esakal | सोशल डिस्टन्सिंग आणि लैंगिकता
sakal

बोलून बातमी शोधा

Social-Distencing

पती-पत्नीतील सुरक्षित लैंगिक संबंध ही लॉकडाउनच्या काळातील एक महत्त्वाची बाब आहे. लॉकडाउनच्या काळात आणि नंतरही एक जबाबदार व्यक्ती म्हणून नव्या जाणिवेने, नव्या पद्धतीने वैयक्तिक व दांपत्य जीवन स्वीकारण्याची आणि समृद्ध करण्याची गरज आहे.

सोशल डिस्टन्सिंग आणि लैंगिकता

sakal_logo
By
डॉ. वैजयंती पटवर्धन

पती-पत्नीतील सुरक्षित लैंगिक संबंध ही लॉकडाउनच्या काळातील एक महत्त्वाची बाब आहे. लॉकडाउनच्या काळात आणि नंतरही एक जबाबदार व्यक्ती म्हणून नव्या जाणिवेने, नव्या पद्धतीने वैयक्तिक व दांपत्य जीवन स्वीकारण्याची आणि समृद्ध करण्याची गरज आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आज सर्व जग ‘कोरोना’ नावाच्या अनपेक्षित, अनाकलनीय अशा महामारीच्या विळख्यात आहे. त्यामुळे सुमारे १८० देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. येणाऱ्या काळात जगाला अनेक भयंकर गोष्टींचा सामना करावा लागणार आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड, जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटी, व्हिक्‍टोरिया युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या संशोधनात असे आढळले, की या महामारीने स्त्रियांच्या आरोग्यावर खूप गंभीर परिणाम होऊ शकतात. निम्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या ११४ देशांमधील ४५ कोटी स्त्रिया आधुनिक गर्भनिरोधकाच्या वापरापासून वंचित असू शकतात. परिणामी नको त्या गर्भधारणेची ७० लाख प्रकरणे समोर येतील, तर सहा महिन्यांच्या लॉकडाउनमध्ये लैंगिक भेदभावाची तीन कोटी प्रकरणे समोर येतील. दुष्परिणामांची ही यादी कल्पनेपेक्षा खूप मोठी आहे, ही चिंतेची बाब आहे. या संकटावर प्रतिबंधात्मक उपाय करणे आताच शक्‍य आहे.

मुळातच आपल्या देशात जवळजवळ निम्म्या स्त्रिया / दांपत्ये कुटुंबनियोजन साधने वापरण्यापासून आजही वंचित आहेत. त्यात महत्त्वाची कारणे - साधने किंवा वैद्यकीय सल्ला आणि उपचार उपलब्ध नसणे, तसेच अज्ञान, भीती, गैरसमज ही आहेत. लॉकडाउनच्या काळात हा धोका सर्वाधिक असल्याची शक्‍यता आणि भीती जास्त आहे. 

लॉकडाउनच्या काळात अनेक जोडपी इच्छे-अनिच्छेने गेल्या ७-८ आठवड्यापासून एकत्र आहेत. अनेक निर्बंध आहेत. बाह्य वातावरणाचा तणाव, मृत्यूचे भयावह तांडव, मानसिक, आर्थिक तणाव आणि अशा वेळी एकमेकांची पूर्ण वेळ उपलब्धता! शिवाय तणावमुक्तीचा एक उपाय लैंगिक संबंध हा नक्कीच आहे. लॉकडाउनच्या काळात सोशल डिस्टन्सिंग हा सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सांगितला जात आहे. अशा वेळी शारीरिक संबंध- जी सर्वात जास्त शारीरिक जवळीक आहे, त्याबाबत शंका असणे स्वाभाविक आहे. या विषयावर उघड बोलण्यापेक्षा मौन पाळणे, मित्र/ सहकाऱ्यांचा सल्ला घेणे, इंटरनेटवर किंवा अन्य उपलब्ध साधनांद्वारे माहिती मिळवणे असे घडते, जी शास्त्रीय असेलच असे नाही. त्यात धोके उद्भवू शकतात. म्हणून लैगिकतेविषयी थोडे जाणून घेऊ.

सोशल डिस्टन्सिंगच्या काळात लैंगिक संबंध ठेवणे चालू शकते काय? या प्रश्नाचे शास्त्रीय उत्तर हो असे आहे. सुरक्षित लैंगिक संबंध ही लॉकडाउनच्या काळातली एक महत्त्वाची गरज आहे. कोरोना हा लिंगसांसर्गिक आजार असल्याचे आज तरी आढळलेले नाही. त्यामुळे लैंगिक संबंध ठेवता येतील. परंतु जास्त काळजीपूर्वक! सर्वात महत्त्वाचे म्हणजे पती-पत्नी किंवा आपल्या नेहमीच्या जोडीदाराबरोबरच संबंध ठेवणे सुरक्षित. संबंधाच्या वेळी खबरदारीचे उपाय करणे अत्यावश्‍यक आहे. हात साबण व पाण्याने स्वच्छ धुणे, स्वच्छ कपड्याचा वापर, वैयक्तिक स्वछता, सुरक्षित गर्भनिरोधकांचा वापर याशिवाय कुणालाही शारीरिक त्रास (उदा. ताप, कणकण) असल्यास संबंध टाळणे या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. या काळात जोडप्याच्या सामाजिक स्थितीनुसार लैंगिक समस्या असू शकतात.

लॉकडाउनमुळे काहीशा जबरदस्तीने कायम एकत्र राहण्याने शारीरिक संबंधांबाबत नवे प्रश्न उद्भवू शकतात. घर लहान असणे, घरात अनेक माणसे असणे, यामुळे पती- पत्नीला पुरेसा एकांत न मिळात्याने नात्यात तणाव, चिडचिड, संबंध परिपूर्ण न होणे, त्यावरून भांडणे- प्रसंगी शारीरिक हिंसा, लैंगिक अत्याचार असे गंभीर गुन्हे घडू शकतात.

वैचारिक आणि भावनिकदृष्ट्‌या दुरावलेल्या पति-पत्नीच्या नात्यात टोकाचे वितुष्ट येण्याची शक्‍यताही आहे. या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट ही की लैंगिक सुख फक्त शारीरिक पातळीवर नसते. नाते समाधानी असल्यास शारीरिक क्रियेतील कमतरता हा कमीपणा राहात नाही, हे दोघांनीही समजून घेतले पाहिजे.  मधुमेह, उच्च रक्तदाब अशा आजारांना योग्य वैद्यकीय सल्ल्याने नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे. या काळात अनोळखी व्यक्तीशी संबंध येणे धोक्‍याचे ठरेल. त्यामुळेच पती- पत्नी किंवा ‘लिव्ह इन’ जोडीदार एकत्र नसले, तर नवीन जोडीदाराशी शारीरिक जवळीक टाळणे इष्ट. या काळात गर्भपातासारखी शस्त्रक्रिया जोखमीची ठरू शकते. त्यामुळे योग्य खबरदारी घेऊन गर्भधारणा टाळावी.

अर्थात जगातील कुठलेही साधन प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक अपेक्षा पूर्ण करू शकेल असे नाही. आपल्या डॉक्‍टरांकडून आपल्याला योग्य अशी पद्धत निवडावी आणि स्वतःला असुरक्षित लैंगिक संबंधापासून सुरक्षित ठेवावे. लॉकडाउन हा ‘न भूतो न भविष्यती’ अशा अनुभवाचा, जाणिवांचा काळ, म्हणून त्याकडे पाहिले पाहिजे. या काळात आणि नंतरही एक जबाबदार व्यक्ती म्हणून नव्या जाणिवेने, नव्या पद्धतीने वैयक्तिक व दांपत्य जीवन स्वीकारले आणि समृद्ध केले पाहिजे.
(लेखिका स्त्री-आरोग्य व प्रसुतिशास्त्र तज्ज्ञ, विवाह समुपदेशक आहेत.)

loading image