आपण माणूस आहोत? जनावरं बरी आपल्यापेक्षा..!

आपण माणूस आहोत? जनावरं बरी आपल्यापेक्षा..!

गेल्या अनेक शतकांपेक्षा आपण आता अधिक सुसंस्कृत आहोत, असा टेंभा आपण मिरवत असतो. आपण शिकलो, आपली वैज्ञानिक दृष्टी विकसित झाली, हे मान्य आहे. पण, आपण माणूस म्हणून कसे आहोत? विदर्भातील अलीकडच्या काही घटना पाहिल्या, तर आपल्या माणूसपणाचा संशय यावा, अशी विदारक स्थिती आहे. अमरावतीलगतच्या बडनेरा शहरातील घटना पाहता आपल्याला माणूस म्हणवून घेण्याचा हक्क आहे की नाही, असा प्रश्‍न पडतो. केवळ हीच घटना नाही, तर खामगावातील प्रेयसीची निर्घृण हत्या असो किंवा नागपुरात एका तरुणीने आई-वडिलांचा थंड डोक्‍याने केलेला खून असो, सारेच अतर्क्‍य आहे.

संवेदनशीलतेचा अभाव
बडनेरा येथे एका रेल्वे कर्मचाऱ्याने व त्याच्या पत्नीने नात्यातील बारा वर्षांची एक मुलगी बिहारमधून घरकामासाठी आणली. त्यांनी केलेल्या तिच्या छळाची कहाणी ऐकली तर अंगावर शहारे येतात. हातपाय बांधून, विवस्त्र करून मारपीट हा साधा प्रकार म्हणावा, इतका अमानुष छळ त्यांनी केला. काय दोष होता त्या मुलीचा? त्या मुलीच्या पालकांची आर्थिक स्थिती चांगली नसेल, त्यामुळे मुलीचे भविष्य तरी चांगले व्हावे, या आशेने तिच्या पालकांनी त्यांचा पोटचा गोळा या नातेवाईक जोडप्याच्या स्वाधीन केला; पण या जोडप्याने माणुसकीला काळिमा फासला. त्यांचा छळ असह्य झाल्याने ही मुलगी घरातून पळाली. पोलिसांना ती रडताना आढळल्याने हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्या कर्मचाऱ्याला अटक केली. पण त्याआधी या मुलीचा छळ पाहिलेल्या एका नागरिकाने मार्चमध्ये पोलिसांना याची माहिती दिली होती. पोलिसांनी जोडप्याला ताब्यातही घेऊन मुलीला बालकल्याण समितीसमोर हजर केले; पण तिने भीतीपोटी काहीही सांगितले नाही. पोलिसांनी आणि बालकल्याण समितीने थोडी संवेदनशीलता, गांभीर्य दाखवले असते, तर तेव्हाच या मुलीचा छळ थांबवता आला असता. परराज्यातून आलेली अल्पवयीन मुलगी, जिला इथली भाषा, इथले वातावरण नवीन असल्याने ती भांबावलेली, घाबरलेली असणे स्वाभाविक होते. अशा स्थितीत तिने काही सांगितले नाही आणि समितीने तिचे पालनपोषण करण्याच्या व तिला शिक्षण देण्याच्या आश्‍वासनावर तिला त्याच नराधमांच्या स्वाधीन केले.

पोलिस यंत्रणेचे अपयश
दुसरी घटना खामगावातील आहे. केवळ लग्नाला नकार दिला म्हणून प्रियकराने प्रेयसीचा वस्तऱ्याने खून केला. उज्ज्वल भविष्याचे स्वप्न पाहत परीक्षेला गेलेली ही तरुणी घरी पोचलीच नाही. नागपुरात तर एका तरुणीने प्रियकराच्या मदतीने प्रेमात व संपत्तीच्या मोहात अडसर ठरणाऱ्या आई-वडिलांनाच ठार मारले. अतिशय थंड डोक्‍याने तिने पालकांना संपवले व नंतर पुरावेही नष्ट केले; पण ‘व्हॉट्‌सअप’ मेसेज नष्ट करण्याच्या प्रयत्नात ती अडकली. तिकडे चंद्रपुरात दिलेले कर्ज फेडले नाही म्हणून खासगी सावकाराने कर्जदार जोडप्याला पेटवून दिले. गेल्या एक-दोन महिन्यांतील या घटना राज्यातील गुन्हेगारी वाढल्याचे द्योतक आहे. सरकारी प्रशासन, पोलिस यंत्रणा अपयशी ठरली आहे, हे नाकारता येत नाही. गडचिरोली जिल्ह्यात तर रोज उघडपणे नक्षलवादी धमक्‍यांचे फलक लावत आहेत आणि पोलिसांच्या ते लक्षातही येत नाहीत. त्यामुळे पोलिस यंत्रणा कुठे आहे, असे म्हणता येईलही, पण समाजाचे काय?

माणूसपण हरवते आहे
बडनेराची घटना असो, की खामगाव, नागपुरातील... समाज कोणत्या दिशेने जात आहे, याचा गांभीर्याने विचार करावाच लागेल. पोलिस आणि प्रशासनही त्याच समाजरचनेचा भाग असले तरी, केवळ त्यांच्यावर सारी जबाबदारी टाकून समाजाला हात वर कसे करता येतील? श्रीमंतीचे आकर्षण असलेल्या एखाद्या तरुणीला आई-वडील आपल्या आंतरधर्मीय लग्नाला विरोध करतात, म्हणून त्यांना संपवावेसे वाटते, प्रेयसीचा नकार पचवता येत नाही म्हणून एखादा तरुण तिला क्रूरपणे संपवतो. एखादे जोडपे एका बालिकेचा अमानुष छळ करते, यात समाजाचाही दोष आहे की नाही? आपली मुले काय करतात, हे किती पालकांना माहीत असते? बडनेराच्या घटनेत कुण्या एकाच्या मनातील माणूस जिवंत होता. त्याने लगेच पोलिसांना कळवले होते; पण जेथे माणूसपण हरवले आहे, तेथे माणुसकीची अपेक्षा तरी कशी करायची? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एका भजनात म्हणतात - ‘माणूस द्या मज माणूस, ही भीक मागता प्रभू दिसला.’ जेथे देवालाच माणूस दिसत नाही, तो माणसाची भीक मागतो, तेथे सारे काही शासन-प्रशासनावर कसे सोडता येईल?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com