रशियात इन, मिन, पुतिन!

रशियात इन, मिन, पुतिन!

रशियात आता राष्ट्रवादच प्रबळ ठरताना दिसत आहे; पण तो लोकशाहीच्या मखरात बसावा, ही लोकांची उत्कट इच्छा आहे; परंतु ती पूर्ण होईल असे सध्यातरी सांगता येत नाही.

रशियन अध्यक्षपदाची निवडणूक मार्चमध्ये होणार आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन अर्थातच पुनःश्‍च अध्यक्षपद भुषवू इच्छितात व म्हणून त्यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे. निवडणूक १८ मार्च या दिवशी होईल; पण २७ डिसेंबरला तीन लाख पाठिराख्यांच्या स्वाक्षऱ्या असलेली कागदपत्रे डौलाने मिरवत पुतीन यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगाकडे दाखल केला. अलेक्‍सी नावल्नी नावाच्या ४१ वर्षीय युवकाने ६५ वर्षांच्या पुतीन यांना विरोध करण्यासाठी स्वतःची उमेदवारी जाहीर केली; पण निवडणूक आयोगाने नावल्नी यांना त्यांच्या तुरुंगवारीची सबब दर्शवून हरकत घेतली आहे. परिणामतः नावल्नी हे उमेदवार या नात्याने अपात्र ठरले आहेत. आता अन्य कोण उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार, हे लवकरच कळेल; पण तूर्तास पुतीन हेच अध्यक्ष म्हणून पुन्हा निवडून येतील, अशी चिन्हे आहेत. गेली १८ वर्षे रशियाचे भाग्यविधाते म्हणून विख्यात झालेले पुतीन यांच्या कारकिर्दीविषयी जाणून घ्यायला हवे.

पुतीन २००० मध्ये रशियाचे अध्यक्ष म्हणून जगासमोर आले. तेव्हा रशियन संविधानाप्रमाणे चार वर्षे संपुष्टात आल्यावर म्हणजे २००४ मध्ये पुतीन पुनः निवडणुकीच्या रिंगणात उतरले. २००८ मध्ये म्हणजे दोन वेळा अध्यक्षपद भूषविल्यावर पुतीन हे पंतप्रधान झाले, तर दिमित्री मेदवेदेव अध्यक्षपदी विराजमान झाले. रशियन संविधानाप्रमाणे कुणीही नेता जास्तीत जास्त दोनदाच सलग अध्यक्ष होतो. तात्पर्य २००८ ते २०१२ अशी चार वर्षे अध्यक्षपदी न राहता पुतीन हे पंतप्रधानपदी बसले. २०१२ मध्ये अर्थातच नव्याने अध्यक्ष होण्यास त्यांना कसलीच आडकाठी नव्हती. सुदैवाने तेव्हाच संविधानात दुरुस्ती झाल्याने अध्यक्षीय कारकीर्द चारऐवजी सहा वर्षांची झाली. २०१८ मध्ये ही सहा वर्षे समाप्त होत आहेत व आता तर आणखी सहा वर्षांसाठी म्हणजे २०२४ पर्यंत पुतीन हे पुन्हा अध्यक्षपद भुषवणार आहेत. २०२४ मध्ये पुतीन यांची अध्यक्षीय कारकीर्द संपुष्टात येईल; पण तेव्हा जगाला कळून चुकले की जोसेफ स्टालीन यांच्या पाठोपाठ पुतीन यांचीच नोंद ‘प्रदीर्घ काळ अध्यक्षासनावर बसलेला रशियन नेता’ या शब्दांत अक्षरांकित झाली आहे.
अर्थात बोरीस येल्‌त्सिन यांच्यानंतर पुतीन रशियाचे अध्यक्ष म्हणून राज्यशकट चालवू लागले, तेव्हाच त्यांच्या कर्तृत्वाची जगाला प्रचिती मिळाली. येल्‌त्सिन सरकार चार बाबतीत अपयशी ठरले. एकतर लोकांना ‘अन्न-वस्त्र-निवारा’ तसेच ‘स्वास्थ्य, शिक्षा आणि सन्मान’ या गोष्टी पुरविणे, धनदांडग्या, भ्रष्ट बलदंडांना वठणीवर आणणे, तसेच सभ्य नागरिकांशी सौजन्याने वागणे या तीन कसोट्यांवर हे सरकार पराजित झाले. शिवाय आंतरराष्ट्रीय राजकारणातही या सरकारवर दिशाहीनतेचा शिक्का बसला. अशा पार्श्‍वभूूमीवर पुतीन सरकारची कामगिरी नक्कीच उजवी ठरली. सुदैवाने २००० च्या आसपास खनिज तेलाच्या किमतीचा आलेखही उंचावला. परिणामतः तेलाची यशस्वी निर्यात करून पुतीन सरकार स्वतःची तिजोरी समृद्ध करू शकले. मग लोकांना आवश्‍यक वस्तू व सेवा पुरवू लागले. धनदांडग्या मस्तवालांना तुरुंगात टाकण्याची, येलत्सिनच्या तुलनेने लोकशाहीची पथ्ये पाळण्याची पुतीन यांची शैली लोकप्रिय ठरली, हेही वास्तव आहे.

२००१ च्या अकरा सप्टेंबरला न्यूयॉर्कच्या टॉवरवर दहशतवादी हल्ला झाला व हल्लेखोरांचा म्होरक्‍या अफगाण भूमीवर आश्रयार्थ आहे, हे कळल्याबरोबर पुतीन यांनी भयग्रस्त अमेरिकेला सर्वतोपरी सहकार्य दिले व कुटनीतीच्या क्षेत्रातदेखील रशियाला सन्मान मिळवून दिला. नंतरच्या सर्व वर्षांमध्ये पुतीन यांच्या नेतृत्वाखाली रशियाचे आंतरराष्ट्रीय राजकारण सतत चौकार व षटकार मारत राहिले, हेही मान्य केले पाहिजे. परिणामतः रशियाचा प्रभाव वाढला. कॅस्पियन आखातातले खनिज तेल रशियाच्याच अनुमतीने इतर देशांकडे जाईल, हा रिवाज रूढ झाला. जॉर्जिया व युक्रेन या शेजारी देशांवर स्वतःची पकड मजबूत करण्यात रशिया यशस्वी झाला. एवढेच नव्हे तर भूमध्य महासागरात पाय सोडून बसलेल्या सीरिया नामक देशांतही अमेरिकादी देशांना आव्हान देऊन आपले बस्तान बसविण्यात रशिया सफल झाला. तात्पर्य, कॅस्पियन समुद्र, काळा समुद्र या जलाशयावर तर रशियाने मांड ठोकलीच; पण भूमध्य महासागरावरही रशियाने स्वतःचे अधिकार क्षेत्र उत्पन्न केले. अमेरिकेने युक्रेनच्या प्रश्‍नाच्या सबबीवर जाचक बंधने लादून रशियाची कोंडी केली, तेव्हा पुतीन यांनी चीनशी व्यापारी संबंध वाढवून कुटनीतीत यशस्वी खेळी खेळली. ब्राझील, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका या देशांशी आघीडी करून ‘ब्रिक्‍स’ क्‍लब उभारण्यातही बाजी मारली.

२०१८ च्या १८ मार्चला रशियन मतदार अध्यक्षीय निवडणुकीत मतदान करतील, तेव्हा पुतीन यांची अठरा वर्षांतली कामगिरी त्यांचे डोळे दीपवणारी ठरेल. असाच एकूण सूर दिसत आहे.

वर उल्लेखिलेल्या जमेच्या बाजूंबरोबर खर्चाचाही वेध घेतला पाहिजे. रशियावर अमेरिकादी देशांनी निर्बंध लादले आहेत. या निर्बंधामुळे रशियाची अर्थव्यवस्था संकटग्रस्त आहे. रशियाचा विकासाचा दर पावणेदोन टक्‍क्‍यांपर्यंत घसरला आहे. अमेरिका-रशिया संबंध अजूनही अतिदक्षता विभागातच आहेत. भारतासारख्या (जपान, ऑस्ट्रेलिया) देशांनी अमेरिकेशी दोस्ती वाढवल्याने रशियाकडून पाकिस्तानला मैत्रीचे संकेत रवाना झाले आहेत; पण त्याचमुळे अफगाणिस्तानात व मध्य आशियात आणि इराणमध्येही रशियाविषयी नाराजी प्रगटली आहे. मुळात पाकिस्तान बिनभरवशाचे तकलादू राष्ट्र आहे. ज्या चीनबरोबर रशियाने गोत्र जमवले आहे, तो चीनसुद्धा अविश्‍वसनीयच आहे. पुतीन यांनी धनदांडग्या, भ्रष्टाचारी असुरांना काही अंशी वठणीवर आणले हे खरे आहे; पण लोकशाही मार्गांनी शासकीय धोरणांना विरोध करणाऱ्या सज्जनांशीही पुतीन सरकार सौजन्याने वागण्याऐवजी स्टालीन मार्गानेच कठोर व्यवहार करते, असा आरोप केला जात आहे. अलेक्‍सी नावल्नी यांच्या रूपाने पुतीन यांना आव्हान मिळाले आहे, ते काही नगण्य नाही.

बोल्शेविक क्रांतीला नुकतीच शंभर वर्षे पूर्ण झाली; पण या क्रांतीचे स्मरण करून देणारा ७ नोव्हेंबर हा दिनांक २००५ पासून बहिष्कृत ठरला. पुतीन यांच्या आज्ञेवरून ४ नोव्हेंबर हाच दिनांक National unity day म्हणून सन्माननीय ठरला आहे. मार्क्‍सवादाऐवजी राष्ट्रवादच रशियात शिरोधार्थ ठरला आहे; पण लोकांना ‘हा राष्ट्रवाद लोकशाहीच्या मखरात बसावा’ या इच्छेने झपाटले आहे. पुतीन अध्यक्ष म्हणून निवडून येतीलही; पण ही लोकेच्छा सफल होईल काय? हे भविष्य मात्र धूसर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com