धाडसामागे लपलेला धोका

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 जून 2017

राष्ट्रपतींचा ताफा जाताना जी रुग्णवाहिका अचानक समोर आली, त्याबाबत कोणतीच माहिती त्याक्षणी पोलिसांकडे नव्हती. कदाचित, रुग्णवाहिकेतून कोणी भलतेच लोक आडवे आले असते, तर अनवस्था प्रसंग ओढवू शकला असता

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील "व्हीआयपी' संस्कृतीला लगाम घालण्यासाठी मंत्री व प्रशासनातील उच्चपदस्थ यांच्या डोक्‍यावरील "लाल दिवा' एका फटक्‍यात काढून घेतला खरा; तरीही राजकारण्यांची समाजात मिरवण्याची हौस आणि त्या पायी आम आदमीला वेठीस धरण्याची रीत कमी झालेली दिसून येत नाही. अर्थात, त्यास या तथाकथित उच्चपदस्थांपुढे लांगूलचालन करणारे प्रशासन आणि पोलिस खाते जबाबदार आहे, हे उघड आहे. या पार्श्‍वभूमीवर बंगळूरमधील फौजदार एम. एल. निजलिंगप्पा यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच. निजलिंगप्पा व त्यांचे सहायक अधिकारी विश्‍वनाथ यांनी एका रुग्णवाहिकेला मार्ग काढून देण्यासाठी थेट राष्ट्रपतींचा ताफा रोखून धरला. या अपवादात्मक आणि म्हणूनच धाडसी ठरलेल्या कृतीबद्दल निजलिंगप्पा यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होणे स्वाभाविक आहे.

झाले असे की मेट्रो प्रकल्पाचे उद्‌घाटन करण्यासाठी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शनिवारी बंगळूरमध्ये होते. त्यांचा ताफा राजभवनाकडे जाताना वाटेत एका रुग्णवाहिकेला जलद गतीने इस्पितळापर्यंत पोचता यावे म्हणून निजलिंगप्पा यांनी चक्‍क राष्ट्रपतींच्या ताफ्याला हात दाखवून थांबविले! त्या अवचित क्षणी हा असा निर्णय घेणे सोपे नव्हते; कारण अद्यापही या देशातील सर्वसामान्यांच्या मनावरून "व्हीआयपी' संस्कृती पूर्णपणे पुसली गेलेली नाही. तरीही निजलिंगप्पा यांनी तो निर्णय घेतला. अचूक प्राधान्यक्रम ओळखून घेतलेल्या या निर्णयाबद्दल निजलिंगप्पा यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्‍त प्रवीण सूद यांनी जाहीर केले आहे. महाराष्ट्रात अवयवदान शस्त्रक्रियेसाठी संबंधित रुग्णवाहिकांना "ग्रीन कॉरिडॉर'ची व्यवस्था करून मार्ग मोकळा करून देण्याची पद्धत अलीकडेच सुरू झाली आहे आणि त्यामुळे अनेक रुग्णांना जीवदान मिळाले आहे.

मात्र, या घटनेकडे आणखी एका दृष्टिकोनातून बघता येते. ज्या रुग्णवाहिकांसाठी "ग्रीन कॉरिडॉर'ची व्यवस्था उपलब्ध करण्यात येते, त्या वाहिकेचा तपशील पोलिसांकडे असतो. राष्ट्रपतींचा ताफा जाताना जी रुग्णवाहिका अचानक समोर आली, त्याबाबत कोणतीच माहिती त्याक्षणी पोलिसांकडे नव्हती. कदाचित, रुग्णवाहिकेतून कोणी भलतेच लोक आडवे आले असते, तर अनवस्था प्रसंग ओढवू शकला असता. त्यामुळेच निजलिंगप्पा आणि विश्‍वनाथ यांचे कौतुक करताना केवळ बंगळूर पोलिसांनाच नव्हे, तर देशभरातील पोलिसांना अशा वेळी गांभीर्याने विचार करून निर्णय घ्यावा लागेल, हे निश्‍चित.

Web Title: bold initiative