मध्यावधी?

ब्रिटिश नंदी
गुरुवार, 25 मे 2017

आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सर वैशाख कृष्ण त्रयोदशी श्रीशके 1939.
आजचा वार : बृहस्पतीवार.
आजचा सुविचार :
घेता किती घेशील दो कराने, आहे कितीसाऽऽवधी?
गेला लाल दिवा डब्यात मनुजा, येईल मध्यावधी!

आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सर वैशाख कृष्ण त्रयोदशी श्रीशके 1939.
आजचा वार : बृहस्पतीवार.
आजचा सुविचार :
घेता किती घेशील दो कराने, आहे कितीसाऽऽवधी?
गेला लाल दिवा डब्यात मनुजा, येईल मध्यावधी!

नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद हे बिघडलेल्या कूलरसारखे असते. कूलरमध्ये पाणी घालून गंजीफ्राकाची वळकटी पोटाच्या वर घेऊन कूलरसमोर फतकल मारून मोठ्या अपेक्षेने बसावे आणि भरभराटापलीकडे हाती काहीही न लागून घाम मात्र फुटावा, असे सध्या महाराष्ट्राच्या जनतेचे झाले आहे. माझे मन द्रवते, पण हे पदच तसे आहे, त्याला काय करणार? कूलर लावला की एसीसारखी गार हवा, ताबडतोब सुरू झाली पाहिजे, अशी लोकांची अपेक्षा असते. इथे बसून मी कर्जमाफीरूपी कूलर सुरू करून द्यावा आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सुखाची झुळूक अनुभवायला मिळावी, अशी विरोधकांची मागणी आहे. वास्तविक महाराष्ट्राच्या जनतेसाठी मी किती राब राब राबतो आहे, हे साऱ्यांना दिसते आहे. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे शेतकऱ्यांशी संवाद साधायला शिवारा-शिवारांत जातो आहे. पण अजून आमच्याकडून कर्जमाफीच्या गार झुळका न सुटल्याने शेतकरीदादा हवालदिल झाला आहे. पण करू करू, लौकरच काहीतरी करू!! अजूनही माझा अभ्यास सुरू आहे, म्हटले!! एकदा माझी पूर्ण तयारी झाली, की मी ताबडतोब कूलर सुरू करीन!! परीक्षेला बसून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होईन. तसा मी मेरिटवाला विद्यार्थी आहे, हे अवघ्या (विदर्भासकट) महाराष्ट्राला माहीत आहे. अच्छे दिन आनेवाले है...खर्रेच!!
...पण परवा राष्ट्रवादीचे धाकले धनी ऊर्फ दादा मंत्रालयात भेटले. म्हणाले, ""अहो, आता बास झाला की अभ्यास... किती अभ्यास कराल. अभ्यासाच्या नादात परीक्षा विसराल!''
""ऊंहुं...अभ्यास झाल्याशिवाय मी परीक्षेला ऍपिअर होणारच नाही मुळी!!'' मी ठामपणाने म्हणालो.
""मग? यंदा ड्रॉप घेणार म्हणताय?'' दादांनी एक डेडली पॉज घेऊन विचारले. माझी झोपच उडाली. मी तिथून सटकलोच.
कर्जमाफीच्या अभ्यासात व्यत्ययसुद्धा खूप आले. मध्येच ते जीएसटीचे घोडे गंगेत न्हाले, हे सुदैव. कर्जमाफीच्या परीक्षेसाठी यूपीच्या योगीजींचे कोचिंग क्‍लासेस लावावेत, अशी सूचना आली, म्हणून योगीसरांना भेटलो. त्यांनी आख्ख्या वर्षाची फी एकदम भरावी लागेल आणि बॅचसुद्धा मनासारखी मिळणार नाही, कारण ऍडमिशन उशिरा घेत आहात, असे उत्तर दिले. ह्या कोचिंगवाल्यांना सरळ करायला हवे आहे. आमच्या शिक्षणमंत्र्यांचे इकडे लक्ष आहे की नाही? परिणाम इतकाच झाला की कोचिंग क्‍लास लावता आला नाही. घरातल्या घरातच अभ्यास करण्याची वेळ आली.
परवाच्या दिवशी अभ्यास करत बसलो होतो, तेव्हा अचानक आमचे नाथाभाऊ आले. हे आमच्या प्राथमिक शाळेचे भूगोलाचे मास्तर होते!! कडक होते, पण फळ्यावर उंच ठिकाणी लिहून ठेवलेले डस्टरने पुसताना वैतागायचे. माझी उंची चांगली असल्याने माझ्यावर खापर फुटत असे. असो.
""काय करताय?'' नाथाभाऊ.
""अभ्यास!'' आम्ही.
""कुठवर प्रगती?'' नाथाभाऊ. उत्तरादाखल आम्ही पालथी मूठ तोंडाकडे नेली.
""झाऽऽऽलं!'' असे म्हणून नाथाभाऊ दोन्ही गुडघ्यांवर थाप मारत उठले आणि निघून गेले.
आज पेपरात बघतो तो "अभ्यासच धड न झाल्याने परीक्षेला बसण्यात अर्थ नाही, सबब औंदा ड्रॉप घ्यावा लागणार', असे नाथाभाऊंचे भाकित. मला दरदरून घाम फुटला. घाईघाईने मी चंदूदादा कोल्हापूरकरांना फोन लावला. त्यांना विचारले, काय करू? ते शांतपणे म्हणाले-
""सिलॅबस चेंज करायचा जीआर काढा! विषय संपवा. परीक्षाही नको, अभ्यासही नको!!''
फोन ठेवला. खरेच, मला हे आधी सुचायला हवे होते. असो.
ता. क. : अभ्यास म्हंजे कर्जमाफी. परीक्षा म्हंजे कर्जमाफीच!! आणि ड्रॉप घेणे म्हंजे मध्यावधी!! पुन्हा असो.

 

Web Title: British Nandi article on Unexpected elections