उंच धोक्‍याचा "अर्थ'

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 जुलै 2017

हा उंच झोका तसाच राहील,. या भ्रमात राहणे सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी मात्र धोक्‍याचे ठरू शकते. तेजीचा वारू दौडत असताना त्यावर स्वार होण्याच्या प्रयत्नात खाली पडण्याचा, खरचटण्याचाही धोका असतो. तो नीट समजावून घेत, दीर्घकाळाचा विचार करून सावधपणे गुंतवणूक करणे आवश्‍यक आहे

देशात राजकीय आणि आर्थिक पातळीवर अनेक चढउतार आणि उलथापालथी होत असल्या तरी राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक मात्र सातत्याने वरचा आलेख दाखवित आहे. गुरुवारी राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकाने सर्वोच्च अशा 10 हजार अंशांच्या पातळीला स्पर्श केला, त्यापाठोपाठ मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानेही 32 हजार 374 या उच्चांकी पातळीला स्पर्श केला आहे. शेअर बाजार हा काही आर्थिक-औद्योगिक विकासाचा मुख्य निदर्शक घटक मानला जात नाही. याचे कारण आशा, भीती, निराशा, अंदाज-तर्क अशा निव्वळ मानवी भावभावना आणि प्रवृत्ती यांच्यानुसार तो सतत हिंदकाळत असतो. किंबहुना तेच त्याचे स्वरूप; पण असे असले तरी शेअर बाजारातील वाढीचा कल सातत्याने दिसण्यासाठी काही किमान घटक आवश्‍यक असतात. ते अगदी पायाभूत असले तरी त्यांचे महत्त्व नाकारता येत नाही. राजकीय स्थैर्य, आर्थिक सुधारणांचा प्रयत्न, औद्योगिक विकासाला अनुकूल धोरणे यांचा परिणाम या वाढीवर निश्‍चितच होतो. निफ्टीच्या वाढीचा गेल्या काही वर्षांतील कल पाहिला तर हे स्पष्ट होते.

21 एप्रिल 1996 रोजी निफ्टीचा निर्देशांक एक हजार होता. 2007 मध्ये तो पाच हजारांवर गेला आणि 2014 नंतर तो अक्षरशः उड्डाणे घेत आता दहा हजारांच्या पातळीला जाऊन धडकला आहे. म्हणजेच तीन वर्षांत तीन हजारांची झेप दिसून येते; पण हा उंच झोका तसाच राहील,. या भ्रमात राहणे सर्वसामान्य गुंतवणूकदारांसाठी मात्र धोक्‍याचे ठरू शकते. तेजीचा वारू दौडत असताना त्यावर स्वार होण्याच्या प्रयत्नात खाली पडण्याचा, खरचटण्याचाही धोका असतो. तो नीट समजावून घेत, दीर्घकाळाचा विचार करून सावधपणे गुंतवणूक करणे आवश्‍यक आहे. कारण शेअर बाजारीतल वाढ ही पुढच्या परिस्थितीचा आधीच अंदाज घेऊन झालेली वाढ असते. सगळ्या गोष्टी अपेक्षिल्यानुसार घडतील, असे छातीठोकपणे सांगता येत नाही. मात्र या गुंतवणूक पर्यायापासून फटकून दूर राहाणे हेदेखील शहाणपणाचे नाही. स्वतःचा अभ्यास, स्वतःचा विचार यांचे महत्त्व ओळखण्याची आज नितांत गरज आहे.

Web Title: article regarding share market