कृष्णा, वारणेकाठी ‘मगर’मिठीची भीती (प्रसाद इनामदार)

मंगळवार, 21 मे 2019

सध्या वारणा, कृष्णाकाठ भीतीच्या छायेखाली आहे. कारण तेथील मगरींचा वावर. मोठ्या प्रमाणावर वाळू, मातीच्या उपशामुळे मगरींच्या अधिवासाला धक्का बसल्याने त्या हिंस्र बनल्या आहेत. मगरींचा अधिवास जपायला हवा आणि नदीकाठचे मानवी जीवनही सुरक्षित व्हायला हवे. त्यासाठी मध्यममार्ग काढणे आवश्‍यक आहे.

कडाक्‍याच्या उन्हात वाहत्या नदीत डुंबण्याचा मोह कोणाला होत नाही? गारवा मिळवण्यासाठी पावले आपसूक नदीकडे वळत. पोहण्यासाठी एकच गर्दी होई. हे काही वर्षांपूर्वीपर्यंतचे कोल्हापूर- सांगली जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णेकाठी हमखास दिसणारे सुखद चित्र आता धूसर होत आहे. गेल्या काही वर्षांत हवाहवासा वाटणारा वारणा, कृष्णाकाठ सध्या भीतीच्या छायेखाली आहे.

पोहण्याचा आनंद घेण्यासाठी पाण्यात उतरणाऱ्यांच्या आणि नदीकाठी शेती असणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोक्‍यात सतत एक अनामिक भीती कायम असते. ही भीती आहे मगरींच्या हल्ल्याची. काही दिवसांपूर्वीच कसबे डिग्रज येथे पोहणाऱ्या बारा वर्षांच्या एका मुलाला मगरीने त्याच्या आईदेखत ओढून नेले. त्या मुलाचा हकनाक बळी गेला आणि कृष्णाकाठची मगरींची दहशत पुन्हा अधोरेखित झाली. कृष्णा-वारणा नदीत पूर्वीपासून मगरींचा वावर आहे; मात्र साधारणपणे पंधरा-सोळा वर्षांपूर्वी हा वावर मोठ्या प्रमाणावर दृष्टीस पडून मगरींची भीती निर्माण झाली.

प्रारंभी माणसांना बुजणाऱ्या मगरी थेट हल्ला करू लागल्या. गेल्या १६ वर्षांमध्ये मगरींनी २१-२२ हल्ले केले आहेत आणि त्यात दहा जणांना जीव गमवावा लागला आहे. मगरींच्या हल्ल्यांमध्ये अनेक जण कायमचे जायबंदी झाले आहेत. त्यामुळे दोन्ही नद्यांच्या काठांवर मगरींची दहशत निर्माण झाली आहे.

अधिवास उद्‌ध्वस्त झाल्याने मगरी हिंसक
प्रारंभी सांगली जिल्ह्यात आढळणाऱ्या मगरी गेल्या काही वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यातही अनेक ठिकाणी आढळू लागल्या आहेत. कुरुंदवाड, शिरोळ परिसरातील शेतांमधूनही मगरींना पकडल्याची उदाहरणे आहेत. सांगली जिल्ह्यातील भिलवडी, अंकलखोप, ब्रह्मनाळ, तुंग, कसबे डिग्रज, औदुंबर आदी ठिकाणी मगरींचा अधिवास होताच; तो गेल्या काही वर्षांत अधिक ठळक झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये नदीच्या या टापूमध्ये मोठ्या प्रमाणावर वाळूउपसा, तसेच वीटभट्ट्यांसाठी माती काढणे सुरू झाले. त्यामुळे मगरींची राहण्याची ठिकाणे उद्‌ध्वस्त झाली. मगरींनी घातलेली अंडी फोडली गेली. जोडीलाच वाळू उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या मोटारींच्या आवाजाने मगरी अस्वस्थ झाल्या. त्यांच्या अस्तित्वावरच घाला घातला जाऊ लागल्याने त्या हिंस्र बनल्या. मगरींच्या अधिवासादरम्यान मानवी हालचालीही मोठ्या प्रमाणावर वाढल्या. त्यामुळे संरक्षणापोटी त्यांच्याकडून हल्ले होण्याचे प्रकार वाढले. त्यातही प्रामुख्याने मगरींच्या प्रजननाच्या कालावधीत अंड्यांच्या रक्षणासाठी आणि स्वरक्षणासाठी मगरी हल्ले करू लागल्या. त्याचा फटका नदीमध्ये मोटारी टाकून पाणी खेचणाऱ्या शेतकऱ्यांना, मासेमारी करणाऱ्यांना आणि पोहणाऱ्यांना बसला आहे.

अभ्यासकांच्या मते, मगरींच्या प्रजननकाळात नदीपात्रात जाणे टाळणेच इष्ट; पण प्रश्‍न हा उपस्थित होतो, की या भीतीच्या सावटाखाली राहायचे किती दिवस? मगरींच्या बंदोबस्तासाठी ठोस उपाय योजले जाणार की नाही? पतंगराव कदम वनमंत्री असताना त्यांनी मगरींच्या हल्ल्यातील जखमी व मृतांच्या नातेवाइकांना भरपाईची तरतूद केली, हा त्यातल्या त्यात दिलासा; मात्र मगरींपासून रक्षणासाठी केले जात असलेले उपाय तोकडे पडत आहेत. मगरींचा अधिवासही सुरक्षित राहील आणि माणसाचे जगणेही भीतीमुक्त होईल असा मध्यममार्ग काढणे आवश्‍यक आहे, नाहीतर नदीकाठचे ग्रामस्थच त्यांच्यापरीने यातून मार्ग काढू लागतील आणि मग रोगापेक्षा इलाज भयंकर होऊन बसेल.