तिटकारा! (ढिंग टांग)

तिटकारा! (ढिंग टांग)

पहिल्याछूट हे सांगितले पाहिजे की गेल्या कैक पिढ्या आम्ही ‘क्‍याशलेस’ काढल्या असल्या, तरी काळ्या पैशाबद्दल आमच्या मनात कधीही तिटकारा नव्हता, नाही आणि नसेल! किंबहुना, काळा पैसा हा खरोखरीच काळा असतो की आणखी कुठल्या रंगाचा, ह्याबद्दल आमच्या मनात अपरंपार कुतूहल मात्र बालपणापासूनच आहे. काळा पैसा दिसे कैसा, चाले कैसा, बोले कैसा ह्याचे अवलोकन करण्यात आमची पुढली हयात खर्ची पडली. बालपणी ‘दामू शेंडा तुफान पैसा खातो!’ हे शेजाऱ्याबद्दल आमच्या तीर्थरूपांनी वारंवार काढलेले उद्‌गार आम्हांस कायम चिंत्य वाटत. नोटा पापडांसारख्या तळून खाणारा इसम म्हंजे पैसे खाणारा इसम अशी आमची बरीच वर्षे समजूत होती. पुढे ती समजूत खरी ठरली! सदर शेंडे माणूस म्हणून अत्यंत कंडम असला, तरी त्यास चि. नयना नामे एक शेंडेफळ होते. चि. नयना ईस आम्ही ‘तुझे बाबा पैसे खातात, हे खरे आहे का?’ असे एकदा अत्यंत निरागसपणाने विचारले होते. परिणामी, काळा पैसा खाणाऱ्या शेंड्याने भर जिन्यात गाठून आमचे अत्यावश्‍यक ते सर्व अवयव काळेनिळे केले. त्या वेळी त्या शेंडे नावाच्या बैलास, ‘तूस अठराविश्‍वे दारिद्य येवो’ हा आम्ही (मनातल्या मनात) दिलेला शाप आजतागायत धगधगता आहे. असो.

‘‘काळ्या पैश्‍याबद्दल तुम्हाला एवढा तिटकारा होता, तर तुम्ही निवडून आलात तरी कसे?’’ साहेबांनी सवाल केला आणि आम्ही साफ साफ निरुत्तर झालो. हे म्हंजे ‘सौ सुनार की एक लुहार की’ ह्यापैकी झाले. भले! 

‘‘बोला...बोला ना, आता का वाचा बसली तुमची?’’ 

साहेब कडाडले.

‘‘साहेब... काही तरी गैरसमज होतोय...’’ आम्ही घाम 

पुसत म्हणालो.

‘‘काळा पैसा नसता तर निवडून आला असतात? बोला, आला असतात का?’’ साहेब ओरडले. 

ज्या माणसाकडे काळा पैसा नाही, तो निवडून येणे अशक्‍यच असते. काळा पैसा ही खायची गोष्ट असली तरी निवडून येणे हे काही खायचे काम नाही. उदाहरणार्थ, आमच्या कोपऱ्यावरील ‘नाइटबर्ड्‌स रेस्टारंट अेण्ड बार’ ह्या मनोरंजनगृहाचा मालक रा. दयाअण्णा शेट्‌टी ह्यांचेकडे मुबलक काळा पैसा असला, तरी त्यास त्याची पत्नीदेखील मत देणार नाही. निवडून येणे दूरच राहिले. तरीही लोकशाहीत निवडून यायचे असेल तर काळा पैसा लागतोच... आणि काळा पैसा लागतो, म्हणून तर निवडून यावे लागत असते!! असो.

‘‘काळा पैसा गाठीला नसेल तर माणसाला लोकशाहीत काहीही स्थान नसते. निवडून येणे ही तर दूरची गोष्ट...काय!’’ आमच्यावर बोट रोखत साहेब म्हणाले. हे मात्र खरे आहे. आमच्याच चाळीतल्या बंडू गोरे ह्याने नुकतेच पालिटिक्‍स जॉइन केले आहे. त्याच्या शब्दाखातर चाळीपुढची कचराकुंडीही साफ होत नाही. का? तर बंडू गोरे हा एक जन्मादारभ्य कडका मनुष्यप्राणी आहे. किंबहुना, पॉलिटिक्‍स म्हंजे उधार उसनवारी करण्याची एक सोय, अशीच त्याची समजूत आहे. असो. ‘‘असं कसं म्हंटा, साहेब! लोकशाही नावाची काही चीज आहे की नाही...,’’ आम्ही गुळमुळीतपणाने म्हणालो.

‘‘खामोश! वाट्‌टेल ते बोलू नका! लोकशाहीचा निवडून येण्याशी काय संबंध?’’ साहेब पुन्हा कडाड कडाड कडाडले. निवडणुकीचा अर्ज भरावा. हात जोडून भाषणे देत प्रचार करावा. आपण कसे धुतले तांदूळ आहो, आणि निवडणुकीच्या रिंगणातील बाकी माल कसा भरड आणि खडेयुक्‍त आहे, हे मतदारराजास पटवून द्यावे...असे सगळे सायसंगीत केले की कुंडलीतील ग्रहयोगांमुळे माणूस निवडून येतो, असा कुणाचा समज असेल तर त्याचे घर ‘मूर्खाच्या नंदनवनाशी गार्डन फेसिंग’ असणार, यात शंका नाही.

‘‘काळ्या पैशाबद्दल तिटकारा असणारा माणूस निवडून येणं अशक्‍य आहे... अशक्‍य!,’’ साहेबांनी बजावले. एक विलक्षण पॉज घेत त्यांनी पुढे जे सांगितले, त्याने आमच्या तर डोळ्यातच पाणी आले. अभिमानाने ऊर भरूनसुद्धा आला. ते म्हणाले-

‘‘गेल्या इलेक्‍शनात आम्ही सपशेल हापटलो ते काय उगाच? बोला, बोला ना!’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com