणूक मानली, तर त्यातून भविष्यात भरघोस परतावा मिळू शकतो, या बाबीचा विचार केला पाहिजे. आता शिक्षणाकरिता अर्थसाह्यासाठी अनेक बॅंका तयार असतात, त्यांचीही मदत घेता येईल. 

आणखी एक मुद्दा म्हणजे आपल्याकडील जेवण आणि परदेशातील जेवण, यात मोठा फरक असतो. आपण तिखट, गोड, तेलातील पदार्थ मनसोक्त खातो. पण, परदेशी नागरिक खाण्याच्या बाबतीत काटेकोर असतात. त्यामुळेच तिथं मिळणारे खाद्यपदार्थ शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीनं चांगले असले, तरी आपल्या जिभेला न आवडणारे असतात. परिणामी, बऱ्याच जणांचे खाण्याचे हाल होऊ शकतात. ज्यांना स्वयंपाक बनवता येतो, ते विद्यार्थी थोड्याफार प्रमाणात ऍडजस्ट करू शकतात.

याशिवाय, आणखी एक मुद्दा महत्त्वाचा ठरतो; तो सांस्कृतिक बदलाचा. आपली संस्कृती आणि पाश्‍चात्त्य संस्कृती यात खूप फरक आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थी आले, की ते येथील खुल्या संस्कृतीच्या प्रेमात पडू शकतात. नाइट क्‍लब, दारू, सिगारेटचा खुला संचार, अशा एक ना अनेक बाबी विद्यार्थ्यांना आपल्याकडे खेचत असतात. पण, या बाबी आर्थिकदृष्ट्या न परवडणाऱ्या आणि चुकीच्या मार्गाकडे नेणाऱ्या असतात. तेव्हा विद्यार्थ्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. 

भारतातील शिक्षण पद्धतीत आपल्याकडून सर्व करून घेतलं जातं. शिक्षक शाळेत आणि खासगी शिकवण्यांमधून विद्यार्थ्यांकडून सर्व अभ्यास करवून घेतात. ती सवय भारतीय विद्यार्थ्यांना असते. पण, परदेशी विद्यापीठांमध्ये स्वयं-अध्ययनावर भर असतो. काही भाग शिकवणं व बाकी विद्यार्थ्यांनी स्वतः चर्चेतून, स्वयंअध्ययनातून शिकणं अपेक्षित असतं. त्यात बरेचदा विद्यार्थी मागं पडतात. आपल्याला कुणी 'अभ्यास कर,' असं म्हणायला नसल्यानं इथं अभ्यासच नाही, असं बहुतेकांना वाटतं.

परिणामी, वेगवेगळ्या माध्यमांद्वारे स्वतःला अधिक प्रगल्भ करण्यात भारतीय विद्यार्थी मागं पडू शकतो. आणखी एक बाब म्हणजे फावल्या वेळात पार्टटाइम नोकरी करून विद्यार्थी आर्थिक अडचणी दूर करू शकतात. त्यासाठी नियमानुसार अर्ज करून, कागदपत्रांची पूर्तता करून नोकरी मिळू शकते. पण, हे सर्व करताना आपल्या करिअरचा फोकस अन्यत्र कुठं वळणार नाही, याची काळजी मात्र घ्यावी लागेल. 

एकंदरीतच, भरपूर नवनवीन संधी मिळवायच्या असतील, काहीतरी वेगळं करिअर करायचं असेल आणि 'ग्लोबलाइज' व्हायचं असेल, तर परदेशी विद्यापीठांमध्ये नक्कीच शिक्षण घ्यायला हरकत नाही. 

(लेखक ऑक्‍सफर्ड ब्रुक्‍स युनिव्हर्सिटीत पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com