esakal | खादिम रिझवी : कट्टरवादाचा चेहरा
sakal

बोलून बातमी शोधा

khadim hussain rizvi

पाकिस्तानच्या कट्टरपंथी इस्लामी राजकारणाचे प्रतीक असलेल्या खादिम हुसेन रिझवी याच्या मृत्यूनंतरही पाकिस्तानमधील धार्मिक कट्टरतावादाचे आव्हान कमी होण्याची शक्‍यता नाही. बेरोजगारीच्या दलदलीत अडकलेल्या तरुणांमध्ये यापुढेही कट्टरतावादाचे आकर्षण कायम राहणार आहे.

खादिम रिझवी : कट्टरवादाचा चेहरा

sakal_logo
By
शेखर गुप्ता

पाकिस्तानच्या कट्टरपंथी इस्लामी राजकारणाचे प्रतीक असलेल्या खादिम हुसेन रिझवी याच्या मृत्यूनंतरही पाकिस्तानमधील धार्मिक कट्टरतावादाचे आव्हान कमी होण्याची शक्‍यता नाही. बेरोजगारीच्या दलदलीत अडकलेल्या तरुणांमध्ये यापुढेही कट्टरतावादाचे आकर्षण कायम राहणार आहे.

भारतीय प्रसारमाध्यमांनी ५४ वर्षीय खादिम रिझवीच्या मृत्यूचा ओझरता उल्लेख केला आहे. गेल्या आठवड्यातच फ्रान्सविरोधात आंदोलन करत त्याने इस्लामाबादला वेढा दिला होता. या आंदोलनादरम्यान त्याने आग ओकणारे भाषण केले. त्याचे व्हिडिओ बघितल्यास रिझवीच्या मजबूत तब्येतीचा अंदाज येऊ शकेल. तरीही त्याच्या अचानक मृत्यूने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पाक लष्कराचा आवडता असलेल्या खादीमचा मृत्यू कोविडमुळे झाल्याचे सांगण्यात येत आहे; मात्र खादीमच्या मृत्यू प्रमाणपत्रावर तसा उल्लेख नाही. त्यामुळे त्याच्या अकाली मृत्यूमुळे सोशल मीडियावर अफवांना पेव फुटले आहे. खादीमला कुठलाही आजार नव्हता. मात्र त्याला ताप आला होता आणि श्वसनाचा त्रास होत होता, अशी चर्चा आहे. मात्र खादिम रिझवीने अलीकडे केलेली भाषणे बघितल्यास यावर अनेकांना विश्‍वास ठेवणे कठीण जात आहे. नुकत्याच इस्लामाबादच्या मोर्चात तर तो सत्ताधाऱ्यांवर बरसला होता. ‘आंदोलनासाठी मला तुमची (सरकारची) परवानगी घेण्याची गरज नाही. पाकिस्तान तुमच्या बापाचा आहे का?’ या शब्दांत त्याने इम्रान सरकारला ललकारले होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रिझवी मूळचा पंजाब प्रांतातील पोटहर भागातील रहिवासी. याच भागातून खादीमसारखे अनेक कट्टरपंथीय चेहरे समोर आले. रिझवीचा अनेक सैनिकांवरही प्रभाव होता. त्याचप्रमाणे त्याचा पाकिस्तानी अधिकारी आणि लष्कराचाही प्रभाव होता. रिझवीच्या इस्लामाबादला घेरण्याच्या आंदोलनामुळे इम्रान खान सरकारला चांगलाच धक्का बसला होता. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी केलेल्या इस्लामबद्दलच्या विधानावर खादिम संतप्त होता. फ्रान्ससोबत राजनैतिक संबंध तोडावे आणि देशातील फ्रान्सचे दूतावास बंद करावे, अशी त्याची मागणी होती. आपल्या समर्थकांना फ्रान्सच्या अध्यक्षांचा शिरच्छेद करण्याचे आवाहनही त्याने केले होते. फ्रान्समध्ये सॅम्युअल पॅटीचा शिरच्छेद करणाऱ्या चेचेन्याच्या अल्पवयीन मुलाला, रिझवीने गाझी (धर्मयोद्धा) घोषित केले होते. जगभरात मुस्लीम बांधवांनी या प्रकारचे हल्ले चढवावेत,  असे आवाहन तो करत होता. फ्रान्सला नष्ट करण्यासाठी पाकिस्तानचे अणुबाँब वापरु, असा इशाराही तो देत होता. यापूर्वीही त्याने अशा धमक्या दिल्या आहेत. रिझवीने इस्लामाबादमधील आंदोलन काही तडजोडीनंतर मागे घेतले होते. इम्रान खान सरकारने आपल्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत; फ्रान्ससोबत अधिकृत राजनैतिक सबंध तोडण्याचा प्रस्ताव संसदेत मंजूर होईल, असा दावाही त्याने केला. त्यासाठी दबाव टाकण्यासही त्याने सुरूवात केली होती. त्यामुळेच तो ऐन कोरोनाकाळात सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू लागला होता. कदाचित यामुळेच तो कोरोनाचा शिकार ठरला, असेही आता बोलले जात आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कायद्यातही केला बदल
नवाज शरीफ यांच्या कार्यकाळात रिझवीने लोकप्रियतेचे शिखर गाठले. निवडणुकीच्या उमेदवारी अर्जात बदल करण्याची त्याची मागणी होती. पैगंबर यांच्याशिवाय मी कोणाचीही शिकवण मान्य करत नाही’, हे उमेदवाराने मान्य करावे, अन्यथा तो निवडणुकीतून बाद होईल, अशा प्रकारचा हा बदल होता. रिझवीच्या दबावामुळे नवाज सरकारने हे बदल मान्य केले. प्रेषितांबरोबर इतर धर्मगुरूंना मानणाऱ्या अल्पसंख्याक अहमदिया समाजाला बाहेर ठेवण्यासाठी हा डाव रचला गेला होता; मात्र प्रत्यक्षात सरकारने शपथेऐवजी केवळ घोषणा म्हणून या कलमाचा उल्लेख केला. त्यामुळे हा इस्लामविरोधात कट असल्याचा आरोप करत त्याने आंदोलन पेटवले. शेवटी नवाज सरकारला ‘लिपीकाने केलेली चूक’, असे स्पष्टीकरण द्यावे लागले आणि कायदा मंत्र्याला हटवावेही लागले. 

राजकारण प्रवेश
2018 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ईश्वरनिंदा प्रकरणात आसिया बिबीला निर्दोष सोडले. या निर्णयाविरुद्ध रिझवीचे रान उठवले. अनेक देशांनी आसियाला आश्रय देण्याचा प्रस्तावही दिला होता. त्यामुळे प्रशासनाचे हात बांधले गेले होते. आसिया बिबीला सुरक्षित ठेवणे हे लष्कराच्या दृष्टीने मोठ आव्हान होते. शेवटी तिला रावळपिंडीच्या हवाई तळावर नेऊन नंतर खासगी विमानाने नेदरलॅंडमध्ये हलविण्यात आले. या घटनेनंतर रिझवीचे आंदोलन सुरु झाले.

ईश्वरनिंदा केल्याच्या आरोपावरुन ‘जिंदगी तमाशा’ नावाच्या चित्रपटावर बंदी घालण्यास सरकारला त्याने भाग पाडले. त्याच्या चिथावणीमुळे विद्यापीठ आणि कॉलेजमधील काही प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची ईश्वरनिंदा केली म्हणून हत्या करण्यात आली होती. मारेकरी हे रिझवीच्या संघटनेशी संबधित होते. मात्र रिझवीने ते मान्य केले नाही. रिझवीने नंतर त्याच्या संघटनेचे राजकीय पक्षात रुपांतर केले होते. ‘तेहरीक-ऐ- लब्बाक पाकिस्तानी’ या नावाखाली त्याने निवडणूका लढवल्या. मात्र त्याच्या उमेदवारांना फारशी मते पडली नाहीत. 

सत्तेत असणाऱ्या इम्रान खानच्या पक्षाची विचारधारा कट्टरवादाकडे झुकणारी आहे. २०१९ मध्ये इम्रान खानने संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाषण केले. त्यामध्ये प्रेषितांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करु नये, यापासून दूर रहा, अशा इशारा त्याने पाश्‍चिमात्य देशांना दिला होता. अप्रत्यक्ष ईश्वरनिंदेचा कायदाच इम्रान खानने सांगितला होता. रिझवीदेखील पंजाबी भाषेत नेमके हेच सांगायचा. मतदारांसाठी या दोन्ही पक्षांची विचारधारा समान होती. रिझवी आता संपला आहे; मात्र बेरोजगार, अशिक्षीत, गरिबीत खितपत पडलेल्या पाकिस्तानी तरुणांवर त्याच्या कट्टरवादाचा पगडा कायम राहणार आहे. भविष्यात रिझवीचा जागा अजून कुणीतरी घेईल. कदाचित तो रिझवीपेक्षाही पुढे जाईल. तोपर्यंत  पाकिस्तानी परंपरेनुसार रिझवीच्या मृत्यूचे रहस्य कायम राहणार आहे.

राजकीय उदयामागील कारण
रिझवीचा जन्म १९६६ मधील. मात्र, ४ जानेवारी २०११ या दिवशी पंजाब प्रांताचे राज्यपाल सलमान तासीर यांची मुमताज कादरी या सुरक्षारक्षकाने गोळ्या घालून हत्या केली आणि खऱ्या अर्थाने त्याचा राजकीय आणि आधात्मिक उदय झाला. धर्मनिरपेक्ष विचाराच्या तासीर यांनी  ईश्वरनिंदा प्रकरणी दोषी असलेल्या असिया बिबीबद्दल त्यांनी सहानुभूती व्यक्त करत,  ईश्वरनिंदा कायद्यात सुधारणा करण्याची मागणी त्यांनी केली आणि हीच मागणी त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरली. कादरी हा सुफी बारलेवी इस्लामिक शाळेचा अनुयायी होता आणि रिझवी या शाळेचा सर्वात प्रभावशाली धर्मगुरू होता. रिझवीच्या चिथावणीमुळे कादरीने सलमान तासीर यांची हत्या केली. या हत्येनंतर रिझवी पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. तासीर याची हत्या करणाऱ्या कादरीला त्याने गाझी म्हणून घोषित केले. मात्र सरकारने कादरीला फासावर चढविल्याने संतप्त झालेल्या रिझवीने देशभर आंदोलन छेडले. ‘तेहरीके लब्बाक या रसूल अल्लाह’ या संघटनेचा सह संस्थापक असलेल्या मुहम्मद अफजल कादरीने तर थेट सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या हत्येचा फतवा जारी केला. सुदैवाने कुणी हे धाडस कोणी केले नाही. मात्र, या घटनेनंतर रिझवीचा प्रभाव वाढत चालला होता. असाक्षरता, बेरोजगारीने त्रस्त झालेल्या पंजाब आणि सिंध प्रांतातील अनेक तरुण रिझवीचे कट्टर समर्थक बनत गेले. त्याने स्वत:ला अल्लामा (महान धार्मिक अभ्यासक) म्हणून घोषित केले होते.

(अनुवाद - विनोद राऊत)

Edited By - Prashant Patil

loading image
go to top