लग्नगाठ ते आयपीओ

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 3 February 2021

‘भारत मॅट्रिमनी डॉट कॉम’चे मुरुगावेल जानकीरमण हे ‘वन-मॅन-आर्मी’चं आदर्श उदाहरण आहेत. एक सॉफ्टवेअर इंजिनिअर ते उद्योगपती असा त्यांचा प्रवास झाला तो प्राथमिक समभागविक्रीचा (आयपीओ) एक थांबा घेऊन. उद्योजकतेचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी स्वप्नवत वाटावी अशीच त्यांची कहाणी.

‘भारत मॅट्रिमनी डॉट कॉम’चे मुरुगावेल जानकीरमण हे ‘वन-मॅन-आर्मी’चं आदर्श उदाहरण आहेत. एक सॉफ्टवेअर इंजिनिअर ते उद्योगपती असा त्यांचा प्रवास झाला तो प्राथमिक समभागविक्रीचा (आयपीओ) एक थांबा घेऊन. उद्योजकतेचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी स्वप्नवत वाटावी अशीच त्यांची कहाणी.

एक सॉफ्टवेअर इंजिनिअर ते उद्योगपती असा प्रवास करणारे ‘भारत मॅट्रिमनी डॉट कॉम’चे मुरुगावेल जानकीरमण. प्राथमिक समभागविक्रीमुळे (आयपीओ) काय होऊ शकतं हे त्यंनी दाखवून दिलं. ते चेन्नईत एका अमेरिकी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग विभागात काम करत होते. मॅट्रिमनी वेबसाइटला भेट देणारे लोक शक्यतो आपल्या भाषेतल्या आणि आपल्या समाजाच्या जोडीदारांशीच विवाह करण्यासाठी उत्सुक असतात असं त्यांच्या लक्षात आलं. तेव्हा अशा वेबसाइट सरसकट असायच्या आणि या गोष्टीला ‘टॅकल’ करण्याची सोय नव्हती. त्यामुळे याच सगळ्या विचारातून ‘भारत मॅट्रिमनी’च्या कल्पनेचा उगम झाला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुरुगावेल यांनी sysindia.com अशी वेबसाइट तयार केली आणि जवळजवळ अडीच वर्षं ती चालवली. याच वेबसाइटचा पुढचा अवतार म्हणजे www.bharatmatrimony.com. युजर्सच्या लग्नविषयक अपेक्षा पूर्ण करणारी ही वेबसाइट. या वेबसाइटचा वापर करून झालेल्या लग्नांच्या अधिकृत संख्येबाबत तिची लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌समध्ये नोंद आहे आणि सध्या तिच्यावरच्या प्रोफाइल्सची संख्या तीस लाखपेक्षा जास्त आहे. 

जानकीरमण यांना आपल्या वेबसाइटला असं नाव द्यायचं होतं, ज्यातून ती सेवा कुणासाठी आहे हे कळेल. सुरवातीला त्यांची वेबसाइट विनामूल्य होती, मात्र नंतर ती व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होण्यासाठी शुल्क समाविष्ट करण्यात आलं. भारतात प्रचंड वैविध्य असल्यानं अशा प्रकारची सेवा भारतीय बाजारपेठेत प्रचंड गरजेची असल्याचं जानकीरमण यांना सुरुवातीलाच लक्षात आलं आणि त्यांनी सॉफ्टवेअर करिअरला रामराम ठोकून ‘भारतमॅट्रिमनी’वर काम सुरू केलं. सुरुवातीला त्यांनी स्वतःच तांत्रिक गोष्टींवर काम केलं आणि नंतर या कामासाठी खास तांत्रिक टीम पाहिजे असं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी अशी टीम तयार करण्यावर काम केलं.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ऑफलाइन विस्ताराची कथा
लग्नाच्या बाबतीत भारतात ऑनलाइन-ऑफलाइन अशा दोन्ही गोष्टी चालत असल्या, तरी ऑफलाइन चॅनेलचा विस्तार करण्यावर जानकीरमण ठाम होते. या ऑफलाइन विस्तारासाठी त्यांना अर्थातच त्यांच्या कंपनीत गुंतवणूक करू शकणारा मोठा गुंतवणूकदार पाहिजे होता. त्यांनी ‘याहू’कडे पाठपुरावा केल्यानंतर ती कंपनी गुंतवणूक करायला तयार झाली.

भारतमॅट्रिमनीनं अशाच प्रकारे इतरही कंपन्यांकडे पाठपुरावा केला. त्यांनी २००६मध्ये याहू, कन्नन पार्टनर्स आणि मेफिल्ड यांच्याकडून भांडवल उभारलं. याहू २०११मध्ये आपला हिस्सा बेस्सेमेर व्हेंचर पार्टनर्सला विकून या कंपनीतून बाहेर पडली. कन्नन पार्टनर्सनं आपला हिस्सा नंतर जेपी मॉर्गनला विकला.

कंपनीचं रिब्रँडिंग
नवीन गुंतवणूक मिळाल्यावर जानकीरमण यांनी आपल्या कंपनीचं रिब्रँडिंग करून ते नाव कॉन्सिम इन्फो प्रायव्हेट लिमिटेड असं केलं. यात क्लिकजॉब्ज डॉट कॉम, इंडियाप्रॉपर्टी डॉट कॉम, इंडियालिस्ट डॉट कॉम, लोनवाला डॉट कॉम आणि इंडियाऑटोमोबाईल डॉट कॉम अशा वेगवेगळ्या विभागांचा समावेश होता. गुंतवणुकीतून मिळालेल्या भांडवलाचा काही भाग मार्केटिंगसाठी वापरला जात असे. २०११मध्ये जानकीरमण यांनी शेवटची गुंतवणूक स्वीकारली आणि नंतर प्राथमिक समभागविक्रीचा (आयपीओ) मार्ग अनुसरायचं ठरवलं. २०१७मध्ये त्यांनी हा आयपीओ आणला. 

आयपीओमधून जानकीरमण यांना साडेपाचशे कोटी रुपये उभारायचे होते. ११ सप्टेंबर २०१७ला या आयपीओची नोंदणी झाली. त्यावेळी प्रती शेअर ९८३ ते ९८५ रुपये असा भाव त्या शेअरला मिळाला. आयपीओद्वारे व्यवसायाचा विस्तार करणाऱ्या उद्योजकाची प्रेरक कथा मुरुगावेल जानकीरण यांनी दाखवून दिली. छोटी कल्पना असलेली स्टार्टअप ते शेअर बाजारात नोंदणी झालेली कंपनी हा त्यांचा प्रवास अनेकांसाठी प्रेरक आहे. कोणतीही कंपनी हे स्वप्न प्रत्यक्षात आणू शकते.

विस्ताराला फायदा
आयपीओमुळे भारतमॅट्रिमनीसाठी अनेक गोष्टी सोप्या झाल्या. आयपीओतून उभारलेला पैसा जाहिरात आणि व्यवसाय प्रोत्साहनविषयक गोष्टी, चेन्नईत ऑफिस घेण्यासाठी जमीन खरेदी, ओव्हरड्राफ्टची रक्कम परत देणं आणि इतर कॉर्पोरेट गोष्टींसाठी वापरण्यात आला. आज भारतमॅट्रिमनीनं लग्नं ऑनलाइन जुळवण्याच्या व्यवसायाबरोबर इतर किती तरी गोष्टींमध्ये स्वतःचा व्याप वाढवला आहे. एलाइटमॅट्रिमनी डॉट कॉम, मॅट्रिमनीफोटोग्राफी डॉट कॉम, भारतमॅट्रिमनी सेंटर, क्लिकजॉब्ज डॉट कॉम, इंडियाप्रॉपर्टी डॉट कॉम, इंडियाऑटोमोबाईल डॉट कॉम, इंडियालिस्ट डॉट कॉम, मॅट्रिमनी डिरेक्टरी, मॅट्रिमनीबझार आणि मॅट्रिमनीमंडप्स अशा किती तरी माध्यमांतून सेवा दिली जात आहे. लग्नात पाहुण्यांनी आहेर दिल्यानंतर त्यांनाही भेट (रिटर्न गिफ्ट) द्यावी लागते, ते लक्षात घेऊन मुरुगावेल जानकीरमण यांनी ‘तांबुल्या’ नावाची रिटर्न गिफ्ट स्टोअर्सची साखळीही उभारली. ‘मॅट्रिमनीडिरेक्टरी’द्वारे त्यांनी लग्नाशी संबंधित सगळ्या सेवा द्यायला सुरवात केली.

समस्या आणि उपाय
मुरुगावेल जानकीरमण कंपनीच्या बिझनेस मॉडेलवर काम करत होते, तेव्हा त्यांना काही समस्या जाणवल्या. लोकांकडून पेमेंट्स मिळवणं या गोष्टीत त्यांना अडचणी आल्या. तेव्हा अमेरिकेत क्रेडिट कार्ड्‌सचा वापर करून सहज पेमेंट्स व्हायची, मात्र भारतात त्यांची व्याप्ती वाढली नव्हती. त्यामुळे त्यांनी त्यावर मात करण्यासाठी डोअर-टू-डोअर पेमेंट सोल्युशन तयार केलं आणि प्रत्येक शहरात एक कलेक्शन ऑफिस तयार केलं. हे भारतमॅट्रिमनीच्या ऑफलाइन बिझनेस मॉडेलकडे जाण्याच्या दृष्टीनं एक पाऊल होतं.

ऑफलाइन स्वरूपात विस्तार करणं हा त्यांच्या धोरणाचा भाग होता. नुसता ऑनलाइन शोध घेण्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनसाथीचा प्रत्यक्षपणेही शोध घेण्याची संधी मिळावी हा त्यात उद्देश होता. त्यामुळे ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर नसलेलेही लोकही या कंपनीच्या सेवेचा लाभ घेऊ शकत होते. ही ऑफलाइन ऑफिसेस कलेक्शन सेंटर्स म्हणूनही काम करत असायची. अशा प्रकारची ऑफिसेसची चेन देशभरातल्या शहरांमध्ये तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भांडवल लागणार होतं आणि ‘भारतमॅट्रिमनी’कडे त्यावेळी तेवढं भांडवल नव्हतं. जानकीरमण यांनी मग कंपनीचं आर्थिक आरोग्य वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. उद्योगाचा विस्तार करण्‍यासाठी भांडवल उभं करण्यासाठी ते प्रयत्न करायला लागले.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bharat matrimony dot com murugavel janakiraman IPO