आपण असे का वागतो?

दीप्ती गंगावणे
शुक्रवार, 12 मे 2017

आपण असे का करतो? सॉक्रेटिस यांच्या मते या चुकीच्या वर्तनाच्या मुळाशी अज्ञान असते. आपण सद्‌गुणी असतो, ते फक्त वरवरच्या पातळीवर

माणूस हा समाजशील प्राणी आहे. त्याचे माणूसपण समाजातच घडत असते. त्यामुळे माणसासाठी कोणते जीवन चांगले या प्रश्‍नाचे उत्तर वैयक्तिक पातळीवर देता येत नाही, त्यासाठी सामाजिक पातळीचा विचार करावाच लागतो. सामाजिक जीवन स्वास्थ्यपूर्ण, निरोगी आणि लाभदायी व्हावे, यासाठी व्यक्तीच्या आचार-विचारांसाठी नियमांची, कायद्यांची चौकट आखली जाते व नियमांमध्ये नीतिनियम फार महत्त्वाचे असतात. ज्या मूल्यांच्या आधारे हे नियम ठरवले जातात, ती मूल्ये सुजीवनासाठी मोलाची असतात. म्हणूनच जेव्हा सर्वसामान्यांना चांगले जीवन जगणे कठीण होते, तेव्हा "नीतिमूल्यांची घसरण झाली आहे,' अशी हाकाटी सुरू होते.

सहसा सगळ्यांची अशी प्रामाणिक समजूत असते की नैतिक - अनैतिक म्हणजे काय किंवा चांगले आणि वाईट वागणे म्हणजे काय हे आपल्याला माहीतच असते. एका दृष्टीने खरेही असते. इसापच्या नीतिकथा, पंचतंत्र, हितोपदेश आणि त्यासारख्या नीतीचे धडे देण्याच्या गोष्टी ऐकत आपण लहानाचे मोठे होतो. आजकाल तर शाळांमधूनही मूल्यशिक्षणाचे तास असतात. थोडक्‍यात, नैतिक सद्‌गुण आपल्या अंगी बाणवण्याचा कसून प्रयत्न केला जातो आणि आपल्यामध्ये ते आहेतच, अशी आपली समजूत असते. तरीही आपल्यापैकी प्रत्येकजण कधी ना कधी, कमी-जास्त प्रमाणात "चुकीचे' किंवा "अनैतिक' वागतो. असे का होते? याचे या प्रश्‍नाचे उत्तर बहुतेक जण असे देतात, की आपली अवस्था "कळते, पण वळत नाही' अशी असते. नीतिमत्ता म्हणजे काय ते कळते, पण काही ना काही कारणांनी आचरणात आणता येत नाही. आपण सद्‌गुणी असतो, पण सर्वकाळ सदाचारी मात्र नसतो. आपले वागणे नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे, याचे ज्ञान असूनही आपण तसे वागतो. आपण खोटे बोलतो, लाच देतो, नियम योग्य आहे हे माहीत असूनही त्यातून पळवाटा शोधतो.

आपण असे का करतो? सॉक्रेटिस यांच्या मते या चुकीच्या वर्तनाच्या मुळाशी अज्ञान असते. आपण सद्‌गुणी असतो, ते फक्त वरवरच्या पातळीवर. शिक्षेच्या भीतीने, बदनामीच्या धास्तीने, कधी कधी सवयीने, तर कधी समाजाला अनुसरून आपण "चांगले' वागतो. पण ते वागणे खरेच चांगले आहे काय? चांगले म्हणजे काय याचा विचार आपण करतच नाही. आपल्या तथाकथित चांगल्या वागण्याला ज्ञानाचे अधिष्ठान नसते, त्यामुळे आपल्या चांगल्या वागण्याच्या उर्मी डळमळीत होतात. आपण चुका करतो, ते त्या चुकीचे काही परिणाम तरी आपल्याला चांगले वाटतात म्हणूनच! माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती जे त्याला "चांगले' वाटते, ते करण्याचीच असते. पण चांगले वाटणे आणि चांगले असणे यात फरक आहे. ज्याला चांगले म्हणजे काय, नैतिक म्हणजे काय, सद्‌गुण म्हणजे काय याचे खरेखुरे ज्ञान असेल, तो/ ती कधीही वाईट, अनैतिक वागणारच नाही, असे सॉक्रेटिस यांचे ठाम मत आहे. "सद्‌गुण म्हणजे ज्ञान' हे त्यांचे वचन प्रसिद्ध आहे. या वचनातूनच हा निष्कर्ष निघतो, की कोणीही जाणूनबुजून वाईट वागत नाही. अज्ञान हेच अनैतिकतेचे मूळ आहे.

Web Title: article regarding morality