राजेंची रेंज रोव्हर अन्‌ आपण..!

range rover
range rover

काँग्रेसचा हात सोडत नुकतेच कमळ हाती घेणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांचं भोपाळमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं. अर्थात ते राजेंच्या शाहीपणाला साजेसंच होतं; या वेळी बोलताना त्यांनी एक महत्त्वाची उद्‌घोषणा केली, कार्यकर्त्यांच्या सत्काराला उत्तर देताना राजे उद्गारले, ‘‘राज्यामध्ये मी आणि शिवराजसिंह चौहान दोघेच असे नेते आहोत, ज्यांच्या कारमधील एसी कधीच सुरू होत नाही.’

महाराजांचंच हेच वक्तव्य सध्या राजकीय वर्तुळात विनोदाचा विषय बनलं आहे. ‘राजे रेंज रोव्हर चालवितात, पण एसी मात्र वापरत नाहीत ’, असं लोक थट्टेनं म्हणू लागले आहेत. अर्थात लोकांच्या चर्चेला फारसं गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. यातील ज्योतिरादित्य शिंदेंच्या वक्तव्याचा राजकीय मतितार्थ समजून घेणं गरजेचं आहे. राजेंनी केंद्रीय वास्तवाची कबुली देतानाच भारतीय राजकारणातील अवडंबर मांडलं आहे. ते म्हणजे ‘तुम्ही कितीही श्रीमंत असा, तुम्हाला या सगळ्या शाही लवाजम्याचा आपण कसा त्याग करत आहोत ते मिरवावं लागतं.’ यासाठी तुमची पार्श्वभूमी चहा विक्रीचीच असावी असं काही अनिवार्य नसतं.

सध्या राष्ट्रीय राजकारणातील  एक चमकदार ‘चायवाला’ सर्वज्ञात आहे, लंडनमध्ये २०१८ साली झालेल्या एका कार्यक्रमात प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांनी त्या चायवाल्याला एक मोठं प्रशस्तीपत्रही देऊन टाकलं होतं. जोशी बुवांनी त्या चायवाल्याला विचारलं होतं, ‘इतनी फकिरी आप में कहाँ से आयी, त्यावर त्या चहावाल्यानंही मी फकिरीमध्ये जन्मलेला आहे, असं उत्तर दिलं होतं.  आपल्याला या निमित्तानं तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. एक म्हणजे सर्व प्रकारचा उच्चभ्रूपणा हा आपण सत्ताधारी वर्गाशी जोडत असतो. कोणताही सामंतशाही वृत्तीचा जमीनदार अथवा महाराजा आपल्या देशात सर्वोच्च स्थानी पोचलेला नाही. त्याचवेळी कोणत्याही फकिराने ही कामगिरी फत्ते केलेली नाही. मोदी हे केवळ एकमेव असे राजकारणी आहेत ज्यांना सत्तेच्या सर्वोच्च स्थानी पोचल्यानंतर साधुत्व मिळालं आहे. तिसरी बाब म्हणजे एखाद्या प्रसंगी सामंतशाही मानसिकतेचा राजा निवडून आलाच तरी त्याचे समर्थक आणि मतदार यांच्या घोषणा ठरलेल्या असतात, त्या म्हणजे ‘राजा नहीं फकीर है, देश की तकदीर है.’ आपण येथे दिवंगत व्ही. पी. सिंह यांच्याबाबत बोलत आहोत. मागील सात दशकांपासून मी तीन खऱ्याखुऱ्या सामंतशाहीवादी मानसिकतेच्या नेत्याचा शोध घेतो आहे, जे खूप लोकप्रिय आहेत आणि ते एका राज्यातून निवडूनही येऊ शकतात. त्यात मला दोघे जण सापडले, एक म्हणजे पंजाबमधील कॅ. अमरिंदरसिंग आणि दुसऱ्या राजस्थानातील ज्योतिरादित्य यांच्या काकू वसुंधराराजे. 

अन्य नेत्यांचे काय?
अन्य सामंतशाहीचा वारसा नसणाऱ्या राजकारण्यांच्या बाबतीत काहीसं वेगळं चित्रं दिसतं. त्यांची पहिली पिढी संघर्ष करत मोठी होते, पण त्यांचे वारसदार मात्र नवे प्रस्थापित उच्चभ्रू, सामंतशाही मानसिकतेचे बनतात. अगदी नेहरू आणि गांधी हे दोघेही श्रमजीवी वर्गातून आलेले नव्हते. पण लालबहाद्दूर शास्त्री, जगजीवन राम, बन्सी लाल, शरद पवार, मुलायमसिंह, लालू यादव, करुणानिधी आदींची गोष्टच न्यारी. त्यांचे वारसदार आता महागड्या घड्याळी घालतात. अलिशान गाड्या मिरवतात, महागडे पेन वापरतात, जे मोदी करतात ते सगळं ही मंडळी करत असतात. पण त्या सर्वांनाच जनतेमधील त्यांची प्रतिमा कनवाळू आणि साधी असावी असं वाटत राहतं. मग यासाठी ही मंडळी त्यांची गुपिते सांगत राहतात. ती म्हणजे कारमध्ये असतानाही आम्ही कधी एसी वापरत नाही, भलेही ती कार रेज रोव्हर असो अथवा अन्य कोणतीही. अवडंबर हीच भारतीय राजकारणाची अनिवार्यता असून काहीशी ती धर्मनिरपेक्षही आहे. त्यामुळे राहुल यांना मागासवर्गीयाच्या घरी जेवावे लागते. कमलनाथ हेदेखील प्रचाराच्या काळामध्ये त्यांच्या सोबत हॅरोडच्या कुकीजचा बॉक्स ठेवतात. अनेक काँग्रेसजनांचे राजकुमार अशाच दुहेरी पद्धतीने वागताना दिसतात.

लोकांना देखावा आवडतो
लोकांनाही वास्तव माहिती असतं, पण त्यांनाही या देखाव्यावर प्रेम करायला आवडतं. ‘माझा नेता सामान्य आहे’ ही भारतीय राजकारणातील सर्वाधिक मारक भावना आहे. म्हणूनच आपल्याकडे डोनाल्ड ट्रम्पसारखे नेते निवडून येऊ शकत नाहीत. देशातील अतिश्रीमंतांवर त्याच देशातील अन्य श्रीमंत आणि दुर्दैवी गरिबांनाही विश्‍वास ठेवावा लागतो. आमचा राजकीय पूर्वेतिहास हा असा आहे, आमच्या पाठ्यपुस्तकांमधील धडे काय सांगतात? पं. जवाहरलाल नेहरू यांचं उदाहरण घेऊ. पं. नेहरूंचे कपडे इस्त्रीसाठी स्वित्झर्लंडला जात असत, असं सर्रास सांगितलं जातं. पण नेहरूंनी ही सगळी श्रीमंती सोडून लोकांसाठी संघर्ष केला, तुरुंगवास भोगला, हे मात्र शिकवलं जात नाही. यातून एक वेगळं मॉडल तयार होतं, ते म्हणजे तुम्ही सर्वसामान्य घरात जन्मला नसला तरीसुद्धा तुम्हाला तसं रूप दिलं जातं. लालबहाद्दूर शास्त्री यांची गोष्टच वेगळी होती, ते खरोखरच सामान्यांसारखे जगले. यात वाजपेयी, नरसिंहराव आणि डॉ. मनमोहनसिंग यांचा समावेश करता येणार नाही, कारण त्यांचा राजकीय  
वारसदार नाही.
अनुवाद - गोपाळ कुलकर्णी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com