लढवय्या नेता 

लढवय्या नेता 

कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्या निधनाने नगर जिल्ह्यातील खंडकरी शेतकऱ्यांचा आवाज राज्य पातळीवर उठवून, त्यांना त्यांच्या जमिनी परत मिळवून देणारा एक लढवय्या नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. माधवराव 95 वर्षांचे होते आणि आपल्या या प्रदीर्घ वाटचालीत त्यांनी कमालीच्या हलाखीच्या दिवसांपासून आमदारकीचे दिवसही बघितले होते. महाराष्ट्रात अस्तंगत होत चाललेल्या साम्यवादी चळवळीतील कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखालील या झुंजार नेत्याच्या निधनामुळे कम्युनिस्ट पक्षात मोठीच पोकळी निर्माण झाली आहे.

माधवराव हे मूळचे फलटणचे आणि घरात अठरा विश्‍वे दारिद्य्र. त्यामुळे त्यांच्या आईने थेट मनमाड गाठले आणि तेथे भाजीविक्रीचा व्यवसाय सुरू केला. लहानपणीच माधवराव राष्ट्र सेवा दलात सामील झाले, तेव्हा ते बापूसाहेब काळदाते यांच्या संपर्कात होते. मात्र, पुढे समाजवादी चळवळीशी झालेल्या वैचारिक मतभेदांनंतर ते कॉ. डांगे यांचे विचार आणि आंदोलने याकडे आकर्षित झाले आणि पुढे अखेरपर्यंत कम्युनिस्ट चळवळीशी जुळलेली नाळ त्यांनी कधीच तुटू दिली नाही. 

माधवरावांचे वास्तव्य मनमाड येथे होते आणि 1974 मध्ये महाराष्ट्रात प्रथमच झालेल्या नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत विजय मिळवून पुढे 1979 पर्यंत मनमाडचे नगराध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. मनमाडहून नगरला रेल्वेने जाणे सोपे असल्याने तेथील कॉ. कडू-पाटलांच्या संपर्कात ते आले आणि त्यांनी खंडकरी शेतकऱ्यांच्या चळवळीत स्वतःला झोकून दिले. प्रारंभी काही काळ ते कॉ. दत्ता देशमुख यांच्याही निकटवर्तीय वर्तुळात होते. मात्र, त्यांनी लाल निशाण गटात सामील न होता डांगे यांचेच अनुयायित्व अखेरपर्यंत कायम राखले.

1985 मध्ये ते नांदगाव मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आणि आपल्या बुलंद आवाजात, शेतकऱ्यांचे प्रश्‍न धसाला लावत त्यांनी विधानसभा दणाणून सोडली. ते कम्युनिस्ट चळवळीचे राज्य पातळीवरील नेते होते आणि महाराष्ट्र कम्युनिस्ट पार्टीच्या पॉलिट ब्युरोचेही प्रदीर्घ काळ सदस्य होते. मात्र, त्यांची शेवटची 10-12 वर्षे प्रकृतिअस्वास्थ्यामुळे त्यांना चळवळीपासून दूर घेऊन गेली. विस्मृतीचा आजार असतानाही, "नार-पार' आंदोलनात झालेल्या एका सभेला त्यांनी आवर्जून हजेरी लावली होती. बंडखोरी व चळवळी वृत्ती असलेले माधवराव स्वातंत्र्यचळवळ, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन, तसेच गोवा मुक्तिसंग्रामातही आघाडीवर होते. त्यांच्या निधनाने एका झुंझार नेत्याला महाराष्ट्र मुकला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com