
जंगल वाचावे, झाडे जगवीत व निसर्ग हिरवागार दिसावा, असे त्याला वाटायचे. याच उत्सुकतेतून बाल पर्यावरणतज्ज्ञ बोधिसत्वचा जन्म झाला.
हरहुन्नरी बाल पर्यावरणप्रेमी
काही-काही मुलं जन्मजातच चिकित्सक वृत्तीचे असतात. त्यांना प्रत्येक गोष्टीत प्रश्न पडत असतात. उत्तरे शोधण्यासाठी ते बऱ्याच वेळा आई-वडिलांनाही भंडावून सोडतात, त्यांना स्वस्थ बसू देत नाही. याच उत्सुकतेतून यवतमाळमध्ये बोधिसत्व गणेश खंडेराव नावाचा एक बाल पर्यावरणप्रेमी व भविष्यातील संशोधक उदयास आला आहे.
- नरेंद्र चोरे, नागपूर
यवतमाळच्या बोधिसत्वचे वडील गणेश खंडेराव हे शिक्षक असून, आई गृहिणी आहे. त्यांचे घर शहराच्या एका टोकाला आहे. आजूबाजूला सर्वत्र जंगल आहे. बोधिसत्व पाच-सहा वर्षांचा असताना त्याला जंगलांमध्ये वणवे दिसायचे. त्यात जंगलांचे मोठे नुकसान व्हायचे.
जंगलाला आग लागली की बोधिसत्वचे आई-वडील जिल्हाधिकारी किंवा स्थानिक पत्रकारांना फोन करून माहिती द्यायचे. तेव्हापासून लहानग्या बोधिसत्वच्या मनात पर्यावरणाविषयी कुतूहल, व आवड निर्माण झाली. जंगल वाचावे, झाडे जगवीत व निसर्ग हिरवागार दिसावा, असे त्याला वाटायचे. याच उत्सुकतेतून बाल पर्यावरणतज्ज्ञ बोधिसत्वचा जन्म झाला.
बोधिसत्व सध्या १५ वर्षांचा आहे. वयाच्या सहाव्या वर्षापासूनच तो सामूहिक वनीकरणाचे काम करत आहे. पहिलीत असताना त्याने शालेय विज्ञान प्रदर्शनात सीडबॉल प्रकल्पाचे सादरीकरण केले. यामध्ये सीडबॉलचे उपयोग सांगून, ते तयार करण्याच्या पद्धतीचा तो प्रात्यक्षिक देत असे.
हा प्रयोग नंतर इतका लोकप्रिय झाला की, यवतमाळ आणि परिसरातील अनेक शाळा त्याला प्रात्यक्षिक देण्यासाठी बोलावत असत. केवळ वर्षभरात त्याने यवतमाळमधील तब्बल ७० ठिकणी प्रात्यक्षिके दिली. तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल आणि पालकमंत्री नितीन राऊत यांनी या कामासाठी बोधिसत्वचा सत्कार केला होता.
पुढे वेगवेगळ्या शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक व स्वयंसेवी संस्था, बचत गट, ग्रामपंचायती, उन्हाळी शिबिरे, एनसीसी आणि एनएसएसची शिबिरे, शाळा, महाविद्यालये, कार्यालये अशा शेकडो ठिकाणी जाऊन त्याने सीडबॉलचे प्रात्यक्षिक दाखविले.
उन्हाळ्याच्या सुटीत वेगवेगळ्या शाळांमधील विद्यार्थ्यांना त्याने ‘फळे खा आणि बिया जमवा’ असा गृहपाठ दिला. त्यानंतर दरवर्षी ‘महा सीडबॉल महोत्सवा’चे आयोजन करण्यास सुरुवात केली. या कार्यक्रमांमध्ये वेगवेगळ्या शाळांमधील हजारो विद्यार्थी, पालक आणि नागरिक सहभागी होऊन लाखो सीडबॉल जमिनीवर फेकले गेले.
बोधिसत्वने आतापर्यंत हजारो लोकांना सामूहिक वनीकरणासाठी प्रेरित करण्याचे काम केले. आजवर त्याने पाचशेहून अधिक ठिकाणी जाऊन पर्यावरण जनजागृतीविषयक कार्यक्रम केले आहेत. शाळा-शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना सामूहिक वनीकरणाच्या नवीन पद्धती शिकविल्या.
सीडबॉल पद्धतीचा प्रचार आणि प्रसार करता करताच बोधिसत्वने सामूहिक वनीकरणाच्या रॅपड् सीडबॉल मेथड, पर्णबीज पद्धत, पुरचुंडी पद्धत (ग्रीन पाऊच मेथड), नेल्ड पाऊस व जादुई मोजा पद्धत या चार-पाच नवीन बिनखर्ची पद्धती शोधून काढल्या. या सर्व रुजवणाच्या बिनखर्ची आणि नैसर्गिक पद्धती आहेत.
या पद्धती वापरून एक मनुष्य नवा पैसाही खर्च न करता एका पावसाळ्यात हजारो झाडे लावू शकतो, असे बोधिसत्वचे म्हणणे आहे. बोधिसत्वमुळे केवळ यवतमाळ आणि आजूबाजूच्या परिसरातीलच नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रातील लहान मुले व मोठ्या मंडळींना प्रेरणा मिळाली आहे. जपान व अमेरिकेतसुद्धा बोधिसत्वच्या नवीन पद्धतीचे कौतुक झाले.
अभियांत्रिकीचीही आवड
बोधिसत्वने विनाइंधन चालणारी अनेक सुलभ यंत्रेही तयार केली आहेत. यापैकी त्याच्या मेकॅनिकल सिव्ह या पर्यावरणपूरक ‘मल्टीटास्किंग अँड मल्टीग्रेन क्लीनिंग’ यंत्राला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम इग्नायटेड माइंड राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या यंत्राच्या मदतीने एक व्यक्ती केवळ तासाभरात १०० किलो धान्य हातात चाळणी न धरता साफ करू शकतो.
त्यामुळे धान्य स्वच्छ करणाऱ्या व्यक्तीच्या मान-पाठ आणि कंबरेवर ताण येत नाही. बोधिसत्व अभ्यासातही हुशार आहे. त्याला इलेक्ट्रिक वस्तूंशीदेखील खेळण्याची आवड आहे. भविष्यात एरो नॉटिकल इंजिनिअर होण्याचे बोधिसत्वचे स्वप्न असल्याचे त्याच्या आईने सांगितले.
पुरस्कार अन् मानसन्मानही
पर्यावरणाच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय योगदानाबद्दल बोधिसत्वला आतापर्यंत वेगवेगळ्या संस्थांनी पुरस्कार अन् मानसन्मान देऊन त्याच्या कामाचा गौरव केला. २०२० मध्ये अमेरिकेतील ‘ॲक्शन फॉर नेचर’ या संस्थेने त्याला ‘यंग इको हिरो अवॉर्ड’ने सन्मानित केले. याशिवाय ‘नॅशनल जिऑग्राफी चॅनल इंडिया’नेही बोधिसत्वाच्या पर्यावरणविषयक कामांवर एक माहितीपट तयार केला आहे. यंदाच्या वसुंधरा दिनानिमित्त २२ एप्रिल रोजी तो प्रसारित करण्यात आला.