बुलंद बांधा, उमर सव्वाशे..!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

ही इमारत वारसावास्तूंच्या यादीतली असल्याने दुरुस्ती, सुशोभीकरण या गोष्टी काटेकोरपणे होणे अपेक्षित आहे. त्यासाठी तज्ज्ञांच्या नियुक्‍त्याही झाल्या आहेत. कागदोपत्री बऱ्याच योजना तयार आहेत. त्या सगळ्या तूर्त तरी त्याच इमारतीतल्या शेकडो फायलींपैकी एका फायलीत वाट पाहात पडल्या आहेत

इंग्रजांनी भारत देश सोडला खरा, परंतु त्यापूर्वी सुंदर इमारतींचा एक शाश्‍वत ठेवा ते ठेवून गेले. साहेबाच्या राजवटीचे हे मनोहारी अवशेष महानगरी मुंबईच्या दक्षिण टोकाला ठायी ठायी दिसतात. त्यातल्या डोळ्यांत भरणाऱ्या दोन पुरातन वास्तू म्हणजे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची भव्य इमारत आणि त्याच्या अगदी समोर गेली सव्वाशे वर्षे दिमाखात उभे ठाकलेले मुंबई महापालिकेचे मुख्यालय. या दोन्ही इमारतींचे बांधकाम जवळपास एकाच वेळी झाले. गॉथिक स्थापत्याचा अप्रतिम नमुना मानल्या जाणाऱ्या या दोन्ही इमारती. मुंबईचे पहिले आयुक्‍त क्रॉफर्डसाहेबांच्या अमदानीत महापालिकेच्या मुख्यालयाची इमारत बांधायला काढण्यात आली, त्यापूर्वी गिरगावातल्या एका छोटेखानी वास्तूत तिचा कारभार सुरूदेखील झाला होता. नंतर आत्ता जिथे काळा घोडा परिसर आहे, तिथे महापालिकेची सूत्रे हलली. फ्रेडरिक विल्यम स्टिव्हन्स या स्थापत्यकाराने केलेले गॉथिक शैलीतले रचनाचित्र मंजूर झाले आणि 1893मध्ये इमारत बांधून पूर्णही झाली. नेमकी तारीख सांगायची तर 31 जुलै 1893...त्याच्या पाच वर्षे आधी समोरचे "टर्मिनस' बांधून पुरे झाले होते.

या इमारतीने गेल्या सव्वाशे वर्षांत मुंबईची अनेक स्थित्यंतरे पाहिली आहेत. विशाल चौकात आणि रोज धुतल्या जाणाऱ्या मुंबईच्या रस्त्यांवर दौडणाऱ्या गिर्रेबाज व्हिक्‍टोरिया पाहिल्या आहेत. रस्त्यामधोमध धावणाऱ्या ट्रॅम्सची मिजास पाहिली आहे आणि आता जमिनीखालून जाणाऱ्या मुंबई मेट्रोचे खोदकामही ही इमारत शांतपणे पाहते आहे. कुठल्याही अस्सल मुंबईकराला अभिमान वाटावा, असा हा स्थापत्यकलेचा ठेवा आहे. आजही अनेक परदेशी पर्यटक या इमारतीचे बाह्य सौंदर्य कॅमेऱ्यात टिपण्यासाठी धडपडताना दिसतात, ते उगीच नाही.
आपल्या लाडक्‍या इमारतीचा 125वा वाढदिवस साजरा करण्यासाठी मुंबईकर सज्ज आहेत. इमारतीवर अकरा कोटी रुपये खर्चून रोषणाई करण्यात आली आहे. मुख्य इमारत आणि पाठीमागील विस्तारित इमारतीला जोडणारा चिमुकला पूलही दुरुस्त करण्याचे चालले आहे. आसपास हिरवाई आणण्याचा बेत आहे. ही इमारत वारसावास्तूंच्या यादीतली असल्याने दुरुस्ती, सुशोभीकरण या गोष्टी काटेकोरपणे होणे अपेक्षित आहे. त्यासाठी तज्ज्ञांच्या नियुक्‍त्याही झाल्या आहेत. कागदोपत्री बऱ्याच योजना तयार आहेत. त्या सगळ्या तूर्त तरी त्याच इमारतीतल्या शेकडो फायलींपैकी एका फायलीत वाट पाहात पडल्या आहेत.

Web Title: BMC article