कणखर लढवय्या

पुणे - पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीच्या पुरस्कर्त्या प्रा. पुष्पा भावे यांचा गौरव करताना विद्या बाळ. (डावीकडून) प्रा. सुभाष वारे, बाळ, प्रा. भावे, डॉ. बाबा आढाव.(संग्रहित छायाचित्र)
पुणे - पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीच्या पुरस्कर्त्या प्रा. पुष्पा भावे यांचा गौरव करताना विद्या बाळ. (डावीकडून) प्रा. सुभाष वारे, बाळ, प्रा. भावे, डॉ. बाबा आढाव.(संग्रहित छायाचित्र)

पुष्पाताईंचा मूळ पिंड साहित्य आणि त्यातही समीक्षा यात गुंतलेला होता. त्या क्षेत्रातील त्यांची कामगिरी प्रशंसनीय झालेली आहे. काही भल्या नाटककारांना त्यांनी त्यांचे दोषदेखील मृदू आवाजात पण ठोसपणे समजावून दिले आहेत. महत्त्वाचे म्हणजे औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठात नाट्यशाखा चांगली विकसित व्हावी म्हणून त्यांनी जिवापाड प्रयत्न केले. १९७५ मध्ये इंदिराबाईंनी लादलेल्या आणीबाणीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने आली.

त्याविरुद्ध जी माणसे राजकारणात नव्हती, तीदेखील पेटून उठली. त्यापैकी पुष्पाताई होत्या. मृणालताई, मी असे अनेक लोक भूमिगत होतो. त्यानंतर १९७७ च्या निवडणुकीत जनता पक्षाला यश मिळाले, त्यावेळी काही काळ त्या जनता पक्षात आमच्या बरोबर होत्या. पण नंतर त्यांनी सांगून टाकले की राजकारण हे माझे क्षेत्र नाही. मी कुठल्याही राजकीय पक्षात काम करणार नाही. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक यांच्या वतीने अनुवाद साहित्य, अनुवाद साह्य हा विभाग विकसित करण्यात रामदास भटकळ यांच्यानंतर पुष्पाताई यांनी महत्त्वाचे योगदान दिले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

आधार हरपला - डॉ. बाबा आढाव, सामाजिक कार्यकर्ते
पुष्पाताई आणि आम्ही समाजवादी चळवळीतील सहकारी. त्या आमच्याकडे महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या अध्यक्षा होत्या. सामाजिक कृतज्ञता निधीच्याही त्या अध्यक्षा होत्या. त्याचबरोबर त्यांनी नाट्य समीक्षक म्हणून नाव कमावले होते. तळागाळातील चळवळींशी त्यांनी जैवसंबंध जोडले होते.

कोणतीही अपेक्षा न ठेवता, पदरमोड करून त्या प्रत्येक ठिकाणी जात असत आणि वैचारिक मांडणी करीत. कामगार चळवळ, अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी चळवळीतही त्यांनी भाग घेतला होता. मुंबईतील रमेश किणी प्रकरणाबद्दल कोणी बोलत नसे. पण शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राहूनही त्याला वाचा फोडण्याचे काम पुष्पा भावे यांनी केले. त्यांची निष्ठाच मुळी लोकशाही आणि लोककल्याणाला वाहिली होती. स्त्रीमुक्ती चळवळीला त्यांनी वेगळा आयाम दिला. त्यामुळे त्यांच्या जाण्याने लोकचळवळींचे खूप मोठे नुकसान झाले आहे. 

तळागाळाशी संबंध जोडणारे मध्यमवर्गातील लोक फार कमी असतात. पण पुष्पाताईंनी हे संबंध वाढविले आणि जपलेदेखील होते. त्यांच्याकडे कधीही गेले, तरी काही खाणार का, असा त्यांचा पहिला प्रश्‍न असे. त्यांच्याकडे जी काही पोळीभाजी असे, ती त्यापुढे आणून ठेवत, हे त्यांचे वैशिष्ट्य होते. मला वाटते लोकचळवळींचा आधार आणि सामान्यांच्या न्यायासाठी धडपडणारे व्यक्तिमत्त्व आपल्यातून गेले, याचे अपार दु:ख मला आणि चळवळीतील प्रत्येकाला आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com