झेंडा आणि धोंडा! (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 जून 2018

शिवसेनेच्या वर्धापन दिन मेळाव्याच्या निशाण्यावर सर्वार्थाने भाजप आणि विशेषतः मोदी हेच होते. उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्यात वापरलेली "ठाकरी भाषा' बरेच काही सांगून गेली. त्यातून महाराष्ट्राच्या आगामी राजकारणाची दिशाही स्पष्ट झाली आहे. 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेली "पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच!' ही घोषणा आणि भावी शिवसेना पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांनी दिलेला "स्वबळावर लढणार आणि जिंकणार!' हा नारा, यात नवे काहीच नसले, तरी त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या चिंतेत वाढ होऊ शकते. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी "संपर्क से समर्थन!' या आपल्या मोहिमेत थेट "मातोश्री'वर पायधूळ झाडल्यानंतरही उद्धव यांची भाषा बदललेली नाही, यावर शिवसेनेच्या बावन्नाव्या वर्धापन दिन सोहळ्यात शिक्‍कामोर्तब झाले, हे मात्र खरे! उद्धव यांनी ही घोषणा करण्यापूर्वी दोनच तास आधी भाजपने जम्मू-काश्‍मीरमधील मेहबूबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढून घेण्याची घोषणा केल्यामुळे, आता उद्धवही अशीच काही घोषणा करतील आणि देवेंद्र फडणवीस सरकार अडचणीत आणतील, अशी अपेक्षा करणाऱ्यांचा मुखभंगही त्यांनी केला. 

"महाराष्ट्रातील सरकारचा पाठिंबा काढायचा की नाही, याबाबत कोणी आम्हाला शिकवू नये,' असे त्यांनी स्पष्ट केले. अर्थात, यातही काही नवे नसले, तरी या मेळाव्यात उद्धव यांनी वापरलेली "ठाकरी भाषा' बरेच काही सांगून गेली. "पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच!' या वाक्‍यात श्‍लेष होता; कारण भाजपबरोबर युती करूनही पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा होऊ शकतोच! मात्र, उद्धव यांनी "विरोधकांच्या छाताडावर बसून महाराष्ट्रात भगवा फडकवणारच आणि पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच!' असे स्पष्ट केले. चार वर्षांपूर्वी फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यापासूनच शिवसेनेने भाजप हाच आपला प्रमुख विरोधी पक्ष असल्याचे आपल्या बोलण्या-वागण्यातून कायम स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता जेव्हा कधी निवडणुका होतील, तेव्हा याच दोन पक्षांत महाराष्ट्रात तुंबळ युद्ध होणार, असे तूर्तास तरी दिसू लागले आहे. या मेळाव्याच्या आदल्याच दिवशी शिवसेनेला चुचकारण्याचा एक प्रयत्न फडणवीस यांनी केला. 

उद्धव यांचे विश्‍वासू सहकारी आणि सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा त्यांनी बहाल केला. मात्र, अशा चतकोर-नितकोर तुकड्यांना आपण भीक घालत नाही, हे उद्धव यांनी होता होईल तेवढी जहाल भाषा वापरून दाखवून दिले. मात्र, यंदाच्या या वर्धापन दिन सोहळ्याची, उद्धव यांच्या भाषणापलीकडली आणखी काही वैशिष्ट्ये होती. भाजप आणि विशेषत: मोदी यांचे कडवे विरोधक असलेले पत्रकार व शेतीतज्ज्ञ यांची भाषणेही या मेळाव्यात झाली. निव्वळ या विरोधकांना दिलेल्या आमंत्रणामुळे मेळावा होण्याआधीच त्याचा रागरंग स्पष्ट झाला होता. त्याचबरोबर प्रदीर्घ काळानंतर शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात निव्वळ ठाकरे कुटुंबीयांच्या भाषणांऐवजी शेती, अर्थ आणि अन्य विषयांवर परिसंवाद झाल्यामुळे शिवसैनिकांचे थोडेफार प्रबोधनही झाले.

उद्धव यांच्या भाषणाचा मुख्य रोख हा भाजपचे वाभाडे काढण्यावर असला, तरी त्यांनी शरद पवारांच्या "पगडी-पागोट्या'च्या राजकारणाचाही ठाकरी शैलीत समाचार घेतला आणि मराठी माणसांमध्ये फूट पाडण्याचा हा प्रयत्न असल्याचे ठणकावून सांगितले. म्हणजेच भाजपविरोधात लढताना अन्य विरोधकांबरोबर जाण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कर्नाटकात कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आमंत्रण कचऱ्याच्या टोपलीत टाकून, त्यांनी ही बाब पूर्वीच स्पष्ट केली होती. 

उद्धव या वक्‍तव्याला खरोखरच जागले तर महाराष्ट्रात तिरंगी लढती होणार, हेही या मेळाव्यामुळे स्पष्ट झाले! या मेळाव्याचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, एका तपापूर्वीपर्यंत शिवसेनेचा लढाऊ बाणा आपल्या कृतीतून सतत दाखवून देणारे शिशिर शिंदे यांची झालेली "घरवापसी'! शिंदे यांनी याच मेळाव्यात बोलताना, "एका हातात भगवा झेंडा आणि दुसऱ्या हातात धोंडा!' घेऊन आपण यापुढे काम करणार असल्याचे सांगितले.

"झेंडा आणि धोंडा' या दोन शब्दांतून त्यांनी शिवसेनेची कार्यपद्धतीच अधोरेखित केली आणि आता शिवसेना नेमक्‍या कोणत्या पद्धतीने पुढे वागणार आहे, हेही त्यामुळे उघड झाले. अमित शहा यांच्या "संपर्क से समर्थन' या मोहिमेस आपण वांद्य्राच्या खाडीत बुडवल्याचे उद्धव यांनी दाखवून दिले! भाजपसाठी ही धोक्‍याची घंटा असू शकते. शिवसेनेच्या या मेळाव्याचा हाच खरा बोध आहे. 

Web Title: Bhagva Zenda Pune Edition Editorial