'एक चिडिया, अनेक चिडिया‌'च्या‌ जन्मदात्या विजया मुळे कोण होत्या?

डॉ. केशव साठये 
बुधवार, 22 मे 2019

"एक चिडिया, अनेक चिडिया' या सामाजिक संदेश देणाऱ्या गाण्यांमुळे देशातील घराघरांत पोचलेल्या "एक, अनेक और एकता' या ऍनिमेशन लघुपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन विजया मुळे यांचे होते. शैक्षणिक दूरचित्रवाणी हा विचार विजयाताईंनी देशाला दिला, तो रुजवला आणि यशस्वी करून दाखवला. 

1970-80 हे दशक दूरदर्शनचे घडण्याचे दशक मानले जाते. पण, या काळात जे पडद्यावर दिसले; ते मनःपटलावर कायमचे कोरले गेले. मग ती "लिरील'ची जाहिरात असो वा ललिताजी यांची सर्फ वापरण्याची "समजदारी'. त्याचवेळी याच छोट्या पडद्यावर "एक, अनेक और एकता' ही ऍनिमेशन तंत्र वापरून तयार केलेली छोटी फिल्म प्रथम पाहिली. एक बहीण आपल्या भावाला सूर्यमाला, फुलांचा हार यांची उदाहरणे देत एक, अनेक आणि त्यांची एकता, राष्ट्रीय एकात्मता हा सामाजिक संदेश कोणतेही प्रवचन न देता गाण्यातून, दृश्‍यांमधून समजावून सांगते आहे, असे त्या लघुपटाचे स्वरूप होते.

सर्वांत जास्त प्रेक्षकसंख्या लाभलेली आणि दोन पिढ्यांमधील प्रेक्षकांना सारखाच आनंद देणारी ही फिल्म एक आदर्श शैक्षणिक फिल्म म्हणून नावाजली गेली. तिला राष्ट्रीय पुरस्कारही लाभला. त्याचे दिग्दर्शन आणि संकल्पना विजया मुळे यांची. नेमका हाच धागा पकडून बहुदा "युनिसेफ'ने "साईट' (Satellite Instructional Educational Experiment) या उपग्रहाचा वापर करून टीव्हीच्या माध्यमातून शैक्षणिक कार्यक्रम प्रसारण प्रकल्पात त्यांच्यावर शैक्षणिक कार्यक्रमाची धुरा सोपवली. हा प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. इथे त्यांनी विविध माध्यमांचा वापर करून सुमारे 50 हजार शिक्षकांना प्रशिक्षित करण्याचे आणि शैक्षणिक तंत्रज्ञानाचा नवा अध्याय लिहिण्याचे मोठे काम त्यांनी केले. 

Vijaya Mulay

या प्रकल्पाच्या यशस्वितेमुळे 1983-84 मध्ये सुरू झालेल्या "शैक्षणिक चित्रवाणी'सारख्या प्रकल्पांना चालना मिळाली. या महान विदुषीला भेटण्याचा योग एकदा आला, ते मी "बालचित्रवाणी'ला निर्माता म्हणून काम करीत असल्यामुळे. "एज्युकेशनल व्हिडिओ फेस्टिव्हल'निमित्त दिल्लीला गेलो होतो, त्या वेळी त्यांचे विचार ऐकायला मिळाले, त्यांना भेटता आले. त्यांच्याशी बोलताना टीव्हीवरील कार्यक्रमांतील लपलेले शिक्षणाचे मॉडेल दिसायला लागले. शैक्षणिक कार्यक्रमात मनोरंजन हा अंगरखा असला, तरी आत्मा शिक्षणाचाच हवा, हे सूत्र त्यामुळे मनात पक्के झाले. 

vijaya mulay

"कंट्रिवाइड क्‍लासरूम'च्या प्रेरणास्थान 

विजया मुळे यांचा शिक्षणशास्त्राचा अभ्यास होताच. लीड्‌स विद्यापीठातून शिक्षणशास्त्र या विषयातील पदव्युत्तर पदवी त्यांनी प्राप्त केली होती. इंग्लंडमध्ये असताना त्यांना वैविध्यपूर्ण चित्रपट पाहायला मिळाले. आणि तेथेच विजयाताई चित्रपटाकडे गंभीरपणे पाहायला लागल्या. तेथील विद्यापीठाच्या फिल्म क्‍लबच्या सदस्या झाल्यानंतर त्यांना चित्रपट हा कलाप्रकार किती सर्वांगीण समृद्धी आणि अनुभूती देऊ शकतो, याचा नेमका 
अंदाज आला. त्यामुळे विजयाताई भारतात परत आल्या, त्या एक चित्रपट अभ्यासक आणि रसास्वाद घेणाऱ्या एक शिक्षणशास्त्र विदुषी म्हणूनच. आल्यानंतर त्या केंद्र सरकारमध्ये शिक्षणाधिकारी म्हणून काम पाहू लागल्या. त्याला त्यांच्यातील सर्जनशील दिग्दर्शकाची जोड मिळाली आणि आपल्या देशाला एक अतिशय अभ्यासपूर्ण असे शैक्षणिक दूरचित्रवाणीचे मॉडेल मिळाले.

उच्च शिक्षणासाठी सुरू झालेल्या "कंट्रिवाइड क्‍लासरूम' या योजनेच्या प्रेरणास्थानही त्याच होत्या. शैक्षणिक क्षेत्राशिवाय त्यांचे आणखी महत्त्वाचे योगदान म्हणजे त्यांनी चित्रपट माध्यम हे लोकांना नीट समजावे, त्यांची दृश्‍यसाक्षरता वाढावी म्हणून त्यांनी दिल्लीत फिल्म सोसायटीची स्थापना केली. त्या वेळी तिचे अध्यक्ष होते ज्येष्ठ दिग्दर्शक सत्यजित राय. त्यातूनच पुढे देशभर फिल्म सोसायटीचे जाळे पसरले. इंदिरा गांधी यांच्या त्या मैत्रीण होत्या, सत्यजित राय यांच्याबरोबर त्यांची दोस्ती होती. या ग्लॅमरस गोष्टींपेक्षा शैक्षणिक दूरचित्रवाणी हा विचार त्यांनी या देशाला दिला, रुजवला, यशस्वी करून दाखवला, हे अधिक महत्त्वाचे. "व्ही. शांताराम जीवनगौरव' पुरस्कार आणि शैक्षणिक संप्रेक्षणातील अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना "विक्रम साराभाई' पुरस्काराने गौरविण्यात आले होते. 

शिक्षणाचा नवा रस्ता 

परवाच्या रविवारी (19 मे) वयाच्या 98व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. चार-पाच दिवसच त्या आजारी होत्या. पण, कोणत्याही प्रकारे व्हेंटिलेटर वापरायचा नाही, अशी ताकीद त्यांनी आपली लेक अभिनेत्री सुहासिनी मुळे यांना दिली होती. भारताला दृक्‌श्राव्य माध्यमातून शिक्षणाचा एक नवा रस्ता त्यांनी दाखवला, ते प्रकल्प मात्र धोरणकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे एकतर व्हेंटिलेटरवर आहेत, नाहीतर "बालचित्रवाणी'सारखे अस्तंगत झाले आहेत. त्यांना आदरपूर्वक श्रद्धांजली वाहताना त्यांचे हे स्वप्न अधुरे राहिले, ही खंत मनात कायम राहणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article on pioneer of Indian animation Vijaya Mulay