मुरलेली ‘नजर’ (नाममुद्रा)

anil-dasmana
anil-dasmana

इंदूर हे देशाच्या नकाशावर विविध कारणांनी गाजणारे मध्य प्रदेशातील एक प्रमुख शहर! मात्र, १९८१च्या दशकात या शहरात माफिया गुंडांनी थैमान घातले होते आणि सट्टा तसेच जुगार यांना ऊत आला होता. नेमक्‍या त्याच काळात या शहरात एक नवे पोलिस अधीक्षक नियुक्‍त  झाले. ‘एसपी’ म्हणून ही त्यांची पहिलीच नियुक्‍ती होती. त्यांनी हे ‘माफियाराज’ संपुष्टात आणण्यासाठी ‘ऑपरेशन बॉम्बे बाजार’ या नावाने धाडसी मोहीम हाती घेतली. त्यांच्या या कारवाईनंतर इंदूरमध्ये अनेक दिवस संचारबंदी जारी होती. ‘एसपी’च्या त्या तडफेने आणि जिद्दीने माफियाराज संपुष्टात आले. 

त्या ‘एसपी’चे नाव अनिल धस्माना. असे हे धस्माना आता ‘रॉ’ म्हणजे ‘रिसर्च ॲण्ड ॲनॅलिसिस विंग’ या केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणेचे प्रमुख झाले आहेत. देशातील अंतर्गत तसेच परदेशात सुरू असलेल्या घडामोडींवर डोळ्यांत तेल घालून नजर ठेवणारे ‘रॉ’ हे सरकारच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे खाते असते. 

धस्माना हे १९८१च्या बॅचचे मध्य प्रदेश केडरमधील आयपीएस अधिकारी असून, आतापावेतो त्यांनी ‘रॉ’मध्ये २३ वर्षे विविध पदांवर काम केले आहे. ‘रॉ’ मधील लंडन-फॅंकफुर्ट तसेच युरोप आणि सार्क या विभागांची जबाबदारी त्यांनी प्रदीर्घ काळ सांभाळली आहे. 

धस्माना हे मूळचे उत्तराखंड राज्यातील, मात्र, त्यांची सुपरिन्टेडण्ट ऑफ पोलिस (एसपी) या पदावर पहिली नियुक्‍ती झाली ती इंदूरमध्ये. तेथे बजावलेल्या कामगिरीनंतर त्यांनी कधी मागे वळून पाहिलेच नाही. पाकिस्तान हा रोजच्या रोज आपल्या कुरापती काढत आहे, तर अफगाणिस्तानातली अस्थिरताही चिंताजनक आहे. धस्माना हे अफगाणिस्तान, बलुचिस्तान तसेच इस्लामिक प्रश्‍न आणि दहशतवादी कारवाया यासंबंधातील तज्ज्ञ मानले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात अफगाणिस्तानचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यामुळेच अफगाणिस्तानसंबंधातील प्रश्‍नांची जाण असलेले धस्माना यांची ही नियुक्‍ती हा निव्वळ योगायोग समजता कामा नये. मात्र, त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे धस्माना हे केंद्र सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या खास विश्‍वासातील समजले जातात. त्यामुळेच त्यांची ही नियुक्‍ती डोवाल यांनीच घडवून आणली, असेही सांगितले जाते. धस्माना आपली ही नवी जबाबदारीही ते पूर्वीइतक्‍याच कार्यक्षमतेने सांभाळतील, अशीच अपेक्षा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com