पर्यावरण रक्षणासाठी ‘ग्रेट’ कामगिरी

greta thunberg
greta thunberg

गेल्या आठवड्यात १६ वर्षांच्या किशोरवयीन मुलीने अमेरिकेत ‘व्हाइट हाउस’ या अध्यक्षांच्या निवासस्थानाबाहेर निषेध आंदोलन केले. जागतिक महासत्ता असलेल्या देशाच्या बलाढ्य अध्यक्षांना आंदोलनातून आवाहन करण्याचा व त्यासाठी स्वीडनहून हजारो मैलाचा प्रवास करण्याचा खटाटोप कोण कशासाठी करेल? तर हे सर्व चालले आहे ते जागतिक तापमान किंवा हवामान बदलाच्या चिंतेतून. ही समस्या एक-दोन देशांना नाही; तर संपूर्ण जगालाच घातक ठरणार असून, यासाठी वेळीच पावले उचलून आपल्या वसुंधरेचा बचाव करण्यासाठी ‘मोठ्यां’ना जागे करण्याचा उद्देश स्वीडनच्या ग्रेटा थनबर्ग हिचा या आंदोलनामागे होता.

गेल्या वर्षीपासून तिने या प्रश्‍नावर आवाज उठविण्यास सुरवात केली. ‘क्‍लायमेट इमर्जन्सी’ या नावाने तिने चळवळ उभारली आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी ती करीत असलेल्या प्रयत्नांमुळे तिला स्वीडनची पर्यावरणवादी कार्यकर्ती अशी ओळख मिळाली आहे. अमेरिकेच्या दौऱ्यात तिने माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचीही भेट घेतली. पृथ्वीचा विध्वंस, हवामानातील बदल, पाणी व हवेचे प्रदूषण, अन्नसाखळीचा नाश यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढण्याचा धोका असे मुद्दे ग्रेटा भाषणांमधून प्रभावीपणे मांडत आहे.

तिच्या पर्यावरण चळवळीचा जगभरातून पाठिंबा मिळत आहे. संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात शनिवारी (ता. २१) आयोजित केलेल्या पहिल्या युवा हवामान परिषदेत ग्रेटासह ५०० पर्यावरणवादी युवक-युवती सहभागी झाले. ग्रेटाच्या खारीच्या वाट्याची दखल ‘ॲम्नेस्टी इंटरनॅशनल’नेही घेतली असून ‘ॲबेसिडर ऑफ कॉन्शिअन्स’ या पुरस्काराने नुकताच तिचा गौरव केला आहे. हवामानासंबंधी जनजागृती करणारी ही ग्रेटा थनबर्ग ही स्वीडनची आहे.

गेल्या वर्षी उन्हाळ्यात युरोपमध्ये उष्णतेची लाट आली होती; तसेच जंगलाला लागलेल्या वणव्यात ऑगस्ट महिन्यात स्वीडनपासून आर्टिक प्रदेशातील मोठा भूभाग उद्धवस्त झाला. यानंतरच ग्रेटाने चळवळ उभारून या प्रश्‍नाकडे लक्ष वेधण्याचा दृढनिश्‍चय केला आणि २० ऑगस्ट २०१८मध्ये तिने प्रथमच शाळेला दांडी मारून स्वीडनच्या संसदेसमोर ठाण मांडले. तापमानवाढ, हवामान बदल हे मुद्दे अगदी सामान्यांच्याही तोंडी असतात.

त्यात मुद्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तिने हे ठिय्या आंदोलन सुरू केले. हातात एक फलक धरून दगडावर बसलेल्या ग्रेटाकडे पाहून अनेकांच्या भुवया उंचावत होत्या. त्यानंतर पाऊस, ऊन, बर्फ, थंडी यांची तमा न बाळगता ग्रेटा आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी याच दगडावर बसत असे. यावरून तिच्या आंदोलनाला ‘Fridays for Future’ म्हणूनही ओळखले जाते. काही महिन्यांनी ही छोटी मुलगी म्हणजे जिद्द, प्रेरणा आणि सकारात्मक कामाचे प्रतीक म्हणून ओळखली जाऊ लागली. तिच्या हातातील फलकावर लिहिलेल्या ‘हवामानासाठी शाळा बंद’ या संदेशाचा अनेक भाषांमध्ये अनुवाद झाला. पण तरीही तिचे ‘एकला चालो रे’ सुरूच होते. 

अखेर १५ मार्चनंतर तिची हवामान चळवळ जगभरात पसरली. तिच्या चळवळीशी २० हजार विद्यार्थी जोडले गेले. दावोसमधील परिषदेत तिच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या जागतिक नेत्यांना आणि अब्जावधींची उलाढाल करणाऱ्या उद्योजकांना ग्रेटा ही आशेचा किरण वाटत आहे. ‘यूए’ने तिला परिषदेसाठी पाचारण केल्याने ती ज्या प्रश्‍नासाठी लढत आहे, तो मानवाच्या अस्तित्वासाठी किती महत्त्वाचा आहे हे लक्षात येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com