पुरुषसत्ताक मानसिकता आणि ‘प्रगतिमत्सर’

Pushpa-Bhave
Pushpa-Bhave

स्त्री अत्याचाराच्या घटनांनी देशातील राजकारण आणि समाजकारण ढवळून निघत असल्याच्या आजच्या काळात प्रा. पुष्पा भावे यांनी एकूणच अशा घटना आणि त्यामागील मानसिकतेचा घेतलेला हा वेध महत्त्वाचा ठरावा...

स्त्रियांवरील वेगवेगळ्या स्वरूपाचे अत्याचार हा एक सनातन प्रश्न आहे. मिथक कथा, महाकाव्य, इतिहासातल्या दंतकथा या साऱ्यांमध्ये देवांना एखाद्या ऋषीपत्नीविषयी अभिलाषा निर्माण होणं, सत्ताधाऱ्यांना एखाद्या सुस्वरूप वीरपत्नीविषयी लालसा निर्माण होणं, राक्षस योनीतील कोणाला अनिष्ट इच्छा निर्माण होणं अशासारख्या गोष्टी दिसतात. या कथांमागे रतिप्रेरणेइतकंच सत्तेचं राजकारण आहे. स्त्रीवर कब्जा मिळविण्याची भूमिका आहे. दोन पुरुषांच्या वा दोन पुरुष समूहाच्या युद्धात वैरभावनेत स्त्रीवर हल्ला करून पुरुषाच्या सन्मानावर वार करण्याची वृत्ती दिसते. हे जीत आणि जेते नातं आहे. ते जगभर युद्धामध्ये स्त्रियांवर बलात्कार करण्यातून व्यक्त होत असतं.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नीच वा हलक्‍या मानलेल्या जातीतल्या स्त्रियांवर जणू आपला हक्क आहे, असं ‘वरच्या’ मानलेल्या जातीतले पुरुष मानतात. कृष्णवर्णीय स्त्रियांवर वर्षानुवर्षं झालेले अत्याचार, भारतात दलित स्त्रियांवर वा वेठबिगार स्त्रियांवर होणारे अत्याचार याच स्वरूपाचे आहेत. उतरंडीच्या वरच्या पायरीवर पाऊल ठेवण्याचा यत्न ‘खालच्या’ मानलेल्या पायरीवरच्या माणसाने केला की, त्याच्या स्त्रियांवर शिक्षा म्हणून बलात्कार वा विवस्त्र धिंड काढण्याचे प्रकार होतात. आपण महाराष्ट्राला पुरोगामी म्हणतो; पण इथेच दलित पॅंथरचं राजकारण, साहित्यकारण सुरू झाल्यावर अनेक ठिकाणी दलित स्त्रियांची धिंड काढण्यात आली. खैरलांजीमध्ये भोतमांगे कुटुंबावर जो क्रूर हल्ला झाला, त्यामागे त्यांच्या प्रगतीविषयीचा मत्सर होता.  

पुरुषसत्ताक कुटुंबरचनेने, संस्कृतीने निर्माण केलेली एक मानसिकता आहे... कायदा, राज्यघटना काहीही म्हणत असली, तरी पुरुषांच्या ठिकाणी श्रेष्ठत्वाची भावना आहेच. इतकंच नाही, तर स्त्रियांना ज्या प्रकारे घडवलं जातं, त्यामुळे त्याही पुरुषश्रेष्ठत्व ही कल्पना आत्मसात करतात.  

घरात, मनात आलं की आईवर, पत्नीवर, बहिणीवर हात उगारणारा माणूस कचेरीत वावरताना, विशेषतः बाई वरिष्ठ हुद्द्यावर असते अशा कार्यालयात किती धुमसत असेल, हे लक्षात येईल. मग हे धुमसणं स्त्री सहकाऱ्याविषयी खोट्या तक्रारी करणं, तिच्याविषयी वेडंवाकडं लिहून ठेवणं, प्रसंगी तिचं अश्‍लील छायाचित्र तयार करून पसरवणं - हे हल्ली सोपं झालं आहे - अशा प्रकारे व्यक्त होतं.

(‘लढे आणि तिढे : चिकित्सक गप्पा पुष्पाबाईंशी’ : मेधा कुळकर्णी, मनोविकास प्रकाशन, सप्टेंबर २०२० या पुस्तकातून)

पुष्पाताईंची  पुस्तके
१) आम्हाला भेटलेले डॉ. श्रीराम लागू
२) गुड मुस्लिम बॅड मुस्लिम (अनुवादित)
३) रंग नाटकाचे

पुरस्कार
१) महाराष्ट्र फाउंडेशनतर्फे जीवनगौरव पुरस्कार
२) अनंतराव भालेराव स्मृती पुरस्कार
३) राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’
४) मातोश्री भीमाबाई आंबेडकर पुरस्कार

पुष्पाताई भावे यांचे निधन ही महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीची, सुधारणावादी विचारांची, दुर्बल-वंचित-उपेक्षित घटकांच्या हक्काच्या लढ्याची, महिला सक्षमीकरणाच्या चळवळीची मोठी हानी आहे. व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या, सर्वसामान्यांवरच्या अन्यायाविरुद्ध उठणारा हक्काचा आवाज आज शांत झाला आहे.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

जितक्‍या करारी तितक्‍याच प्रेमळ असलेल्या पुष्पाताई भावे या कृतिशील विचारवंत होत्या. सामाजिक कृतज्ञता निधी उभारण्यात नरेंद्र दाभोलकर, बाबा आढाव यांच्या बरोबरीने त्या सहभागी होत्या आणि कार्यकर्त्यांच्या वैचारिक जडण-घडणीतही त्या महत्त्वाचे योगदान द्यायच्या. संविधानातील मूल्यांसाठी आणि कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी त्या सातत्याने सक्रिय असायच्या. महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांसाठी त्यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय आश्वासक होते.
- सुभाष वारे, सामाजिक कार्यकर्ते

पुष्पाताईंच्या सान्निध्यात राहायला मिळाले हेच मी माझे भाग्य समजते. कधी कधी मला त्यांना भेटायला भीती वाटायची. पण त्या अत्यंत मृदू स्वभावाच्या होत्या. माझ्यासाठी त्या गुरुस्थानी होत्या. त्यांची पुस्तके पुढील पिढीने वाचली पाहिजेत.
- नीना कुलकर्णी, अभिनेत्री

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com