निसर्गसन्मुख जगण्यातच शाश्‍वत सुख

बी. एस. कुलकर्णी
शनिवार, 5 मे 2018

निसर्गावर नियंत्रण मिळविण्याच्या हव्यासापोटी माणसाने आपल्या जीवनाची वाताहत करून घेतली आहे. पाणी, हवा, अन्न, जमीन, जंगल, प्राणी, पक्षी अशी सारी सृष्टीच माणसाला आपल्या कब्जात ठेवायची आहे. माणसाला पाणी निर्माण करता येत नाही. हुकमी पाऊस पाडता येत नाही. तरीही तसे प्रयत्न केले जात आहेत. निसर्ग कह्यात घेणे कदापि शक्‍य नाही,. तरीही माणसाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातून दुष्काळ, वादळे, महापूर अशा आपत्ती जन्माला येतात. तेव्हा निसर्गाला बंदिस्त करण्याचा खटाटोप टाळला पाहिजे. निसर्गात हस्तक्षेप करण्याच्या मानवी खटाटोपामुळे नाना प्रकारची संकटे येऊ घातली आहेत.

निसर्गावर नियंत्रण मिळविण्याच्या हव्यासापोटी माणसाने आपल्या जीवनाची वाताहत करून घेतली आहे. पाणी, हवा, अन्न, जमीन, जंगल, प्राणी, पक्षी अशी सारी सृष्टीच माणसाला आपल्या कब्जात ठेवायची आहे. माणसाला पाणी निर्माण करता येत नाही. हुकमी पाऊस पाडता येत नाही. तरीही तसे प्रयत्न केले जात आहेत. निसर्ग कह्यात घेणे कदापि शक्‍य नाही,. तरीही माणसाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यातून दुष्काळ, वादळे, महापूर अशा आपत्ती जन्माला येतात. तेव्हा निसर्गाला बंदिस्त करण्याचा खटाटोप टाळला पाहिजे. निसर्गात हस्तक्षेप करण्याच्या मानवी खटाटोपामुळे नाना प्रकारची संकटे येऊ घातली आहेत. काळ मोठा कठीण आला आहे, हे ध्यानात घेण्याची हीच योग्य वेळ आहे.  वास्तविक माणसाला जगण्याची प्रेरणा, त्याच्यातील चैतन्य जागवण्याचे काम निसर्गातील विविध घटक करतात. सोलापूर जिल्ह्याच्या माळरानावर माळढोक पक्ष्याचा मुक्त वावर होता. पन्नास वर्षांपूर्वी पक्षिनिरीक्षण करत भटकत असताना आम्हाला तो दिसला. नर माळढोक आपल्या चार-पाच माद्यांसमवेत माळावरून पंख फैलावून एखाद्या राजासारखा चालतो. त्याच्या चालण्याने माळावर उगवलेल्या गवतातून किडे-कीटक उडतात आणि माद्या त्यांना भक्ष्य करतात. हे दृश्‍य खरोखर मुग्ध करणारे असे. जाणते पक्षिमित्र सालीम अली यांनीही या परिसराला भेट देऊन हे सौंदर्य न्याहाळले आहे. माळढोक अभयारण्याची स्थापना पुढच्या काळात झाली. तथापि, माळढोकाची चोरून शिकार होऊ लागली. कालांतराने हा पक्षी या माळरानातून नाहीसा होऊ लागला आहे. परवा बुद्धपौर्णिमेला झालेल्या पक्षिगणनेत फक्त एका माळढोकाची नोंद झाली आहे. सोलापूर परिसरात औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभा राहत असताना, माणसाला मोकळा श्‍वास घेण्यासाठी मुक्त माळरान राहिलेले नाही. ही धोक्‍याची घंटा आहे. कमी-अधिक फरकाने राज्याच्या अन्य भागांतही अशीच स्थिती आहे. औद्योगिक प्रगती व्हायला हवी, पण विकासाच्या नावाखाली होणारी पर्यावरणाची हानी रोखली पाहिजे. विदर्भ-मराठवाड्यातील अनेक जिल्हे पर्जन्यछायेत येतात. पाण्याची मोठी समस्या महाराष्ट्रात जाणवत आहे. महाभारतामध्ये ‘पुत्रपौत्र सुखी राहो’ असे म्हटले आहे. जंगल आणि झाडे तोडून औद्योगिक वसाहती उभ्या होत असताना तोडलेल्या झाडांच्या वीसपट वृक्ष लागवड करायला हवी. पुढच्या पिढ्यांना शाश्‍वत सुखाचे धनी करायचे असेल तर जंगल जपले पाहिजे, पाण्याचे साठे, तलाव जपले पाहिजेत. नद्या वाहत्या ठेवल्या पाहिजेत. तरच आपले पुत्रपौत्र सुखी होतील. निव्वळ धनकोशाची वृद्धी म्हणजे सुख नव्हे.

या भूतलावर माणसाच्या आधी पक्षी आणि प्राण्यांचे अस्तित्व होते. त्यामुळे निसर्गसंपदेवर पहिला हक्क त्यांचा आहे. जलाशये त्यांच्यासाठीही राखण्याची आवश्‍यकता आहे. रिचर्ड बर्टन या इंग्रजी लेखकाला भटकण्याची आवड होती. असाच फिरत असताना तो वाळवंटात भरकटला. त्याच्याजवळचे पाणीही संपले होते. तहानेने व्याकूळ होऊन तो चालत असताना त्याला तितिर पक्ष्याची जोडी डोक्‍यावरून उडत चाललेली दिसली. त्याच्या अनुभवी नजरेने ती हेरली आणि जवळपास कुठेतरी पाण्याचा साठा असणार हे त्याच्या ध्यानात आले. तो त्यांचा माग काढत गेला आणि त्याला ओॲसिस सापडले. तिथे अतिशय नितळ, शुद्ध पाणी मिळाले. पक्ष्यांनीच त्याचे प्राण वाचवले. दुसरीकडे, घरात येणाऱ्या चिमण्या नव्या तंत्रज्ञानामुळे नाहीशा होत आहेत. आपल्या मुलाबाळांना ‘चिऊकाऊचा घास’ भरवणे दुरापास्त झाले आहे. तंत्रज्ञान आवश्‍यकच आहे. त्याने विकास साधता येतो, पण त्याच्या अतिरेकाने जगणे नासत चालले आहे काय, याचाही मागोवा घ्यावा लागेल. दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. सर्वांना अन्नपाणी पुरवायचे असेल, तर लोकसंख्येवरही नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. इतक्‍या मोठ्या लोकसंख्येला शिक्षण देता येईल, पण सुशिक्षित होण्यासाठी विवेकाचीच गरज आहे. नुसती अन्नसुरक्षा उपयोगाची नाही, जीवन त्यापलीकडेही आहे. आहार, निद्रा आणि मैथुनापलीकडेही निसर्गव्यवहार आहे. सगळ्यांनाच सुखी व्हायचे आहे, पण सुख म्हणजे नक्की काय, याचा आत्मशोध घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. संयम हा सगळ्या विकल्पावरील उपाय आहे. शाश्‍वत सुख निसर्गरक्षणानेच मिळणार आहे. त्यामुळे निसर्ग, पर्यावरण राखणे अत्यावश्‍यक आहे. निरामय जगण्यातूनच आसमंतातील चैतन्य ग्रहण करता येईल, इतकेच.

Web Title: b s kulkarni wirte editorial