‘कोरोना’च्या काळातील पत्रकारिता

Coronavirus
Coronavirus

कोरोना विषाणू ही पत्रकारांसाठी त्यांच्या करिअरमधील सगळ्यांत मोठी बातमी आहे. आपल्या भोवतालच्या शंभर कोटींपेक्षा अधिक नागरिकांना भावी पिढीसाठी आपल्याकडून अपेक्षा आहेत. या काळात होणारा अन्याय आणि सरकारी यंत्रणेच्या अपयशाकडे आपण लक्ष वेधायला हवे, अशी त्यांची अपेक्षा आहे.

आपल्यामधील दोष आणि अन्य कमतरतांकडे तसे बघितले तर दुर्लक्ष केले जाते. कारण, नागरिकांना पत्रकार काय करतात, याची माहिती आहे. अनेक दशकांच्या पत्रकारितेच्या काळात माझ्याशी एकदाही असभ्य वर्तनाचा प्रकार घडलेला नाही. समोरच्या व्यक्तीला क्रोधित होण्याचे कारण असतानाही असा प्रकार कधी घडला नाही. दंगली, घुसखोरी, आपत्ती, निवडणूक प्रचार अशा सर्व काळात पत्रकारांशी चागले वागले जाते; नव्हे त्यांचा सन्मान राखला जातो. अगदी एखादा बाहुबली आपल्या ताटातले अन्न वाटून घेत तुम्हाला सुरक्षितस्थळी पोचवूनही देतो. हे सारे कुठून येते? अनेक प्रकारची विविधता जोपासणाऱ्या या देशातील कोट्यवधी नागरिकांना ‘पत्रकार’ हे समाजासाठी महत्त्वाचे आहेत, हे कोण शिकवतो?

निवडणुकीचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या एखाद्या अनोळखी पत्रकाराचेही जोरदार आगतस्वागत केले जाते. अगदी खेड्यातील गरीब घरातील महिलाही पत्रकाराला माहिती देण्यासाठी तेवढीच उत्सुक असते. हा भारतातील नागरिक आणि पत्रकारांमधील अनोखाच करार आहे. पत्रकार मेहनत आणि धाडसाने आपले काम करीत असतात, अशी सर्वसामान्यांची भावना आहे आणि हाच दोहोंमधील आदराचा पक्का दुवा आहे.

त्यामुळेच शासन वा पोलिस ऐकून घेत नसतील, तर आपले गाऱ्हाणे मांडण्यासाठी ते सर्वप्रथम धाव घेतात ती वृत्तपत्रांकडे. आज आपल्या देशापुढे कोरोनाचे संकट उभे ठाकले असताना नागरिकांना पत्रकारांकडून नेमकी हीच अपेक्षा आहे. हे संकट भारतातील पत्रकारितेची एकप्रकारे परीक्षाच घेणार आहे. येणाऱ्या पुढच्या पिढ्या आपल्याला याबाबत नक्कीच विचारणा करणार आहेत.

कोरोनाच्या घातक साथीशी लढताना प्रत्येकच देश अंतर्गत प्रश्‍नांच्या जाळ्यात अडकत आहे आणि प्रत्येक जण व्यक्तिगत प्रश्‍नांच्या. गुरुवारी देशवासीयांना संबोधित करताना पंतप्रधानांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. तो म्हणजे, आजच्या घडीला एकही देश दुसऱ्या देशाला मदत करण्याच्या स्थितीत नाही. हा लढा भारताला एकट्यानेच लढायचा आहे. आपला देश जटिल आणि विस्कळित स्वरूपाचा असून, या देशातील मोठ्या लोकसंख्येकडे साधनांची कमतरता आहे. आपणा पत्रकारांना या देशात एक मोठी भेट मिळाली आहे; ती म्हणजे स्वातंत्र्य आणि आदर. प्रसारमाध्यमांचे स्वातंत्र्य कायदा वा राज्यघटनेच्या विशिष्ट कलमांमध्ये नियमांकित केलेले नाही. घटनेच्या १९व्या कलमाने या देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क दिले आहेत. यात पत्रकारांना कोणतेही विशेषाधिकार देण्यात आलेले नाहीत.

इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू करेपर्यंत पत्रकारांनी आपले स्वातंत्र्य गृहीत धरले होते. जेव्हा गांधी यांनी पत्रकारांचे हे स्वातंत्र्य हिरावून घेतले तेव्हा पत्रकारांना कुठेही जाता आले नाही. अगदी न्यायालयाकडेही त्यांना दाद मागता आली नाही. इंदिरा गांधी यांनी वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य हिरावून घेणे, हे आजच्या तुलनेत अधिक अशिक्षित आणि अधिक गरीब असलेल्या जनतेला रुचले नाही. त्यांनी असे करणे, हा चिल्लरपणा असल्याचे जनतेला वाटले. यातूनच पत्रकारांप्रती असलेल्या आदराचा भाव देशात वाढीला लागला. पत्रकारांच्या मुस्कटदाबीचा प्रकार कुठल्याही सरकारकडून अपेक्षित नाही, अशी त्यांची भावना आहे. पत्रकारांच्या स्वातंत्र्याचे एवढे मोल जनतेला असेल, तर आपण या कसोटीवर खरे ठरतोय की नाही, याचा निवाडा करणेही त्यांच्याच हाती आहे.

आपण एका महत्त्वाच्या आणि अत्यावश्‍यक सेवेचा भाग आहोत, यावर आपल्याला विश्‍वास हवा. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात दोनदा मीडिया अत्यावश्‍यक सेवेचा भाग असल्याचा उल्लेख केला. डॉक्‍टर, रुग्णालयातील कर्मचारी, पोलिस आणि शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पत्रकारांचाही उल्लेख अत्यावश्‍यक सेवेत होणे ही अभिमानाची बाब आहे. त्यामुळे या संकटाच्या काळात आपण प्रश्‍न विचारून सरकारला भंडावून सोडू. याचा ते प्रतिवाद करतील. हा खेळ असाच सुरू राहील. याकडे दुर्लक्ष करून आपल्याला काम करायचे आहे. त्यामुळे कंबर कसून तयार राहा. कोरोनाच्या काळातील पत्रकारिता यासारखी दुसरी कोणतीच बातमी नाही.
(अनुवाद : किशोर जामकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com