...तडे गेले, पण युती अभंग! ​(अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 डिसेंबर 2016

भाजप व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांच्यातील धुसफुशीतून गोव्याच्या मंत्रिमंडळातून "मगो'च्या दोन मंत्र्यांची तडकाफडकी उचलबांगडी झाली आहे. मात्र यातून या दोन पक्षांची युती तुटली असा अर्थ काढणे फार घाईचे होईल.

भाजप व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांच्यातील धुसफुशीतून गोव्याच्या मंत्रिमंडळातून "मगो'च्या दोन मंत्र्यांची तडकाफडकी उचलबांगडी झाली आहे. मात्र यातून या दोन पक्षांची युती तुटली असा अर्थ काढणे फार घाईचे होईल.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्ष व महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांची जुनी मैत्री तुटते की काय, अशी स्थिती सध्या गोव्यात निर्माण झाली आहे. याला निमित्त ठरले आहे "मगो'च्या नेत्यांनी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यावर केलेली जहरी टीका आणि मुख्यमंत्र्यांनी प्रत्युत्तरादाखल सुदिन ढवळीकर व दीपक ढवळीकर यांची मंत्रिमंडळातून केलेली हकालपट्टी. भाजप व "मगो'ची मैत्री ही नैसर्गिक युती मानली जाते. भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या काळात ही युती आकाराला आली. भाजप "मगो'चा हात धरून गोव्याच्या राजकारणात पुढे आला आणि "मगो'ला त्याने कधी मागे टाकले ते कोणालाच समजले नाही. "मगो'च्या पीछेहाटीमुळे निर्माण झालेली पोकळी भाजप भरत गेला आणि गेल्या विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवेपर्यंतचा प्रवास भाजपने केला. या सर्व प्रवासात "मगो' सदासर्वदा भाजपसोबत होता असे नाही. कधी भाजप, तर कधी कॉंग्रेसची साथ देत "मगो' सत्तेत राहिला आहे. विद्यमान संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर आणि "मगो'चे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांच्या मैत्रीवर या युतीचा पाया रचलेला आहे. त्यामुळे सरकारमध्ये कितीही तणावाचे प्रसंग आले, अगदी "मगो'चे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांचे सहकार खाते काढून ते भाजपचे महादेव नाईक यांना दिले गेले तरी युती तुटली नाही. आताही युती तुटली वा युती करण्याचे दरवाजे बंद झाले असे मानण्यास भाजप तयार नाही. भाजपच्या मंगळवारच्या बैठकीतही पर्रीकर यांनी हीच भूमिका मांडली आहे. ती पुरेशी बोलकी आहे.

भाजपने "मगो'शी युती 2012 च्या निवडणुकीच्याआधी केली. त्याआधीही या दोन्ही पक्षांना युतीचा अनुभव होता. मात्र 2012 मध्ये भाजपला 21 आमदार असे स्पष्ट बहुमत मिळाले, तर "मगो'चे तीन आमदार निवडून आले. भाजपने निवडणूकपूर्व पाठिंबा दिलेले दोन अपक्ष निवडून आले, तरीही आधी ठरल्यानुसार दोन मंत्रिपदे "मगो'ला भाजपने दिली. पर्रीकर राज्यात मुख्यमंत्री असेपर्यंत सारे काही आलबेल होते. त्यांच्या एकछत्री अमलात तसा इतर मंत्र्यांना वेगळा सूर काढण्याची संधी क्वचितच मिळे. ते केंद्रात गेले, तेव्हा तत्कालीन आरोग्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी मुख्यमंत्रिपदाकडे कूच केली. त्यावेळेपासून मंत्रिमंडळात आलबेल नसल्याची चर्चा सुरू आहे. प्रसंगी मुख्यमंत्र्यांनाच आव्हान देण्याचा प्रकारही घडला आहे. खाते बदल केला म्हणून भाजपच्या मंत्र्यानेही जाहीर नाराजी व्यक्त केली होती. मुख्यमंत्र्यांनी कला व संस्कृती खात्यातील उधळपट्टीवर भाष्य केल्यावर त्या खात्याचे मंत्री दयानंद मांद्रेकर यांनीही त्याला प्रत्युत्तर दिले. त्यातच कोणत्याही उद्‌घाटनांसाठी मंत्री हे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनाच निमंत्रित करत. यावरून भाजपमध्येही पार्सेकर यांचे नेतृत्व आनंदाने स्वीकारले होते काय, याविषयी प्रश्‍न निर्माण होण्यासारखी स्थिती आहे.
या साऱ्याकडे युतीतील घटकपक्ष असलेला "मगो' पाहत होता. "मगो'च्या वाट्याला गेल्या निवडणुकीत सात जागा आल्या होत्या. त्यात तीन जागी त्यांना यश आले. सुदिन व दीपक यांचे यश गृहित होते. दोन- तीन ठिकाणी निसटता पराभव झाला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मनापासून साथ दिली नाही, अशी "मगो'च्या इतर नेत्यांची सुरवातीपासूनची भावना होती ती आता तीव्र झाली आहे.

"मगो'ने 24 मतदारसंघांत आपली संघटनात्मक बांधणी केली आहे. त्याच्या जोरावर सुदिन ढवळीकर यांना मुख्यमंत्रिपदी पोचविण्याचे "मगो' नेत्यांचे स्वप्न आहे. भाजपसोबत राहून "मगो' तीनपेक्षा जास्त जागा जिंकू शकणार नाही याची कल्पना "मगो'च्या नेत्यांना आहे. तेही पर्यायाच्या शोधात होते आणि एवढ्यात भाजपचे मार्गदर्शक गणले जाणारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते सुभाष वेलिंगकर यांनी भाजपच्या नेत्यांना धडा शिकविण्याची घोषणा केली. इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक विद्यालयांना दिले जाणारे सरकारी अनुदान बंद करावे, या मागणीसाठी सुरू झालेल्या भारतीय भाषा सुरक्षा मंचाने आपली गोवा सुरक्षा मंच नावाने राजकीय शाखा सुरू केली. यामुळे या "गोसुमं' व "मगो' यांची युती होण्यासाठी अनुकूल वातावरण दिसू लागले. त्यातच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी गोव्यात लक्ष घातले आणि युतीसाठी बोलणी केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही गोवा दौरा करत राजकीय वातावरणात काही वलये उमटवली. या साऱ्यामुळे भाजपपासून फारकत घेण्याची हीच योग्यवेळ असे "मगो'ने मानले. त्यांनी लक्ष्मीकांत पार्सेकर यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवा अशी युतीच्या बोलण्यांसाठी पूर्वअट घातली. त्यानंतर पार्सेकर यांनी राज्याला 10 वर्षे मागे नेले अशी जाहीर टीकाही केली. त्याची परिणती आता "मगो'च्या दोन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात झाली आहे. मात्र यातून युती तुटली असा अर्थ काढणे फार घाईचे होईल. कारण "मगो'चे संस्थापक भाऊसाहेब बांदोडकरांची ध्येय- धोरण, तत्त्वे आता राहिलेली नाहीत. "भाजप एवढाच मला "मगो'ही प्रिय आहे. फक्त तो योग्य व्यक्तींच्या हाती असावा,' अशी मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली अपेक्षा बरेच काही सांगून जाणारी आहे.

Web Title: bjp sena alliance