ढिंग टांग : खंजीर, कोथळा वगैरे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : खंजीर, कोथळा वगैरे!

ढिंग टांग : खंजीर, कोथळा वगैरे!

प्रात: वंदनीय मा. मोटाभाई शतप्रतिशत प्रणाम. अतिशय उद्वेगाने हे पत्र लिहीत आहे. आपल्या माजी मित्रपक्षाच्या आणि आता सपशेल शत्रुपक्षात गेलेल्या कुण्या एका राऊत नावाच्या खासदाराने कोथळा काढण्याची भाषा केली आहे. याच लोकांनी आपल्या पाठीत दीड-दोन वर्षांपूर्वी पाठीत खंजीर खुपसला होता, हे आपल्याला आठवतच असेल. कोथळा ही पुढची स्टेप झाली! जरा काही झाले की ही माणसे लागलीच अशी अंगलट का येतात? हेच समजत नाही. त्यांच्या या हिंस्त्र वक्तव्यांमुळे आपल्या कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरु झाली आहे. ही काय राजकारणाची भाषा झाली का? एकदम कोथळ्यावर काय येतात? महाराष्ट्राचे राजकारण बिघडत चालले आहे याचे वाईट वाटत आहे...

त्याचे झाले असे की, काही दिवसांपूर्वी मी या लोकांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला होता, याची जनतेला आठवण करुन दिली. त्यावर पाठीत खंजीर खुपसण्याचा आमचा इतिहास नाही, असे उत्तर या राऊतमहाशयांनी दिले होते. एवढेच नव्हे तर आम्ही समोरुन कोथळा काढतो, असेही ते म्हणाले.

पत्र लिहिण्याचे दुसरे कारण असे की, अशाच (ऐतिहासिक) भाषेत आपल्यालाही उत्तर देता येईल. परंतु, खंजीर, कोथळा, गनिमीकावा, कडेलोट, विश्वासघात, फंदफितुरी, सुलतानढवा, एल्गार असे शब्द वापरुन आपण भांडायला लागलो की थोड्याच वेळात आपले चि. नानासाहेब फडणवीस या लोकांबरोबर जेवून येतात, असा पूर्वानुभव आहे. त्यांना आवरावे! किंबहुना, अशा परिस्थितीत नेमके काय करावे? याचे कृपया मार्गदर्शन करावे. कळावे. आपला. कमळाध्यक्ष चंदुभाई कोल्हापूरकर.

वि. सू. : मी सुरक्षित आहे, काळजी नसावी!

मा. कमलाध्यक्स चंदुभाई, सतप्रतिसत प्रणाम. तमारा खत मळ्या! हवे कोथळा माने शुं? मने मोटळु खबर छे, कोथळु एटले शुं? चोकसी करवु पडसे. मोटाभाई.

वि. सू. : दरम्यानच्या काले हेल्मेट अने डब्बल जाकीट घेऊनशी फिरावे. रिस्क नको!

मा. मोटाभाई, शतप्रतिशत प्रणाम. आपल्या सूचनेबद्दल आभार! आपल्या आज्ञेनुसार पक्षकार्यकर्त्यांना हेल्मेट, डब्बल जाकिट सक्तीचे करत आहे. धन्यवाद! कोथळा हा एक शरीरातला अवयव आहे, असे चौकशीअंती कळाले. मी काही हा अवयव पाहिलेला नाही. आपल्या पक्षकार्यालयात काही कार्यकर्त्यांना विचारले. त्यांनीही ‘नाही बॉआ माहीत’ असेच उत्तर दिले. मन नावाचा एक अवयव असतो, पण तो दिसत नाही, तसलेच काहीसे हे प्रकरण असावे! तथापि, अधिक संशोधन केले असता असे आढळून आले की, इतिहासाच्या पुस्तकात किंवा ऐतिहासिक कादंबऱ्यात कोथळा या अवयवाचा उल्लेख वारंवार येतो. युध्दबिध्दाच्या गोष्टींमध्ये कोथळे काढण्याची भाषा येते.

शरीरविज्ञानाच्या पुस्तकात मात्र कोथळा कुठेही सापडला नाही. माझ्या कोथळ्यात दुखते आहे, असेही कुणाच्या तोंडून ऐकलेले नाही. तथापि, तांत्रिकदृष्ट्या पाहता कोथळा समोरुन बाहेर काढावा लागतो, असे त्यांच्या वक्तव्यावरुन दिसते. ‘आम्ही मावळे आहोत, समोरुन कोथळा काढतो’ असे ते म्हणाले होते. ही काहीएका प्रकारची शस्त्रक्रिया असावी, असे वाटते.

(त्या राऊतमहाशयांनाच विचारायला हवे, त्यांचा डॉक्टर-कंपौंडर मंडळींशी बराच संपर्क येतो.) ‘खंजीर पाठीत खुपसतात, आणि कोथळा समोरुन काढतात’ एवढीच प्राथमिक माहिती हाती आली आहे. कळावे. आपला नम्र. कमळाध्यक्ष.

वि. सू : तेवढे ते रा. नानासाहेबांचे राजकारण सांभाळून घ्यावे, ही विनंती. त्यांचा फोन तूर्त काढून घ्यावा, असे वाटते. कळावे. आपला विनम्र.

Web Title: Bjp State President Chandrakant Patil Criticize Shivsena Mp Sanjay Raut Dhing Tang

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..