मर्त्यांच्या जगात अमर्त्यबाबू... (मर्म)

मर्त्यांच्या जगात अमर्त्यबाबू... (मर्म)

लोककल्याणाचे सर्वंकष ध्येय आणि विचार उराशी बाळगून अध्ययन आणि संशोधनाद्वारे लक्षणीय योगदान देणाऱ्या ऋषितुल्य व्यक्‍ती विरळाच; पण त्यांचे कार्यकर्तृत्व आभाळाएवढे असल्यामुळेच की काय कुणास ठाऊक, जमिनीवरच्या मर्त्यलोकात ना त्याची दरकार असते, ना ओळख. किंबहुना, आपण आज जे काही अर्थशास्त्र अनुभवतो आहोत, त्यातली बरीचशी मौलिक कलमे या ऋषितुल्य व्यक्‍तींच्या अभ्यासपूर्ण दृष्टांतामुळेच तयार झाली आहेत, याची त्यांना कल्पना नसते. मग एखादा निष्णात अर्थशास्त्री केवळ राजकारणाच्या आखाड्यात उतरला म्हणून तो 'रेनकोट घालून स्नान करतो' अशी बाष्कळ टिप्पणी होते किंवा अमर्त्य सेन यांच्यासारख्या नावाजलेल्या अर्थशास्त्रज्ञाला 'बिनकण्याचा' असे हिणवले जाते.

ही सारी लक्षणे दोन बाबी प्रकर्षाने अधोरेखित करतात. एक, बुद्धिमंतांच्या कार्याची अवहेलना करणे, हा प्रचलित राजकारणाचा धर्म बनून गेला आहे आणि दुसरी बाब अधिक गंभीर आहे. एकंदरीतच समाज म्हणून आपण सारे वेगाने अधोगतीकडे गडगडत चाललो आहोत.


पश्‍चिम बंगालातील भारतीय जनता पक्षाचे प्रमुख दिलिप घोष यांनी अमर्त्यबाबूंना नोबेल-बिबेल मिळाले असले, तरी देशासाठी किंवा बंगालसाठी त्यांनी काहीसुद्धा केलेले नाही. नालंदा विद्यापीठातून हकालपट्टी झाल्यामुळे ते मोदीजींवर टीका करत आहेत, अशी मुक्ताफळे उधळली. बंगालात त्यांचे काम कोणीही ओळखत नाही, असेही ते म्हणाले. अमर्त्यबाबूंनी मात्र या निरर्गल टीकेला उत्तर न देण्याची परिपक्‍वता दाखवली हे वेगळे सांगावयाची गरज पडू नये. 'टीका करण्याचा हक्‍क लोकशाहीने त्यांना दिला आहे' एवढेच म्हणून त्यांनी विषय त्यांच्या बाजूने संपविला आहे.

कल्याणकारी अर्थशास्त्राच्या प्रवाहात अमर्त्यबाबूंनी केलेली मीमांसा आणि निष्कर्ष यांचा उपयोग फक्‍त भारतासारख्या विकसनशील देशांनाच नव्हे, तर जगातील अनेक गरीब राष्ट्रांना आपल्या उभारणीत होत असतो. जागतिक बॅंकेतील अध्वर्यूदेखील अमर्त्यबाबूंने केलेले विश्‍लेषण वेळोवेळी संदर्भासाठी विचारात घेतात; पण दिलिप घोष यांना त्याचे काही मोल वाटत नाही.

'नोबेल पुरस्कार इतरही काही बंगाल्यांनी मिळवला आहे, त्याचे काय एवढे?' इथवर त्यांची मजल गेली आहे. वास्तविक बंगाल ही अमर्त्यबाबूंची जन्मभूमी; पण पिकते तेथे विकत नाही, या म्हणीचा प्रत्यय देणारा हा प्रकार मानायचा आणि हताश होत्साते हे बुद्धाचे स्खलन बघत राहायचे. सुजाणांच्या हातात आता एवढेच उरले आहे का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com