नातं...आपलं, आपल्याशी!

मल्हार अरणकल्ले
गुरुवार, 30 मार्च 2017

माणसाला नातेसंबंधांची केवढी श्रीमंती लाभली आहे, त्याचा विचार केला, तरी अचंबित व्हायला होतं. खरंच, हे नातं म्हणजे असतं तरी काय? नातं म्हणजे अनेकांना जोडणारा एक रेशमी धागा असतो. ती आपलेपणाची ओढ असते. भावनिक गुंतवणूक असते. नातं हे श्रद्धास्थान असतं; आणि हक्काचा आधार असतं. नातं जसं रक्ताचं असतं; तसंच ते जुळलेलं किंवा जुळविलेलंही असतं. नातं मानलेलं असतं, हवं असलेलं अथवा नको असलेलंही असतं. नातं टोचणारं असतं, खुपणारं असतं, अभिमान वाटावा असं असतं; आणि कमीपणा आणणारंही असतं. नातं दूर ठेवावंसं वाटणारं असतं; आणि आवेगानं समीप फुलणारंही असतं.

माणसाला नातेसंबंधांची केवढी श्रीमंती लाभली आहे, त्याचा विचार केला, तरी अचंबित व्हायला होतं. खरंच, हे नातं म्हणजे असतं तरी काय? नातं म्हणजे अनेकांना जोडणारा एक रेशमी धागा असतो. ती आपलेपणाची ओढ असते. भावनिक गुंतवणूक असते. नातं हे श्रद्धास्थान असतं; आणि हक्काचा आधार असतं. नातं जसं रक्ताचं असतं; तसंच ते जुळलेलं किंवा जुळविलेलंही असतं. नातं मानलेलं असतं, हवं असलेलं अथवा नको असलेलंही असतं. नातं टोचणारं असतं, खुपणारं असतं, अभिमान वाटावा असं असतं; आणि कमीपणा आणणारंही असतं. नातं दूर ठेवावंसं वाटणारं असतं; आणि आवेगानं समीप फुलणारंही असतं. नातं गहिरं असतं, वरवरचं असतं, सांगण्यापुरतं असतं; आणि निभावण्यापुरतंसुद्धा असतं. नातं मनाच्या कप्प्यात जपून ठेवावं असं असतं; तसंच ते थांबवून टाकावं असं वाटणारंही असतं. नातं जुळून मोडणारं असतं, मोडून जुळणारं असतं. नातं न सांगता कळणारं असतं; आणि कधी कधी सांगता न येणारंही असतं. नातं वाहत्या पाण्यासारखं असतं, झुळझुळत्या वाऱ्यासारखं असतं, चक्राकार फिरविणाऱ्या आवर्तासारखं असतं; आणि अलगद उचलून सावरणाऱ्या हातांसारखंही ते असतं. 

नातं प्रसंगाप्रसंगांनी जुळणारं असतं; आणि आपल्या दूरध्वनी क्रमांकांच्या वहीतही असतं. नातं जसं ओळखीच्यांशी असतं; तसंच ओळख करवून घेणाऱ्यांशीही असतं. 

नातं पाहावं तिथं असतं; आणि मानावं तिथंही असतं. नातं पानाफुलांशी जुळतं. नातं चित्रांशी गट्टी करतं. नातं सुरांत विरघळून जातं; आणि पराक्रमांच्या कथांनी ते स्वतःच रोमांचित होतं. नातं सचेतनाशी जडतं आणि अचेतनाशीही त्याची सुरावट जुळून येते. नातं एखाद्या अभिनयावर फिदा होतं आणि पैंजणस्वर होऊन नृत्याविष्कारावर उधळत राहतं. मदत देऊ करणाऱ्याशी नातं जुळतं; आणि वाट पाहायला लावणाऱ्याशीही त्याचा धागा गुंफला जातो. नातं एखाद्या दुःखाशी फुंकर होऊन जोडलं जातं; आणि एखाद्या आकांताला सावरण्यासाठी आधार होऊन ते धावत जातं. क्षणाक्षणांत नात्याची उगवण आहे आणि काळाच्या लांबलचक वाटचालींत त्याचं बहरणं-फुलणं आहे. 

नात्यांची ही केवढी समृद्धी नियतीनं आपल्या प्रत्येकाच्या ओंजळीत भरभरून टाकली आहे. त्याच नियतीनं एक गोष्ट राखून ठेवली आहे; आणि ती म्हणजे आपलं स्वतःचं आपल्याशी कुठलं नातं आहे, हे तिनं आपल्या मुठीत लपवलं आहे. 

खरंच, आपलं स्वतःशीसुद्धा नातं असू शकतं? हो, आहेच; पण ते मात्र आपल्यालाच शोधायला हवं.

Web Title: article on relationship