जनहिताच्या मुद्द्यांची महती

संपूर्ण भारत जोडो यात्रेत राहुल गांधी ‘नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान खोलने आया हूं’, असे सांगत होते.
bharat jodo yatra karnataka election 2023 rahul gandhi congress politics
bharat jodo yatra karnataka election 2023 rahul gandhi congress politics sakal

नरेंद्र मोदी-अमित शहा म्हणजे हमखास विजयश्री खेचून आणणारी जोडी या धारणेला कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाने धक्का बसला. त्याचबरोबर धार्मिकतेच्या मुद्द्यांपेक्षा जनतेच्या दैनंदिन जगण्याशी संबंधित बाबी अधिक महत्त्वाच्या असतात, हे या निवडणुकीत पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

- विकास झाडे

संपूर्ण भारत जोडो यात्रेत राहुल गांधी ‘नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान खोलने आया हूं’, असे सांगत होते. यात्रा सुरू असतानाच गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन राज्यांत विधानसभेच्या निवडणुका झाल्या. तेथे यात्रा गेली नव्हती. मात्र, राहुल गांधी न फिरकताच कॉँग्रेसने हिमाचल प्रदेश भाजपकडून हिरावले.

गुजरातमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारत गड राखला. त्यानंतर या यात्रेचे फलित काय? बलाढ्य नरेंद्र मोदींसमोर ही यात्रा भविष्यात करिष्मा दाखवणार की नाही, अशी मांडणी राजकीय विश्लेषक करत होते.

कर्नाटकात तब्बल २२दिवस पदयात्रा होती. शनिवारी कर्नाटक विधानसभेच्या निवडणूक निकालाने भविष्यकारांचे अंदाजे चुकवत ‘भारत जोडो’चे महत्त्व अधोरेखित केले. प्रत्येक समुदायातील जनतेच्या मनाचा ठाव घेत, लोकांच्या प्रश्नांना साद घालताना कॉँग्रेसच्या नेत्यांनी संवेदनशीलता दाखवत विजय संपादल्याचे दिसून आले.

दुसरीकडे केवळ देशच नव्हे तर सारे जग व्यापल्याची प्रतिमा असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना दक्षिण भारताने मात्र नऊ वर्षांत स्वीकारले नाही. मजबूत पकड असलेल्या कर्नाटकानेही अखेर ‘गुडबाय’ केल्याने सध्यातरी भाजपसाठी दक्षिणेतील दारे बंद झाली आहेत.

देव-धर्म, मंदिर-मशिद आणि मोदींचा चेहरा याहीपेक्षा हाताला काम, आरोग्य, शिक्षण, अन्न-वस्त्र-निवारा, बंधुता याला मतदार महत्त्व देतात, हे निकालाने दाखवून दिले. या वर्षाअखेरीस छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा या महत्त्वाच्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका होतील. मध्यप्रदेश वगळता अन्य राज्यात भाजपचे सरकार नाही.

दक्षिणेतील तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये विधानसभेप्रमाणेच लोकसभेतही भाजपची दुरवस्था आहे. या पाचही राज्यांतील लोकसभेच्या १२९ मतदारसंघापैकी भाजपची सदस्यसंख्या केवळ २९ आहे.

यात २५ सदस्य एकट्या कर्नाटकातील; उर्वरित चार सदस्य तेलंगणातून निवडून आले आहेत. तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि केरळ या राज्यांमध्ये भाजपला लोकसभेची एकही जागा मिळालेली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपसाठी कर्नाटकच्या मतदारांचा कौल महत्त्वाचा होता.

आंध्र प्रदेशातील पंचवीसपैकी बावीस जागांवर वायएसआर काँग्रेसने गेल्या लोकसभा निवडणुकीत बाजी मारली होती. तमिळनाडूत भाजपने अण्णाद्रमुकसोबत युती केली आहे. परंतु अण्णाद्रमुकला गेल्या निवडणुकीत केवळ एकाच जागेवर विजय मिळवता आला. त्यामुळे ३९ लोकसभा सदस्य असलेल्या तमिळनाडूतून भाजपचा एकही सदस्य नाही.

केरळमधील वीसपैकी एकही जागा भाजपला मिळालेली नाही. तेलंगणातील १७ लोकसभा मतदारसंघांपैकी चार जागांवर भाजपने विजय संपादला आहे. कर्नाटकतील आताचा निकाल भाजपसाठी धोक्याची घंटा आहे. आगामी काळात भाजपला कर्नाटकमध्ये कामगिरी दाखवावी लागेल; नाहीतर लोकसभेत दक्षिणेत पाय रोवणे कठीण जाईल.

कर्नाटकच्या निकालात महाराष्ट्र आणि तेलंगणाला लागून मतदारसंघातही काँग्रेसची कामगिरी चांगली आहे. केवळ किनारपट्टीला लागून असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपने परंपरागत मतपेढी शाबूत राखली आहे. कर्नाटकच्या निकालांचे विश्लेषण केल्यास काँग्रेसला १७, आणि भाजपला आठ लोकसभा मतदारसंघात आघाडी मिळाली आहे.

मोदी करिष्म्याची जादू ओसरली?

कर्नाटकात भाजपला सत्ताविरोधी लाटेचा सामना करावा लागला. मतदारांच्या मनात भाजपविरोधात प्रचंड रोष होता, हे निकालावरून स्पष्ट होते. भाजपचे नेते येडियुरप्पा यांचा या राज्यात आजही प्रभाव आहे.

परंतु भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने भाजपने त्यांना दूर ठेवले होते. बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री बनविले. परंतु ते प्रशासनावर पकड निर्माण करू शकले नाहीत. शिवाय, ४० टक्के कमिशन आणि भ्रष्टाचाराचा ठपका त्यांच्या सरकारवर ठेवण्यात आला.

कॉँग्रेसने हाच मुद्दा प्रचारात तापवत ठेवला. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांना तिकीट न मिळाल्याने कर्नाटकातील लिंगायत समुदाय नाराज होता. मोदी वलयापुढे कर्नाटकातील लिंगायत, दलित, आदिवासी, वोक्कलिंग, ओबीसी समुदायाला जोडून ठेवणे भाजपला दुय्यम वाटले असावे.

भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणातही धोक्याची घंटा वाजतच होती. भाजपचे स्थानिक नेते प्रभावी नाहीत म्हणून स्वत: मोदींनी कर्नाटकातली प्रचाराची सूत्रे हाती घेतली. ‘मला मते द्या’ म्हणत मतदारांपुढे गेले. त्यांनी एकोणीस सभा आणि सहा रोडशो असे पंचवीस कार्यक्रम केले.

१९ जिल्ह्यांतील १६४ विधानसभा मतदारसंघांत प्रचार केला. भाजपने कर्नाटकासाठी काय केले, हे सांगण्यापेक्षा विरोधकांनी त्यांना किती शिव्या दिल्या याची यादी मोदी मांडायचे. हिंदुत्वाचे कार्ड चालविण्याचा प्रयत्न केला. कॉँग्रेसला शह देण्यासाठी संपूर्ण प्रचारात ‘बजरंगबली’चा मुद्दा लावून धरला.

बजरंगबलीच्या वेशातले कार्यकर्ते नेत्यांच्या रोड शोमध्ये दिसत. स्वत: मोदी ‘बजरंगबली की जय’च्या घोषणा द्यायला लागले. याचा फायदा भाजपला झाला. जे मतदार कुंपणावर होते, ते बजरंगबलीच्या मुद्दामुळे भाजपकडे वळले. परंतु अनेक दिवस राबूनही मोदींना भाजपला सत्तेपर्यंत नेता आले नाही.

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या महिला कुस्तीपटू भाजपच्या खासदारावर लैंगिक शोषणाचा आरोप करीत जंतरमंतरवर धरणे देऊन बसल्या, मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला, काश्मीरमध्ये जवान हुतात्मा होत होते. अशा घटनांत लक्ष घालण्याऐवजी मोदींनी कर्नाटकच्या निवडणूक प्रचाराला अग्रक्रम दिला.

त्यांनी ‘जय बजरंगबली’ म्हणत ईव्हीएमचे बटन दाबा, असे सांगून आचारसंहितेचा फज्जा उडवला. याबाबत तक्रार करूनही निवडणूक आयोगाने दखल घेतली नाही. ‘केरला स्टोरी’ चित्रपटावरूनही त्यांनी ध्रुवीकरण घडवण्याचा प्रयत्न केला. प्रचाराची मुदत संपल्यानंतर भाजपने कर्नाटकातील मतदारांसाठी मोदींचा व्हिडिओ जारी केला.

एवढे सगळे घडूनही आयोगाने त्या सगळ्याकडे कानाडोळा केला. गृहमंत्री अमित शहा आणि अध्यक्ष जे.पी. नड्डा हेही राज्यात तळ ठोकून होते. एवढे घडूनही कर्नाटकाच्या जनतेने भाजपला नाकारले. केवळ मोदींच्या लोकप्रियतेवर सत्ता मिळवता येणार नाही, हे भाजपलाही कळून चुकले असावे. या निकालामुळे मोदी-शहा यांच्या निवडणूक जिंकणारे चेहरे या प्रतिमेला धक्का बसला. परंतु पराभवाचे खापर नड्डांच्या माथी फुटले.

जनतेचे प्रश्‍न महत्त्वाचे

राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ कर्नाटकात तब्बल बावीस दिवस होती. कर्नाटकातील एकवीस लोकसभा मतदारसंघातून ती गेली. त्यापैकी १७ लोकसभा मतदारसंघांवर कॉँग्रेसचा प्रभाव दिसला. २०१८मध्ये यातील केवळ पाच जागा कॉँग्रेसकडे होत्या.

गांधी जयंतीदिनी, दोन ऑक्टोबर रोजी म्हैसूरमध्ये भरपावसात राहुल गांधींनी भाषण केले. त्याचाही परिणाम कर्नाटकातील मतदारांवर झाला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी गृहराज्य कर्नाटकात सूक्ष्म रणनीती आखली. प्रियांका गांधी, सोनिया गांधीही मैदानात उतरल्या.

माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार या काँग्रेस नेत्यांची मतदारांशी नाळ जुळलेली आहे. त्यांनी २२०सभा आणि ६२रोड शो केले. कॉँग्रेसने प्रत्येक ठिकाणी ‘४० टक्के कमिशन’ आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरला.

लोकांनी ही बाब चांगलीच मनावर घेतल्याचे दिसले. राहुल गांधी यांचे लोकसभेचे सदस्यत्व जाणे, त्यांना घर सोडावे लागणे याचीही किंमत भाजपला मोजावी लागली. भाजपला आताकेवळ घोषणाबाजी न करता कृतीशीलतेवर भर द्यावा लागेल. या देशात सर्वधर्म समभाव नांदतो. धर्माच्या राजकारणापेक्षा जनतेच्या प्रश्‍नांना भिडणाऱ्याला जनता स्वीकारते, हेच यातून दिसून आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com