नियमांच्या पायावर इमारतींची सुरक्षा

धैर्यशील खैरेपाटील
Friday, 4 September 2020

कोणत्याही इमारतीचा आराखडा, ‘आरसीसी’चे काम आणि इतर बांधकाम तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने केल्यास आणि बांधकाम साहित्याच्या दर्जामध्ये तडजोड न केल्यास इमारत दीर्घकाळ सर्व दृष्टीने भक्कम राहू शकते. त्यासाठी संबंधित सर्वच घटकांनी आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडली पाहिजे

कोणत्याही इमारतीचा आराखडा, ‘आरसीसी’चे काम आणि इतर बांधकाम तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने केल्यास आणि बांधकाम साहित्याच्या दर्जामध्ये तडजोड न केल्यास इमारत दीर्घकाळ सर्व दृष्टीने भक्कम राहू शकते. त्यासाठी संबंधित सर्वच घटकांनी आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडली पाहिजे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या काही दशकांमध्ये महाराष्ट्रातील शहरीकरणाचा प्रवास तालुका पातळीपासून मेगासिटीपर्यंत वेगाने होत आहे. शहरीकरणाच्या या प्रक्रियेत दोन- तीन मजली इमारतींपासून गगनचुंबी इमारती बांधण्याचा कल दिसून येतो. सर्वसाधारणपणे एखादी रहिवासी इमारत बांधताना अनेक यंत्रणा जसे की बिल्डर/विकसक, आर्किटेक्‍ट, स्टक्‍चरल कन्सल्टंट, बांधकाम कंत्राटदार, साईट इंजिनियर इत्यादींचा सहभाग सुरुवातीपासून इमारत पूर्ण होईपर्यंत असतो. या यंत्रणांनी सर्व नियम पाळून योग्यप्रकारे इमारत बांधल्यास ती अनेक वर्षे सक्षम राहते. गेल्या काही काळातील इमारत दुर्घटनांचे प्रमाण चिंताजनक आहे.त्याविषयी गांभीर्याने विचार करावा लागेल.
 त्यादृष्टीने पुढील मुद्दे विचारात घ्यावे लागतील.

1) इमारतीचा पाया खचणे 
इमारतीचा पाया मजबूत, योग्य व खोल भूभागावर घेतला जातो. बऱ्याचदा भूगर्भविशारदाची मदत न घेता व कमी भाराच्या भूभागावर पाया घातल्यास तो खचून इमारतीस धोका निर्माण होतो. खड्ड्यात किंवा खोलगट भागात भर टाकून इमारत बांधणे धोकादायक असते. अशा वेळी भूगर्भविशारदाकडून माती परीक्षण करून घेणे महत्त्वाचे. भूगर्भविशारद जमिनीखालील भूभागाचे नमुने घेऊन त्याची चाचणी करून जमिनीची भारधारण क्षमता, भूगर्भातील पाण्याची पातळी, खोदाईची पद्धत व त्यासाठी लागणारा पाया याबाबत मार्गदर्शन करतो. भूगर्भविशारदाचा सल्ला घेण्याविषयी या क्षेत्रात जागृती दिसत नाही. 

2) इमारत बांधकाम साहित्य 
इमारतीचा आरसीसी सांगाडा जेवढा मजबूत तेवढी इमारत सर्वप्रकारचा नैसर्गिक भार पेलण्यास योग्य असते. इमारत बांधताना स्टीलची बचत याला फार महत्व असते. पण आरसीसी सांगाडयासाठी लागणाऱ्या योग्य दर्जाच्या साहित्याबाबत हात आखडता घेतला जातो. हे साहित्य कमी दर्जाचे असल्यास इमारतीवर येणारा भार पेलणारे भारवाहक घटक प्रसंगी वाकतात/ तुटतात. बांधकाम सुरू होण्याअगोदर वापरावयाच्या साहित्याची तपासणी जसे की काँक्रिट व स्टील, त्यांचे मिक्‍स डिझाईन तांत्रिक चाचणी प्रयोगशाळेकडून करून तपासणी करून घेऊन नंतर वापरणे अपेक्षित असते. ‘चलता है’,वृत्ती घातक आहे.  

3) बांधकामाची कार्यपद्धती 
कंत्राटदाराने विकसकांनी नेमलेला परवानाधारक साईट इंजिनिअर किंवा सुपरवायझर यांच्या मार्गदर्शनानुसार कामे करणे अपेक्षित असते. परंतु अजूनही काही ठिकाणी साईट इंजिनिअरची गरज काय?, कंत्राटदाराला सगळे माहित आहे, असे मानून कंत्राटदार किंवा अनुभवी सुतार/कामगार/ फिटर यांच्यावर अवलंबून राहून काम करून घेतले जाते. आरसीसी स्ट्रक्‍चरची माहिती, प्रत्येक घटकाची गरज, मापे व साहित्याचे प्रमाण याचे गांभीर्य व ज्ञान बांधकाम करताना साईट इंजिनिअर/ सुपरवायझरला असणे गरजेचे आहे. कंत्राटदार आणि साईट इंजिनिअरने तडजोड न करता योग्य ती बांधकामपद्धती अवलंबणे गरजेचे असते.अयोग्य वॉटरप्रूफिंगमुळे लोखंड गंजणे, काँक्रीट योग्य तऱ्हेचे मिश्रण न केल्यास Honey combing होणे, shuttering लवकर उतरविल्यास झोळ येणे असे प्रश्‍न तयार होतात. 

4) इमारत वापर व देखभाल
इमारत वापरताना देखभाल आवश्‍यक. काहीवेळा माहिती असूनही याकडे दुर्लक्ष झाल्याने इमारतीचे नुकसान होते. बऱ्याचवेळा वैयक्तिक सोयीसाठी, अंतर्गत सजावटीसाठी नॉन-स्ट्रक्‍चरल बदल  केले जातात. टॉयलेटची जागा बदलणे, मोरी वाढविणे, खोल्यांची अदलाबदल करणे, टेरेस झाकणे, एकूण वापरात बदल करणे (निवासी ते वाणिज्य), अनधिकृतपणे खोली वाढविणे, मजला वाढविणे वगैरे बदलांमुळे इमारतीत स्ट्रक्‍चरल इंजिनिअरने संरचना करताना विचारात घेतलेल्या मूळ भारापेक्षा अधिक भार दिला जातो. हे बदल करताना तांत्रिक सल्ला घेणे गरजेचे असते. 

5) सुरक्षेशी तडजोड नको 
इमारतीची संरचना डिझाईन करताना संरचना सल्लागार आरसीसी सांगाड्यावर येणारा भार विचारात घेऊन आरसीसी खांब (कॉलम) व तुळया, स्लॅब यांची मापे ठरवतो. मात्र आरसीसीचा खर्च कमी करण्यासाठी संरचना सल्लागारावर दबाव आणला जातो. इमारतीचे सर्व भाग व तिचे वापरयुक्त आयुष्य हे योग्य आरसीसी डिझाईनवरच अवलंबून असते. त्यामुळे अशा प्रकारची तडजोड न करणे शहाणपणाचे. 

इमारतीचा संभाव्य धोका टाळण्यासाठी 

  • विकसकाने भूगर्भविशारदाकडून  माती परीक्षण करून घेणे जरुरीचे आहे व त्याप्रमाणे संरचना सल्लागाराने इमारतीच्या पायाचे डिझाईन करावे. सर्व प्रकारच्या बांधकामांसाठी भूगर्भविशारद हासुद्धा एक अनिवार्य सल्लागार समजून त्याच्या सल्ल्याशिवाय काम करू नये. 
  • बिल्डर/विकसकाने लायसेन्सड साईट इंजिनिअरची बांधकामावर देखरेखीसाठी नेमणूक करावी. साईट इंजिनिअरने आर्किटेक्‍ट, संरचना सल्लागार यांनी दिलेल्या डिझाईननुसार, कुठल्याही प्रकारचा बदल किंवा तडजोड न करता दर्जेदार बांधकाम करण्याकडे लक्ष द्यावे. 
  • सर्व प्रकारचे बांधकाम साहित्य योग्य दर्जाचे असलेच पाहिजे. कोणत्याही कारणासाठी त्याच्या वापरात तडजोड करू नये. 
  • इमारत बांधताना वापरल्या जाणाऱ्या साहित्याची वेळोवेळी नमुना चाचणी योग्य त्या तांत्रिक चाचणी प्रयोगशाळेकडून करून, ते योग्य असल्याची खात्री करणे जरुरीचे असते. त्याच्या नोंदी ठेवाव्यात.  
  • इमारतीचा ताबा देताना विकसकाने इमारतीच्या संदर्भातील सर्व माहिती सभासदांना द्यावी आणि कशा प्रकारे काळजी घ्यायला हवी, हे सांगावे. 
  • इमारतीच्या वयानुसार योग्यवेळी  स्ट्रक्‍चरल ऑडिट संरचना अभियंत्याकडून करून घ्यावे. 
  • इमारतीचा वापर करताना जमिनीला भेगा/तडे जाणे, जोते खचणे, आरसीसी कॉलमला तडे जाणे, cantilever beam/slab झुकणे, reinforcement गंजणे, पाणीगळती, घरातील फरशा उखडणे, दरवाजे- खिडक्‍या नीट बंद न होणे, इमारतीच्या आजूबाजूचा भाग खचणे इत्यादी बाबी रहिवाशांना आढळून आल्यास बिल्डर/विकसक, आर्किटेक्‍ट, स्टक्‍चरल कन्सलस्टंट, बांधकाम कंत्राटदार, साईट इंजिनियर यांना त्वरित कळविल्यास संभाव्य धोका टळू शकेल.  

(लेखक हे संरचना अभियंता आणि ‘आयएसएसई’, पुणेचे चेअरमन आहेत)

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dhairyashil khairepatil on building security