
काही भागांत दाब कमी असेल पाण्याचा, कुठे कुठे कधी कधी मिळतही नसले कदाचित पुरेसे पाणी; पण सतत वर्धिष्णूच असलेल्या लोकसंख्येला पुरे पडायचे तर हे असे होणारच. मुंबईकरांची फारशी तक्रार नाही त्याबाबत. उलट त्यांना आनंदच आहे, की त्या वाकड्या नळांतून घरोघरी येणारे पेयजल शुद्धतेच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर आहे.
कविवर्य बा. सी. मर्ढेकरांनी ‘बरी तोतऱ्या नळाची, शिरी धार मुखी ऋचा’ म्हणून मुंबईसारख्या शहरांमधील जगण्यातील नाइलाजाची सालटी काढली, त्याला आता बराच काळ लोटून गेला आहे. आज मुंबईत तोतरे नळ अभावानेच आढळतात. काही भागांत दाब कमी असेल पाण्याचा, कुठे कुठे कधी कधी मिळतही नसले कदाचित पुरेसे पाणी; पण सतत वर्धिष्णूच असलेल्या लोकसंख्येला पुरे पडायचे तर हे असे होणारच. मुंबईकरांची फारशी तक्रार नाही त्याबाबत. उलट त्यांना आनंदच आहे, की त्या वाकड्या नळांतून घरोघरी येणारे पेयजल शुद्धतेच्या बाबतीत देशात पहिल्या क्रमांकावर आहे.
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
भारतीय मानक प्राधिकरणाचा हा निष्कर्ष आहे. या संस्थेने देशातील २१ मोठ्या शहरांतील पाणी तपासले. त्यातील १५ शहरे पाणी तपासणीत ठार नापास झाली. बाकीच्या शहरांतील पाण्याची शुद्धता या ना त्या कसावर नाही उतरली. हे लाजिरवाणेच. पुढच्या वर्षी आपण जागतिक महासत्ता बनणार होतो. अशा देशाच्या आणि त्यातील राज्यांच्या राजधान्यांतही साधे स्वच्छ पिण्याचे पाणी मिळत नसेल, तर अन्य शहरांतील पेयजलाची काय दुर्दशा असेल, याचा विचारही न केलेला बरा. हा प्रश्न जितका आरोग्याचा आहे तितकाच तो आर्थिक विकासाशीही निगडित आहे, हे लक्षात घ्यायला हवे. मुळात मुंबईसारख्या आपल्याच भाराने वाकलेल्या शहराला जे जमते ते या शहरांना का जमू नये? मुंबईत पाण्याचे पाच स्तरांवर शुद्धीकरण केले जाते. रोजच्या रोज १५० नमुन्यांची तपासणी केली जाते. हे काही फार खर्चीक आहे अशातला भाग नाही. येथे महागडी आहे ती प्रशासनाची इच्छाशक्ती. प्रशासनाच्या अंगात तसे ‘पाणी’ असल्याशिवाय असे स्वच्छ पाणी मिळत नाही, हेच खरे. ते मिळावे, यासाठी आता लोकांनीच सरकार आणि प्रशासन, यांतील नाकर्त्यांना पाणी पाजले पाहिजे. अर्थात, मुंबईनेही यावर आपले घोडे गंगेत न्हाले, असे मानू नये. तेथील जलजन्य आजार संपलेले नाहीत. जलवाहिन्यांची स्थिती चांगली आहे, असेही नाही. ते सुधारणे गरजेचे आहेच अजून; अन्यथा हे शहरही कधीही ‘पानी कम’ होऊ शकते.