निळासावळा!  (ढिंग टांग!)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 10 जून 2017

कुंद रात्रीच्या तिरक्‍या चाली 
काळोखाची असह्य गदमद 
राखेमधले निपचित इंगळ 
उगाच होते मनात सदगद 

दूर कुठेतरी काळोखातच 
कुत्र्यासम ओरडती रस्ते 
कडेस पडल्या नि:श्‍वसितांचे 
सौदे पडती वाजीव सस्ते 

उगाच खडखड करते केव्हा 
कुंद रात्रीचे कळकट बरतन 
रात्र रिकामी, गात्र निकामी 
निरर्थकाचे चिल्लर स्पंदन 

छतास फिरतो स्वमग्न पंखा 
गळफासाचे देत निमंत्रण 
उष्ण झळांच्या भवऱ्यामध्ये 
आयुष्याचे गरगर रिंगण 

तारेवरती बसुनि एकली 
घूक देतसे गूढ इशारे 
अमंगळाची वाघुळभाषा 
गढूळ करते सारे सारे 

कुंद रात्रीच्या तिरक्‍या चाली 
काळोखाची असह्य गदमद 
राखेमधले निपचित इंगळ 
उगाच होते मनात सदगद 

दूर कुठेतरी काळोखातच 
कुत्र्यासम ओरडती रस्ते 
कडेस पडल्या नि:श्‍वसितांचे 
सौदे पडती वाजीव सस्ते 

उगाच खडखड करते केव्हा 
कुंद रात्रीचे कळकट बरतन 
रात्र रिकामी, गात्र निकामी 
निरर्थकाचे चिल्लर स्पंदन 

छतास फिरतो स्वमग्न पंखा 
गळफासाचे देत निमंत्रण 
उष्ण झळांच्या भवऱ्यामध्ये 
आयुष्याचे गरगर रिंगण 

तारेवरती बसुनि एकली 
घूक देतसे गूढ इशारे 
अमंगळाची वाघुळभाषा 
गढूळ करते सारे सारे 

अस्मानातील उकीरड्यावर 
जुन्यापुराण्या धुरकट चिंध्या 
गदमदणाऱ्या शिळ्या पहाटी, 
क्षितिजावरती आंबट संध्या 

काविळ पिवळ्या पाचोळ्यातच 
कुठे हरवली हिरवी गाणी 
अश्‍वत्थाच्या खोडावरती 
नव्या सालीची जुनी कहाणी 

बिछान्यातले जीवित तेव्हा 
दु:खभराने उगीच कण्हते 
आणि घनांच्या आगमनाची 
हिरवी हिरवी सूक्‍ते म्हणते 

तरी केधवा एखाद्या तरी 
कुंद रात्रीचा नूर बदलतो 
शुष्काच्या शरीरावर जेव्हा 
अदृष्टाचा थेंब उतरतो 

अजारलेल्या बिछान्यात अन 
झुळूक शिरावी हल्लकफूल 
कण्हणे विसरून रात्र उठावी 
कुंदपणाची फेकून झूल 

असा उतरतो पहिला पाऊस 
कुंद रात्रीच्या गात्रांमधुनी 
मृदगंधाचा अवखळ वावर 
कात फोडतो तिथे जुनी 

अचेतनाच्या अंथरुणाचा 
मग गुंडाळून अपुला गाशा 
आयुष्याची पळे बकाली 
तिच्या मागुती सहस्त्र माशा 

वळवाच्या एका थेंबाने 
जीवित होते झिम्मड झिम 
जणू कुणितरी घेऊन आला 
जिंदगानीची बुटी हकीम 

कुंद रात्रीचे फुटोच मस्तक 
निष्प्राणाची नाळ तुटो 
घनांत दडल्या पंढरीराण्या, 
येई सावळ्या, विठो विठो! 

- ब्रिटिश नंदी

Web Title: british nandi dhing tang sakal editoria marathi news