पत्रकारितेतले भीष्माचार्य

Dinu-Randive
Dinu-Randive

चळवळीतून पुढे येऊन पत्रकार झालेल्या दिनू रणदिवे यांच्यात चळवळ्या कार्यकर्त्याची ऐट अखेरपर्यंत कायम होती. या व्रतस्थ पत्रकाराला वाहिलेली श्रद्धांजली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनू रणदिवे हे वार्धक्‍याने गेले, हे शास्त्रीयदृष्ट्या खरं असलं; तरी ते वय झालं म्हणून गेले, यावर माझा विश्वास नाही. बरोबर महिनाभरापूर्वी १६ मे रोजी त्यांच्या पत्नी सविता रणदिवे गेल्या. त्यानंतर बरोब्बर एका महिन्याच्या अंतराने दिनू रणदिवे गेले. सविताकाकू गेल्यानंतर महिनाभराचा कालावधीही काढणं रणदिवेंसाठी कष्टप्रद होतं. सविताकाकू सोबत नाही, हे वास्तव जिवंत राहून स्वीकारणं त्यांच्यासाठी अशक्‍य होतं. सविताकाकू आणि दिनूकाका एकमेकांच्या डोळ्यांत पाहून जगतात... असं आम्ही त्यांना नेहमी चिडवायचो; पण ते इतकं खरं ठरेल, असं कधीच वाटलं नव्हतं. 

दिनू रणदिवे म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीचा, तसेच मुंबई शहरात घडलेल्या स्थित्यंतराचा जणू चालताबोलता इतिहास. त्यामुळे ते आमच्यासारख्या नव्या पिढीच्या पत्रकारांसाठी मोठा आधार होता. पण त्याही पलीकडे रणदिवे दाम्पत्याने मला त्यांच्या कुटुंबात सहभागी करून घेतल्याने त्यांना जवळून पाहता आले.. तो इतिहास त्यांच्या तोंडून ऐकता आला. रणदिवे हे रॉयवादी विचारांचे होते. अखेरपर्यंत ते आपल्या विचारांशी बांधील राहिले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ते अग्रणी होते. साठच्या दशकात केवळ ९० रुपयांच्या भांडवलावर संयुक्त महाराष्ट्र पत्रिका सुरू करणं, ती रस्त्यावर उभं राहून विकणं आणि तुरुंगवास भोगणं हे सगळं विलक्षण होतं.

पत्रकारितेचा उपयोग वैयक्तिक लाभासाठी त्यांनी कधीही केला नाही. कॉम्रेड डांगे, आचार्य अत्रे, मधू लिमयेंपासून बाळासाहेब ठाकरेंपर्यंत अनेकांशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. साधनशुचितेचे पालन करणाऱ्या मोजक्‍या पत्रकारांपैकी ते एक होते. चळवळीतून पुढे येऊन ते पत्रकार झाले, मात्र चळवळ्या कार्यकर्त्याची ऐट त्यांच्यात अखेरपर्यंत कायम होती. पत्रकारांच्या हक्कांसाठी त्यांचा हा स्वभाव कामी आला. १९८५ मध्ये मुंबईत पत्रकारांचे आंदोलन सुरू होते. आंदोलकांपुढं भाषण करत असताना त्यांच्यावर गुंडांकरवी हल्ला करण्यात आला. त्या हल्ल्याला न जुमानता त्यांनी आपलं भाषण पूर्ण केलं होतं.  पत्रकार म्हणून रणदिवे अनेक घटना घडामोडींचे साक्षीदार होते. बांगलादेश मुक्ती लढा कव्हर करताना चितगावपर्यंत ते पायी गेले. चीनने हुसकावून लावल्यानंतर दलाई लामा यांना भारत सरकारने धर्मशाला येथे शरण दिल्याची आंतरराष्ट्रीय बातमी सर्वप्रथम मराठी वर्तमानपत्रात दिनू रणदिवेंमुळे येऊ शकली होती. बातमी शोधण्याचे रणदिवेंचं कसब वेगळं होतं. त्यांच्याकडून ऐकलेल्या दोन घटनांचा उल्लेख इथे करते.

मुंबई महापालिका कव्हर करत असताना रणदिवेंना एक व्यक्ती इमारतीच्या कोपऱ्यात अंग चोरून उभी असल्याचं दिसलं. सहज चौकशी केली असताना त्याने रणदिवेंना सांगितलं की त्याचं चार महिन्यांचं बाळ गेलं आहे आणि शिवडीच्या स्मशानभूमीत लहान मुलांना पुरण्याच्या जागेत बाळाला दफन करता आले नाही. मी दलित असल्याने बाळाला दूर पुरायला सांगितलं आहे. परंतु पावसाळा असल्याने त्या जागेत खूप पाणी होतं. पाणी काढून टाकलं, कोरडी मातीही टाकली, पण पाणी होतंच ना... आमच्या बाळाला ओलसर जागी झोपवलं... त्याला सर्दी होईल.. एवढं सांगून तो माणूस ओक्‍साबोक्‍सी रडू लागला. याविषयावर रणदिवेंनी तपशीलवार बातमी केली. दुसऱ्या दिवशी ती वर्तमानापत्रात छापून आली. मुंबईत स्मशानभूमीत दलितांना कशी सापत्न वागणूक  दिली जाते, अशी ती बातमी होती. त्याचवेळी विधानसभेचे अधिवेशन सुरू असल्याने या विषयावर चर्चा झाली आणि यानंतर मुंबईसह राज्यात दलितांसाठी स्वतंत्र अशी स्माशानभूमी असणार नाही, असा सरकारने आदेश काढला. रणदिवेंची पत्रकारिता अशी होती. 

रणदिवे हे कायमचे ‘अस्वस्थ’ बातमीदार होते. त्यांची दृष्टी सतत बातमी शोधत असे. ऐंशीच्या दशकात मुंबईत हाडं गोठविणारी थंडी पडली होती. साहजिकच अशा थंडीत मुंबईत फुटपाथवर राहणारे लोक कसे राहत असतील, हा प्रश्न त्यांच्या मनात आला.

फुटपाथवरील लोकांचे हाल जाणण्यासाठी आपण आज चालत घरी जाऊ, अशी आकर्षक ‘ऑफर’ रणदिवेंनी न्यूज रुममध्ये आपल्या सहकाऱ्यांना दिली. तेव्हा तीन-चार जण तयार झाले. परंतु नेमकी वेळ आल्यानंतर मात्र सगळे ऐनवेळी पसार झाले. रणदिवे ‘सीएसटी’हून दादरपर्यंत पायी चालत गेले होते. रात्री १२ ला सुरू केलेला प्रवास दादरला पहाटे ५ वाजता संपला होता. रणदिवेंनी रात्रभरातील पायी प्रवासादरम्यान रस्त्यावरील हातगाडीवाले, चहावाले, भिकारी यांच्याशी भरपूर गप्पा मारल्या. या प्रवासात रणदिवेंच्या पायाला कुत्रा चावला होता. मागील एक महिना सोडला तर रणदिवेंची बुद्धी अखेरपर्यंत तल्लख होती. इतकेच काय महिनाभरापूर्वी सविता रणदिवे गेल्यानंतर ‘व्हॉट्‌सअप’वर त्यांच्याविषयीची बातमी टाइप करत होते. त्यांना तसं सांगितल्यावर त्यांनी इंट्रोसह बातमीचा मजकूर डिक्‍टेट केला होता. त्यांच्यातला बातमीदार कायम जागा असे.

लॉकडाउन जाहीर केल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मार्च महिन्यात रणदिवेंच्या घरी भेट दिली होती.

त्यांच्यासोबत झालेल्या गप्पांमध्येही रणदिवेंनी त्यांना लॉकडाउनचा फायदा होईल असे वाटतंय का... हातावर पोट असणाऱ्या गरिबांचे काय असे प्रश्न उपस्थित केले होते. शेवटपर्यंत रणदिवेंमधील पत्रकार हा असा जागता होता. भवतालच्या घटना, त्यांचे परिणाम याकडे पत्रकारांनी कसं पाहावं, याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com