'बेटी बचाव' ते 'बेटी भगाव' (अग्रलेख)

bjp mla ram kadam
bjp mla ram kadam

स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर लाल किल्ल्यावरून देशवासीयांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘महिलांची सुरक्षा आणि प्रतिष्ठा जपण्यासाठी  प्रशिक्षण द्यायला हवे, ते खरे तर पुरुषांनाच,’ असा वास्तववादी विचार मांडला होता; पण त्याला आता दोन वर्षे उलटून गेल्यानंतर चित्र काय आहे? देशाचे जाऊ द्या; पंतप्रधानांना आधी त्यांच्याच पक्षातील काही बुरसटलेल्या मानसिकतेच्या लोकांचे प्रबोधन करण्याची गरज किती आहे, हे स्पष्ट झाले आहे. राजकीय क्षेत्रातील पुरुषही नेमक्‍या कोणत्या दिशेने विचार करत आहेत, त्यावर भाजपचे आमदार राम कदम यांच्या ताज्या वक्‍तव्यामुळे झगझगीत प्रकाश पडला आहे. ‘मुलगी नकार देत असेल तर मला सांगा, तिला पळवून आणू!’ असे आश्‍वासन या कदम महाशयांनी तरुणांना दिले आहे. कदम यांची ही बेताल बडबड हे एक लक्षण आहे. मूळ विकार खोलवर गेलेला आहे आणि तो पुरुषी मानसिकतेशी संबंधित आहे. एकविसाव्या शतकातही तिच्यात काहीही बदल घडत नाही, याइतकी दुसरी खेदाची बाब असू शकत नाही. दहीहंडीचा खेळ सुरू असताना आणि मुख्य म्हणजे त्या खेळात युवकांबरोबरच युवतीही सहभागी होत असताना, हजारोंच्या जनसमुदायासमोर कदम यांनी हे तारे तोडले आहेत. तुमच्या आई-वडिलांना मुलगी पसंत असेल तर तिला पळवून आणू, अशा वल्गना करताना आपण सार्वजनिक जीवनात वावरत आहोत, लोकप्रतिनिधी आहोत, याचेही त्यांचे भान सुटलेले दिसते. हे सारेच अत्यंत किळसवाणे तर आहेच; शिवाय त्यामुळे त्यात मुलीच्या पसंती-नापसंतीचा जराही विचार करायची कदम आणि त्यांच्यासारख्याच देशातील बहुसंख्य पुरुषांची तयारी नाही, हेच दिसून आले आहे. कदम यांच्या या वक्‍तव्याचा सर्व स्तरांतून तीव्र निषेध होत आहे, एवढी एकच बाब या पार्श्‍वभूमीवर समाधानाची मानावी लागेल.

एकीकडे कदम यांनी हे तारे तोडले असतानाच, तिकडे मोदी यांच्याच मतदारसंघातील सुप्रतिष्ठित म्हणून गणल्या गेलेल्या विद्यापीठाच्या ‘आयआयटी’मध्ये ‘आदर्श बहूं’चे कारखाने उघडण्यासाठी काही अभ्यासक्रम तयार करण्यात आल्याचे वृत्त आले आणि संतापाची लाट उसळली. खरे तर अशा प्रकारचे अभ्यासक्रम तयार करावयाचेच असतील तर ते आदर्श सासू, आदर्श नवरा किंवा आदर्श नणंद तयार करण्यासाठी असायला हवेत. आपल्याकडे लग्न होऊन सासरी जाणाऱ्या मुलीने कसे वागावे, कोणत्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात, वेगवेगळ्या भूमिका कशा निभावाव्यात, याविषयी फार लहानपणापासून मुलींच्या मनावर इतक्‍या गोष्टी बिंबवल्या जात असतात, की सर्व बंधनांचा स्वीकार तिने केला असल्याचे दिसत आहे. अर्थात, या वृत्तानंतर खळबळ उडाल्यामुळे अपेक्षेप्रमाणेच या ‘आयआयटी’च्या रजिस्ट्रारने असा कोणताही विचार नसल्याचा खुलासा केला. मात्र, त्याचवेळी पंतप्रधानांच्या ‘स्टार्ट अप’ मोहिमेत काम करू इच्छिणाऱ्या ‘यंग इंडिया स्किल्स’ नावाच्या समूहाने ‘मेरी बेटी, मेरा अभिमान!’ अर्थात ‘आदर्श बहू’ अशा नावाखाली हा विचार पुढे आणल्याचेही त्यांनी सांगून टाकले! स्टार्ट अपच्या नावाखाली कोणाच्या सुपीक डोक्‍यातून असल्या कल्पना निघत असतील तर आधी त्यांच्या डोक्‍यातील वैचारिक जळमटे दूर करावी लागतील.

देशातील पुरुषी मानसिकता अशा रीतीने उघड होत असतानाच आणि मुख्य म्हणजे ती प्रातिनिधिक स्वरूपात भाजपचाच एक आमदार जाहीरपणे व्यक्‍त करत असतानाच, उत्तर प्रदेशातील भाजपच्या दोन खासदारांनी महिला आयोगाच्या धर्तीवर ‘राष्ट्रीय पुरुष आयोग’ स्थापन करण्याची मागणी केली आहे. पुरुषांनाही स्त्रियांकडून त्रास दिला जात आहे, असा कांगावा काही मंडळी नेहेमी करीत असतात; परंतु अनेक कौटुंबिक समस्यांचे मूळ नातेसंबंधातील तणावांमुळे तयार होते. पुरुषांनी परंपरेने चालत आलेले हक्क आणि वर्चस्व गाजविण्यामुळे स्त्रीवर होणारे अन्याय आणि नातेसंबंधातील तणावातून सहन कराव्या लागणाऱ्या वेदना यांत मूलभूत फरक असतो; परंतु समाजातील दुर्बल घटकांच्या सुरक्षेसाठी करण्यात आलेल्या कायद्यांच्या, विशेष संस्थात्मक रचनेविषयी कुरकुर करणाऱ्यांच्या आवाजाचे प्रदूषण अलीकडे वाढले आहे. राष्ट्रीय पुरुष आयोग स्थापण्याची मागणी हा त्यातलाच एक प्रकार असल्याचे दिसते. कोणत्याही कायद्याचा दुरुपयोग होता कामा नये, ही मागणी रास्त ठरेल. असा दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई व्हायलाच हवी. या साऱ्याचा अर्थ स्पष्ट आहे. आपल्या घटनेने सर्वांना म्हणजेच महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीचे स्थान दिले असताना, देशातील अनेक जण; त्यातही राजकारणात वावरणारी मंडळी मध्ययुगीन काळातच अद्याप कशी रेंगाळत आहेत, हे स्पष्ट होते. सार्वजनिक जीवनात आवश्‍यक असलेले तारतम्य कदम यांना नसल्याचे त्यांच्या या वक्‍तव्यावरून दिसून येते. भाजपने या सर्वच घटनांच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करायला हवी; अन्यथा ‘मुलगी शिकली पण पुरुषांची अधोगती थांबली नाही’, असेच चित्र निर्माण होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com