
गेल्या तीन-साडेतीन वर्षांत शिवसेनेच्या असंतोषाकडे भाजपने दुर्लक्षच केले. अमित शहा यांच्या एका भेटीने शिवसेनेची नाराजी दूर होईल अशी शक्यता नाही. त्यासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेला सन्मानाची वागणूक द्यावी लागेल.
गेल्या तीन-साडेतीन वर्षांत शिवसेनेच्या असंतोषाकडे भाजपने दुर्लक्षच केले. अमित शहा यांच्या एका भेटीने शिवसेनेची नाराजी दूर होईल अशी शक्यता नाही. त्यासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शिवसेनेला सन्मानाची वागणूक द्यावी लागेल.
भा रतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्राच्या सत्तेतील भागीदार शिवसेना यांच्यात गेली तीन-साडेतीन वर्षे निर्माण झालेली दरी सांधण्यासाठी अखेर पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी ‘मातोश्री’चा उंबरठा ओलांडला; पण त्यासाठी बऱ्याच राजकीय उलथापालथी घडाव्या लागल्या. भाजपला खिंडीत गाठण्यासाठी विरोधकांनी देशभरात एकत्र येण्याच्या हालचाली सुरू केल्यानंतर भाजपला मित्रपक्षांची प्रकर्षाने आठवण होणे साहजिकच!
अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने रोज बोटे मोडणारी शिवसेना या भेटीगाठींनंतर लगेच पांढऱ्या शेल्यात हात बांधून उभी राहील, असा अर्थ काढता येणार नाही. त्याचे कारण या दोन पक्षांच्या तथाकथित मैत्रीत अर्थकारणापासून मुंबईवरील वर्चस्वापर्यंत गुंतलेल्या अनेक मुद्यांमध्ये दडलेले आहे. मुंबई महापालिकेच्या गेल्या वर्षीच्या निवडणुकीत त्याचे प्रत्यंतर आले होते. या महापालिकेत शिवसेनेचा ‘अर्थपूर्ण’ प्राण अडकलेला आहे. मात्र, विधानसभेत शिवसेनेपेक्षा भाजपचा एक का होईना अधिक आमदार मुंबईतून निवडून आला आणि अमित शहा यांना मुंबई जिंकून घेण्याची स्वप्ने पडू लागली. उद्धव ठाकरे आणि फडणवीस या दोन ‘दोस्तां’मध्ये पहिला अकटोविकट संघर्ष त्याच निवडणुकीत झाला होता. त्यामुळे आता अडचणीत आलेल्या भाजपने कितीही नाकदुऱ्या काढल्या, तरी शिवसेना सहजासहजी वश होणे कठीणच आहे. शिवाय, भाजपशी यापुढे कोणत्याही परिस्थितीत युती नाही, असा ठराव शिवसेनेने केला आहे. त्यामुळे आता आपल्या वाघाला दोन घरे मागे कसे घ्यायचे, हाही उद्धव यांच्यापुढचा लाखमोलाचा प्रश्न असणार!
भाजपने मात्र आपल्या नेहमीच्या प्रसिद्धीतंत्रानुसार ही भेट सकारात्मक वातावरणात पार पडली आणि गैरसमजांचे रूपांतर स्नेहभावात होण्यासाठी अशाच आणखी भेटी घडवून आणल्या जातील, असे सांगायला सुरवात केली! मात्र, या भेटीसंबंधात भाजपचे प्रवक्ते टीव्हीवरून ‘आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो, तरीही विधानसभा असो की औरंगाबाद महापालिका आमच्या जागा वाढल्याच आणि पालघर तर आम्ही जिंकलीच!’ असे निदर्शनास आणून देत होते! त्यामुळेच मग ही भेट ‘आपण विरोधातच लढून, आपापल्या जागा वाढवून घेऊया,’ या मुद्यावरील चर्चेसाठी होती काय, अशी शंका घ्यायला जागा आहे! तेव्हा अमित शहा यांनी ‘मातोश्री’वर पायधूळ नेमकी कशासाठी झाडली, याबाबत कमालीचे गूढ निर्माण झाले आहे.
मात्र, एक बाब नक्की आणि ती म्हणजे शहांनी ‘मातोश्री’चा दरवाजा खटखटावल्यामुळे शिवसैनिकांमध्ये कमालीचा उत्साह निर्माण झाला आहे. त्यांचा ‘बाणा’ आता अधिक कडवट होणार, असा संदेश या भेटीने गेला आहे! या भेटीनंतर भाजपच्या गोटात आनंदोत्सवाचा देखावा उभा करण्याचा प्रयत्न जरूर झाला. मात्र, त्यांची खरी चिंता वेगळीच आहे.
या भेटीनंतरही किमान लोकसभेत तरी आम्ही बरोबरच लढणार, असे वातावरण तयार करण्याचा, निवडणुकांना प्रत्यक्ष तोंड फुटेपर्यंत भाजपचा प्रयत्न राहील. मात्र, शिवसेना या वेळी गाफील राहणे शक्य नाही. २०१४ मध्ये लोकसभेतील युतीमुळे मोदी यांना पंतप्रधानपदी बसवण्याचे स्वप्न साकार झाल्याबरोबर भाजपचे बाहू फुरफुरू लागले होते आणि त्यामुळेच विधानसभेच्या वेळी शिवसेनेला बोलण्यात गुंतवून ऐनवेळी युती तोडण्याची खेळी भाजपने केली. ही जखम शिवसेनेच्या जिव्हारी लागली आहे. शिवाय गेल्या तीन-साडेतीन वर्षांत होता होईल, तेव्हा शिवसेनेला आणि विशेषत: उद्धव यांना दुखावण्याचे काम भाजपने केले. परिणामी दुरावा वाढत गेला. अमित शहा यांच्या एका भेटीने लगेच पुन्हा शिवसेना ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे...’ असे गीत गाऊ लागेल, अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे. त्यासाठी भाजपला सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेनेला सन्मानाने वागवावे लागेल. ज्या प्रादेशिक पक्षांच्या बळावर भाजपने नव्वदच्या दशकात दिल्ली सर केली, त्यांच्याच खच्चीकरणाची खेळी पुढे केली गेली आणि ‘शतप्रतिशत भाजप’ची भाषा सुरू झाली. त्यामुळे आता विरोधकांची ऐक्याची भाषा आणि पोटनिवडणुकांमधील पराभव यामुळे पुनःश्च एकवार वरचढ झालेली शिवसेना आपला हक्काचा वाटा मागणार, हे उघड आहे. अमित शहा यांनी स्वत:च ‘संपर्क एक बहाना है, मोदी को जिताना है!’ असे उद्गार काढले आहेत. त्यामुळे आता या बहाण्याच्या जाळ्यात शिवसेनेला अडकवायचे असेल, तर त्यासाठी भाजपला २०१४ पासून चार अंगुळे वरूनच चालणारा आपला रथ थेट जमिनीवर आणावा लागेल, यात शंका नाही!