खायचे काम! (ढिंग टांग!)

British Nandi Article on RAR law
British Nandi Article on RAR law

आपल्याकडचे काही बिल्डर भलताच पंक्‍तिप्रपंच करीत असल्याची टीप आम्हाला मिळाली. मांसाहाराच्या नावाखाली मराठी माणसांना मुंबईतून हद्दपार करण्याचा हा डाव आहे हे कोणीही सांगेल, पण मराठी माणसाला मुंबईत घर घेण्यापासून परावृत्त करून त्यास बदलापुरात पाठवण्याचा हा कुटिल डाव आम्ही हाणून पाडू, ही काळ्या फत्तरावरची रेघ आहे. आम्ही काही मेल्या म्हशीचे दूध प्यालो नाही. हाच खणखणीत संदेश देण्यासाठी आम्ही 'शाकाहारी' बिल्डरांविरुद्ध स्टिंग आप्रेशन केले. त्याचाच हा वृत्तांत.

एका अज्ञात बिल्डरचे ऑफिस. किंबहुना, 'अज्ञात डेव्हलपर्स' ही पाटी बघूनच आम्ही आत घुसलो होतो. आत मेथाशेट बसले होते. पाठीमागे अंडर कंट्रक्‍शन साइटचा फोटो (रिअल फोटो) प्रशस्त क्‍लब, मंदिर, जॉगिंग ट्रॅक, बगिच्यात खेळणारी लहान युरोपियन मुले! (आता ह्यांच्या जाहिरातीत युरोपियन मुले कोठून आली, हा नव्या वादाचा मुद्दा आहे!! असो.) निळ्याशार स्वीमिंग पुलात एक जोडपे... जाऊ दे.
मेथाशेटने आमच्याकडे कोळणीच्या पाट्यांवरील मेलेल्या पापलेटाच्या भेदक नजरेने पाहिले. त्यांना आम्ही साइटवर जाऊन आल्याचे घाईघाईने (आणि हिंदीत) सांगून टाकले. मेथाशेठने ताबडतोब कसचे सरबत मागवले. आम्ही त्यास नकार देऊन 'लश्‍शी बुलाव' अशी इच्छा व्यक्‍त केली. ज्याअर्थी आम्ही साइट बघून हपिसात आलो, त्याअर्थी आम्ही पोटेंशियल गिऱ्हाइक आहो, अशी अटकळ मेथाशेठने बांधली असावी. जो मनुष्य बिल्डरच्या हपिसात लश्‍शी मागवतो, त्याला भाव भेटतो, असा अनुभव आहे.

''चौथ्था माळा तमारेमाटेज खाली छे!...तुमी पुन्ना फ्लेट बगूनशी घ्या. भाबी अने चेकबुक दोगांनाबी घेऊनशी या! बुक करून टाका!!'' मेथाशेठने जिभेवर साखर घोळवत आम्हाला घोळात घेतले. उत्तरादाखल आम्ही खिश्‍यातून एक चेकबुकसदृश बारके चोपडे काढून टेबलावर आपटले.

''हुं तो कहुं के तमे आजच बुक करजो! भाबीला तर आवडनारज!!'' चेकबुक बघून मेथाशेठचा धीर सुटला होता, हे आम्ही चाणाक्षपणे वळखले. 'आम्ही जरा थ्री बीएचके बघत होतो' असे आम्ही उगीचच बोललो. थ्री बीएचके!! च्यामारी आमच्या बेचाळीस पिढ्या वाळक्‍यांच्या चाळीत, दहा बाय बाराच्या खोलकंडात गेल्या. बोलायला काय जाते?
''स्टेसनथी ओन्ली फॉर्टी मिनिट्‌स!'' मेथाशेठने विषय बदलला.
''चालत?'' आम्ही.
''रिक्‍साथी!!'' मेथाशेठ पडेल आवाजात.

''स्टेशनवर रिक्‍शानं जायची वेळ येतेय कशाला?'' जणू काही आमच्या बेचाळीस पिढ्या मोटारीतच जन्माला आल्याच्या दैवी आवाजात आम्ही.
''हाय वे तो त्रण मिनिट्‌स!'' उजळलेल्या चेहऱ्याने मेथाशेठ.
''रेट काय पडेल साधारण?'' चेकबुकशी चाळा करत आम्ही.
''तुम्हाला कसला रेट, साहेब! तुमी तो घरच्या माणस छे!! फ्लेट आपडोज छे!!'' मेथाशेठ कंप्लीट खलास झालाय, असा वाचकांचा गैरसमज इथे सहज होऊ शकेल, पण ते तसे नसते. बिल्डर हा एक आपल्या ओळखीचा भला मनुष्य असून आपला प्रचंड आदर करणारा आहे, ह्या भावनेला भान हरपणे असे म्हणतात.
''इथं माणसं बरी आहेत ना? शेजार सुशिक्षित आणि सुसंस्कृत हवा... काय शेठ?,'' अर्थशास्त्रातल्या पीएचडीची पुंगळी नुकतीच समारंभपूर्वक स्वीकारून थेट इथं आल्याच्या थाटात आम्ही.

''अरे, एकसो एक हिरा छे हिरा!! आता तुम्हीज येणार, म्हंजे बघा ने! हेहेहे!!'' मेथाशेठने आता जिभेवरची साखर नष्ट करून म्हैसूरपाकच धारण केला होता.
''अरे, व्वा! चांगला शेजार सगळ्यात महत्त्वाचा! सभ्य माणसं आसपास असतील, तर इतका खर्च करण्यात अर्थ आहे... काय शेठ? बरोबर ना?,'' आम्ही मुद्दा ताणला.
''चोक्‍कस!'' मेथाशेठचे भान हरपले होते.
ते वळखून आम्ही शेवटचे वाक्‍य टाकले...
''कधी एकदा इथं येऊन बोंबील भाजतो असे झाले आहे!! अहाहा!!'' आम्ही उद्‌गारलो.
मेसर्स 'अज्ञात डेव्हलपर्स'चे हपिस त्या दिवसापासून बंद आहे. आम्ही चेकबुकानिशी रोज फेऱ्या मारीत आहो!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com