दिल इराणी, काम रुहानी!

श्रीमंत माने (shrimant.mane@esakal.com)
सोमवार, 22 मे 2017

58 टक्‍के म्हणजे 2 कोटी 30 लाख मतं घेऊन रुहानी दुसऱ्यांदा राष्ट्रपती बनले. कट्टरपंथी इब्राहीम रईसी यांचा त्यांनी दारुण पराभव केला. धार्मिक कट्टरतेविरोधात जनमताचा कौल मिळालेल्या फ्रान्स, दक्षिण कोरियानंतर इराण अलीकडचा तिसरा देश ठरला

घटना तीन वर्षांपूर्वीची आहे; इराणमधली. अमेरिकन गायक फॅरेल विल्यम्सच्या "हॅप्पी' गाण्यावर मित्रांसोबत केलेल्या नृत्याचा व्हिडीओ रिहान तारावती या तरुणीनं "इन्स्टाग्राम'वर टाकला. तिथल्या इस्लामिक राजवटीत तो अपराध होता. कोर्टानं तिला 91 फटके व तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. आधीची राष्ट्रपती मुहम्मद अहमदीनेजाद यांची सत्ता असती, तर ती शिक्षा भोगावीच लागली असती; पण काही महिन्यांपूर्वीच उदारमतवादी हसन रुहानी राष्ट्रपती बनले होते. तारावती व तिच्यासारख्या अनेकांना दिलासा देणारं, "देशात सगळेच "हॅप्पी' असायला हवेत', असं ट्‌विट त्यांनी केलं. आधीची चार वर्षं इराणमध्ये ट्विटर, फेसबुकवर बंदी होती. अहमदीनेजाद दुसऱ्यांदा विजयी झाल्यानंतर 2009 मध्ये निवडणूक निकालाच्या विरोधात सोशल मीडियावर गदारोळ माजल्यानंतर ती बंदी घालण्यात आली होती. तारावतीची शिक्षा माफ झाली, हे वेगळं सांगायची गरज नाही.

काल, हसन रुहानी पुन्हा राष्ट्रपती बनले; तेव्हा तारावतीनंच या घटनेला उजाळा दिला. पावणेदोन लाख "फॉलोअर्स'सह ती "इन्स्टाग्राम स्टार' आहे. धार्मिक बंधनं व इस्लामी कायद्याचा जाच झुगारून आपल्या कर्तबगारीचं निशाण जगभर रोवू पाहणारे तारावतीसारखे लाखो तरुण- तरुणी, विद्वान- कलावंत- खेळाडू रुहानींचे चाहते आहेत. अहमदीनेजाद यांच्या काळात इराण जगाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकला गेला होता. आर्थिक निर्बंध लादण्यात आले होते. ते वितुष्टाचं वातावरण रुहानींनी बदलवलं. अमेरिकेसह अनेक राष्ट्रांशी आण्विक करार केले. अमेरिकेच्या मर्जीतले इराकचे अध्यक्ष हैदर अल अबादी यांच्याशी सहकार्याची भूमिका घेतली. युरोपशी पुन्हा प्रेमाचे संबंध निर्माण झाले. तरुणाईसाठी जगाची कवाडं खुली झाली. म्हणूनच यंदाच्या निवडणुकीत लाडक्‍या रुहानींसाठी सोशल मीडियावर तरुणांकडून प्रभावी प्रचार मोहीम राबवली गेली.

रुहानींच्या दुसऱ्यांदा राष्ट्रपती बनण्यात तसं विशेष काही नाही. 1985 पासून प्रत्येक राष्ट्रपतीला दोन टर्म मिळत आल्या आहेत. शिवाय, कट्टरपंथी इस्लामी राजवटीत इराणची सगळी सूत्रं रुहानींच्या हातात नाहीत. 78 वर्षांचे अयातुल्ला अली खोमेनी हे देशाचे सर्वोच्च नेते आहेत. अलीकडे ते आजारी असले, तरी व्यक्‍तीचं स्वातंत्र्य महत्त्वाचं मानणाऱ्या रुहानींच्या धोरणाला खोमेनी यांनी गेल्या चार वर्षांत पाठिंबाच दिलाय. तेहरानमध्ये आता घराघरांवर "सॅटेलाइट डिशेस' दिसतात. विदेशी बातम्या व मनोरंजनाचे कार्यक्रम लोक पाहू शकतात. विवाहित जोडपी बगीचांमध्ये बऱ्यापैकी फिरू शकतात. परिणामी, आधी सर्वाधिक निर्बंध ज्यांच्यावर होते तो युवकवर्ग, महिला यंदा मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी बाहेर पडल्या. मतदान केल्यानंतर "सेल्फी' घेतल्या, त्या सोशल मीडियावर टाकल्या. या मुक्‍त वातावरणामुळे आठ कोटींच्या इराणमध्ये पाच कोटी 60 लाख म्हणजे सत्तर टक्‍के, असं विक्रमी मतदान झालं. ठरलेल्या वेळेपेक्षा पाच तास अधिक मतदान झालं. मतदानाचा कालावधी तीनदा वाढवावा लागला. 58 टक्‍के म्हणजे 2 कोटी 30 लाख मतं घेऊन रुहानी दुसऱ्यांदा राष्ट्रपती बनले. कट्टरपंथी इब्राहीम रईसी यांचा त्यांनी दारुण पराभव केला. धार्मिक कट्टरतेविरोधात जनमताचा कौल मिळालेल्या फ्रान्स, दक्षिण कोरियानंतर इराण अलीकडचा तिसरा देश ठरला.

स्टील सिटीत अफवांची आग
मेंदूवर धार्मिक उन्माद चढलेला असला अन्‌ अफवा पसरवण्यासाठी त्या उन्मादाला सोशल मीडियाची जोड असली की काय घडतं, याचा रक्‍तरंजित अनुभव सध्या झारखंडमधली "स्टीलसिटी' जमशेदपूर व लगतचा परिसर घेतोय. अल्पसंख्याक समुदायाच्या टोळ्या मुलं चोरण्यासाठी फिरतायत, अशी अफवा गुरुवारी पसरली अन्‌ जमावाच्या मारहाणीत चारजणांचा जीव गेला. सुरवातीच्या या घटनेत धार्मिक उन्माद होताच. शिवाय, ते चौघेही अल्पसंख्याक समुदायाचे व जनावरांचा व्यापार करणारे होते. त्या हत्यांविरोधात हिंसक निदर्शने झाली. पोलिसांवर दगडफेक झाली. गाड्या जाळण्यात आल्या. लोकांनी मुलांना शाळेत पाठवणं किंवा घराबाहेर जाऊ देणं बंद केलं. एकदा असा अफवांचा वणवा पेटला की कोण हिंदू अन्‌ कोण मुस्लिम? ओलं-वाळलं असं सगळंच त्यात बेचिराख होतं. त्यानुसार, गेल्या तीन दिवसांत वेगवेगळ्या ठिकाणी जमावांकडून मारहाणीत दोन्ही धर्मांतल्या नऊजणांचे बळी गेलेत. राजकीय आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. रविवारी चार ठिकाणी कर्फ्यू लावावा लागलाय.

Web Title: article regarding Rouhani