राममंदिराचा ‘सात-बारा’! (अग्रलेख)

uddhav thackeray
uddhav thackeray

अयोध्येतील बाबरी मशीद हिंदुत्ववाद्यांनी जमीनदोस्त केल्यानंतर तेथे न उभारल्या गेलेल्या राममंदिराच्या मुद्याचा ‘सात-बारा’ कोणाचा, या प्रश्‍नावरून २५ वर्षांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर नव्याने वाद सुरू झाला आहे! खरे तर ‘मंदिर वहीं बनायेंगे!’ ही घोषणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवाराने दिली असल्यामुळे, त्यावर अर्थातच भाजपचा हक्‍क होता; पण आता शिवसेनेने या वादात उडी घेऊन, ‘राममंदिर जुमला असल्याचे जाहीर करा, मंदिर आम्ही बांधू!’ असे आव्हान थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात सायंकाळी हे आव्हान दिले खरे; पण त्यापूर्वी काही तासच आधी झालेल्या संघाच्या मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘राममंदिर उभारण्यासाठी कायदा करा!’ असा आदेश सरकारला दिला. त्यानंतर उद्धव यांनी ‘चलो अयोध्या!’ अशी हाळी दिली; पण यात ‘तुमच्या हिंदुत्वापेक्षा आमचे हिंदुत्व अधिक प्रखर आहे,’ हे दाखवण्यापलीकडे त्यात काहीही नाही आणि हे या मेळाव्याला गर्दी करणाऱ्या शिवसैनिकांनाही ठाऊक आहे. आता उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबर रोजी अयोध्येत जाणार असून, त्याद्वारे राष्ट्रीय स्तरावर ‘खरा रामभक्‍त’ म्हणून आपली प्रतिमा उभी करू पाहत आहेत.

शिवसेनेच्या या मेळाव्याची हवा मात्र चांगलीच तापवण्यात आली होती आणि तेथे जमलेली गर्दीही उद्धव या वेळी आगामी निवडणुकांबाबतची आपली रणनीती स्पष्ट करतील, याच आशेने आली होती. उद्धव यांच्या भाषणापूर्वीच्या नेत्यांची वक्‍तव्ये शिवसैनिकांची डोकी तापवणारीच होती. त्यामुळे उद्धव काय बोलणार, याबाबतची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती. प्रत्यक्षात उद्धव यांच्या भाषणातून अयोध्येला जाण्याच्या तारखेशिवाय अन्य काहीही मिळाले नाही. उलट आपल्या सहकारी नेत्यांनी तापवलेली डोकी शांत करण्याचेच काम त्यांनी केले. ते करताना आपल्या खास शैलीत उद्धव यांनी मोदी आणि भाजप यांना चिमटेही बरेच काढले आणि टीकेचे थेट आसूडही ओढले. मात्र त्यात नवीन ते काहीच नव्हते; कारण याच मुद्यांवरून ते भाजपला गेली अडीच-तीन वर्षे धारेवर धरत आहेत. शिवसैनिकांना अपेक्षा होती, ती ‘भाजपशी युती न करता, शिवसेना स्वतंत्र लढणार!’ या घोषणेची. मात्र त्यांनी त्या मुद्याला बगल देताना युतीचे दोर पुरते कापले जाणार नाहीत, याचीच दक्षता घेतली! शिवसेनेला खऱ्या अर्थाने लोकसभा निवडणुकीत फारसा रस नाही, हे केव्हाच स्पष्ट झाले आहे. उद्धव यांचे लक्ष्य मंत्रालयावर भगवा फडकविण्याचे आणि शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याची मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर प्रतिष्ठापना करण्याचे आहे. मात्र आगामी निवडणुका लढविण्यासाठी त्यांच्याकडे आता कोणताही ठोस मुद्दा नाही. सरकारच ‘निकम्मे’ ठरवल्याने त्यांना आपल्या कारभाराबाबतही बोलायला जागा नव्हती; कारण याच सरकारमध्ये शिवसेना सामील आहे! त्यामुळेच त्यांनी हिंदुत्वाच्या जुन्याच मुद्याला नवा खमंग तडका देत, रामनामाचा जप सुरू केला. हाच जप त्यांना स्वबळाची भाषा करत अखेर युती करण्यासाठीही उपयोगी पडणार आहे. ‘राममंदिर व्हावे आणि हिंदुत्वाचा जय व्हावा, यासाठीच आपण युती करत आहोत!’ असे सांगता यावे, म्हणूनच तर त्यांनी ‘चलो अयोध्या!’ हा नवा मंत्र आपल्या पोतडीतून बाहेर काढला नाही ना, असा प्रश्‍नही त्यामुळे करता येतो. उद्धव यांच्या भाषणातील आणखी एक गोम म्हणजे एकीकडे भाजप, मोदी यांना थेट लक्ष्य करताना आणि आपल्याच सरकारवर टीकेचे आसूड ओढताना, त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मात्र मोकळे सोडले. त्यांचे नावही त्यांनी पाऊण तासाच्या भाषणात घेतले नाही. यामागील इंगित लपून राहण्यासारखे नाही. गेले काही दिवस सातत्याने मंत्रिमंडळ विस्ताराच्या वावड्या भाजपच्या गोटातून उठविल्या जात आहेत. चार वर्षे सत्तेचे पाणी प्यायल्यामुळे आमदार सरकारमधून बाहेर पडण्याच्या मनःस्थितीत नाहीत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार झालाच, तर आपले आमदार आपल्यापासून दूर जाऊ नयेत, म्हणून आणखी लाल दिव्याच्या गाड्या स्वीकारायला शिवसेना कचरणार नाही, अशीच चिन्हे आहेत. तेव्हा राममंदिराच्या ‘सात-बारा’वर आपले नाव कोरण्याचा हा प्रयत्न म्हणजे भाजपशी चालवलेली ‘नुरा कुस्ती’च असू शकते, असेच म्हणावे लागते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com