भारताने पापणी न लवू देता युद्धाचा धोका वास्तव असल्याचे समजून....

India-China
India-China

चीनची लष्करी जमवाजमव म्हणजे निव्वळ धाकदपटशाची मुत्सद्देगिरी असेल तर? त्या स्थितीतही भारताने पापणी न लवू देता युद्धाचा धोका वास्तव असल्याचे समजून सज्ज झाले पाहिजे. चीनने युद्धसदृश वातावरण निर्माण करून लडाखनजीक तोफखान्यासह प्रचंड लष्करी बळ जमा करण्याची कारणे कोणती असावीत? त्यांना भारताकडून नेमके काय हवे आहे? 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भारताची मानसिकता आजही बुद्धिबळाच्या पटापुरती मर्यादित असली, तरी चीनचा पट मात्र ‘गो’ या अडीच हजार वर्षांपूर्वीच्या खेळासारखा विशाल आहे. बुद्धिबळात तुम्ही विरोधकाच्या राजाला लक्ष्य करता. गोमध्ये मात्र प्रतिस्पर्ध्याच्या मार्गात अनेक अडथळे आणून आणि त्याची कोंडी करून अखेरीस गुडघे टेकायला लावण्याची रणनीती असते. शत्रूच्या भूप्रदेशाभोवतीचा जास्तीत जास्त भाग ताब्यात घेऊन वर्चस्व स्थापन केले जाते. विचार करण्याची ही पद्धत लक्षणीय आहे.

ठोकळेबाज सांस्कृतिक वर्गीकरण डोक्यात ठेवून विचार करण्यात दुहेरी धोका आहे. आजचे चीन आणि भारत म्हणजे नवीन व्यामिश्रतांचा अंतर्भाव असलेल्या आधुनिक प्रणाली आहेत. घासून गुळगुळीत झालेल्या संकल्पनांच्या आधारे त्यांचा ठाव घेता येणार नाहीच. म्हणूनच पुढे सरकून वर्तमान वास्तवात दाखल झाल्यास आपल्याला काही स्वीकारार्ह उत्तरे मिळू शकतील. आता, चीनची लडाखमध्ये काय लुडबुड सुरू आहे? त्यांना काय हवे आहे? सुमारे २० वर्षे मागे जा आणि पाकिस्तानशी भारत कसे वर्तन करत आहे, ते पाहा. त्याचबरोबर भारताने शोधलेली सामरिक संकल्पना लक्षात असूद्या : आक्रमक कूटनीती.

संसदेवर डिसेंबर २००१ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने हाती घेतलेल्या ‘ऑपरेशन पराक्रम’बाबत माहिती देताना ही संकल्पना मांडण्यात आली होती. त्या मोहिमेत सीमेवर भारतीय लष्कराची जमवाजमव, प्रचंड शस्त्रसाठा आणि दारूगोळ्याची सज्जता करण्यात आली होती. जणू काही ती युद्धाची तयारीच होती. आता पूर्वेकडील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेकडे पाहिल्यास सद्यस्थिती ओळखीची वाटते का? चीनने प्राचीन ज्ञानाचा वापर न करता भारताच्या पुस्तकातील एखादे पान उघडले असावे का? चीनने अभूतपूर्व प्रमाणात आणि बव्हंशी दृश्य पद्धतीने तैनात केलेले लष्करी बळ म्हणजे भारतावरील धाकदपटशाच्या मुत्सद्देगिरीचा प्रयत्न आहे का? तसे असल्यास, भारताकडून कोणत्या प्रतिसादाची अपेक्षा आहे?

भारताने ‘कोअर्सिव्ह डिप्लोमसी’ वापरून काय साध्य केले, त्याला पाकिस्तानने कसा प्रतिसाद दिला, अशी तुलना करत करण्यातील जोखीम मला मान्य आहे. भारत म्हणजे पाकिस्तान नव्हे, हे मान्यच; परंतु आपण केवळ युद्धाचा खेळ खेळत आहोत.

पाकिस्तानने दहशतवादाचा वापर राजकीय धोरण म्हणून करणे थांबवण्याची हमी द्यावी, हीच भारताची अपेक्षा होती. संसदेवरील हल्ल्यानंतर महिनाभरातच ही अपेक्षा पूर्ण झाली. जगभरात प्रसारित झालेल्या भाषणात मुशर्रफ यांनी अगदी तशीच ग्वाही दिली. परंतु भारताला अधिक ठोस कार्यवाही हवी होती. परिणामी, युद्धसदृश वातावरण कायमच राहिले. दोनेक वेळा तर परिस्थिती जवळपास हाताबाहेर गेली. विशेषत: जम्मूनजीक कालूचाक येथे दहशतवाद्यांनी भारतीय जवानांच्या कुटुंबांवर हल्ला केला, तेव्हा तणाव आणखी वाढला. त्या वेळीही संयम पाळण्यात आला. पाकिस्तानवरील दबावाबरोबरच महत्त्वाचे म्हणजे भारताचा युद्ध सुरू करण्याचा हेतू कधीही नव्हता.

या घडामोडींमध्ये परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याचा धोका कधीही नव्हता का, या प्रश्‍नाला ‘आक्रमक मुत्सद्देगिरी यशस्वी होण्यासाठी धमकी इतकी खरी असावी लागते; की त्यावर आपणही विश्वास ठेवू लागतो,’ असे उत्तर त्या वेळच्या नेत्यांकडून मिळाले होते. ही प्रबळ शक्तीची धाडसी खेळी होती. म्हणूनच सध्या असलेली परिस्थिती ओळखीची वाटते का, भारत आता त्याच समीकरणाच्या दुसऱ्या बाजूला आहे. म्हणून इतिहासातून पुढील धडे निश्चितच घेता येतील.

  • कधीही पापणी लवू देऊ नका. व्यवहार्य दृष्टिकोन ठेवून खुल्या मनाने पडद्यामागे वाटाघाटी करा. 
  • काय हवे आहे, ते जाणण्यासाठी पुरेसा वेळ घ्या. दबावाखाली काहीही मान्य करू नका.
  • दीर्घकालीन संघर्षासाठी सज्ज राहा. पूर्णत: सज्ज होणे आणि त्यांची दमछाक करणे, हेच योग्य धोरण असेल.
  • कोणत्याही दोन परिस्थिती एकसारख्या नसतात, हे सदोदित ध्यानात ठेवा. म्हणूनच हातघाईच्या प्रसंगासाठी तयारीत राहा. 

(अनुवाद - विजय बनसोडे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com