ढिंग टांग : लीव्ह हेट्रेड, जॉइन इंडिया...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : लीव्ह हेट्रेड, जॉइन इंडिया...!

ढिंग टांग : लीव्ह हेट्रेड, जॉइन इंडिया...!

मा. पार्टी प्रेसिडेंट मि. खर्गेजी, प्रणाम. मी आपल्या पक्षाचा एक साधासुधा वायनाडचा खासदार असून सध्या लंडन येथे मुक्कामी आहे. मध्यंतरी मी ‘नफरत छोडो, भारत जोडो’ यात्रा केली होती, आणि तुम्हीही त्यात चार पावले चालून दमला होता, हे तुम्हाला आठवतच असेल.

यात्रेमध्ये मी फार भराभर चालत असे. अधूनमधून पळतदेखील असे. तेव्हा तुम्ही एकदा ‘नको नाऽऽ...’ असे अस्फुट पुटपुटल्याचे मला अंधूक स्मरते. आपल्या पक्षातील अनेक नेत्यांनी तेव्हा ‘तुम्ही फॉरेनला कधी जाणार’ असे विचारले होते. त्याप्रमाणे येथे आलो आहे.

माझी ‘भारत जोडो’ यात्रा प्रचंड यशस्वी झाली. मी ‘नफरत छोडो’ असे म्हटल्यामुळे अनेकांनी माझ्यासमोर नफरत छोडली. मी ‘भारत जोडो’ असेही म्हटले होते. साहजिकच अनेकांनी भारत जोडला. यात्रा यशस्वी झाल्यामुळे अशा प्रकारचा कार्यक्रम आमच्याकडेही करा, अशी निमंत्रणे परदेशातून येऊ लागली.

अखेर त्यांच्या विनंतीला मान देऊन पहिले इंग्लंडला आलो आहे. केंब्रिज विद्यापीठात मनोवेधक आणि विचारशील असे व्याख्यान देऊन मी येथील ‘लीव्ह हेट्रेड, जॉइन इंडिया’ यात्रेला प्रारंभ केला आहे. रिस्पॉन्स मस्त आहे.

एक वायनाडचा सामान्य खासदार वायनाडच्या मतदारांच्या व्यथा सोडवत हिंडण्याऐवजी लंडनमध्ये काय करतो आहे, असा कुत्सित प्रश्न आपल्याच पक्षातील काही लोक तुम्हाला विचारतील. पण तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करा, अशी विनंती मी तुम्हाला करेन.

इथे येण्यापूर्वी मी रीतसर प्रिविलेज लीव्हचा अर्ज टाकावा, असे मला सांगण्यात आले होते. परंतु, बॅगा भरण्याच्या नादात सपशेल विसरलो! शिवाय ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान (चेहऱ्यावरील) बरीच साफसफाई करायची राहून गेली होती, त्या नादात रजेचा अर्ज न देताच आलो. क्षमस्व! आल्यावर रजा मंजूर करावी, ही विनंती.

‘भारत जोडो’ यात्रेच्या वेळी मला अजिबात थंडी वाजली नाही. म्हणून मी टीशर्टवर देशभर फिरलो. इथे मात्र सुटाबुटात फिरणे भाग पडत आहे. मला सूटबूट की सरकार आणि सूटबूट, दोन्हीही आवडत नाही, पण काय करणार?

बाकी माझ्या व्याख्यानावर इथली मंडळी खुश आहेत. लोकशाही संकटात आली असून आपण आयुष्यात कधीही आता सत्तेवरुन खाली येत नाही, असा कमळवाल्यांचा जो समज आहे, त्या भ्रमाचा फुगा मी इथे फोडला आहे. भारतातील लोकशाही वाचवावी, यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन मी केले. त्यावरुन बराच गदारोळ झाल्याचे ऐकतो. खरे आहे का?

नवा शिवलेला सूट लकी निघाला! भारतात परतल्यानंतर हाच वेष कंटिन्यू ठेवावा, असे काही सहकाऱ्यांचे मत आहे. तुमचे मतदेखील कळावावे. आफ्टरऑल, तुम्ही पार्टी प्रेसिडेंट आहात, आणि मी कधीही वरिष्ठांच्या आदेशाबाहेर जात नाही.

मी परदेशात आलो की तिथे कमळवाल्यांचे धाबे दणाणते. मी देशातच हिंडावे, असा त्यांचा विचार दिसतो. ‘तुम्ही लौकर परत या’ अशी गळ मला अनेक कमळवाल्यांनीच घातली आहे. काय करु?

येथील यात्रा आटोपली की लगेच परतावे की काही दिवस वाढीव रजा घेऊन विपश्यना वगैरे उरकूनच यावे, याचा निर्णय अजून झालेला नाही. झाला, की कळवीनच. तोवर तेथील सारे सांभाळून घ्यावे. मी परतलो की पुन्हा ‘यात्रा : पार्ट टू’ काढीन, असे म्हणतो. बघू! बाकी सर्व उत्तम. कळावे. आपला आज्ञाधारक व निष्ठावान खासदार (वायनाड)

ता. क. : बेल्जियम, जर्मनी, कॅनडा, अमेरिका, क्युबा, युक्रेन आदी देशांतूनही मला ‘जोडो यात्रे’ची निमंत्रणे आली आहेत. जाऊ का? कळवावे.

टॅग्स :mallikarjun kharge