ढिंग टांग : …नाम तो सुना होगा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rahul gandhi kharge congress politics

ढिंग टांग : …नाम तो सुना होगा!

बेटा : (नव्या तडफेने एण्ट्री घेत) ढॅणटढॅण…ढॅण ढॅण ढॅण…ढिश्यांव ढिश्यांव! मम्मा, आयम बॅक!

मम्मामॅडम : (कागदपत्रं हातावेगळी करत) हं…!

बेटा : (आक्रमक पवित्र्यात) एकेक को देख लूंगा! कहीं का नहीं छोडुंगा!!

मम्मामॅडम : (कामात बिझी…) हंऽऽ…

बेटा : (दात ओठ खात) मुझ से पंगा लेना, बहुत भारी पडेगा!

मम्मामॅडम : (शांतपणाने) म्हणजे नेमकं काय करायचं ठरवलं आहेस?

बेटा : (त्वेषाने) अब आर पार की लडाई होगी! मैं सच के लिए संघर्ष कर रहा हूं! सच और साहस है जिसमें…अंत में जीत उसी की है!!

मम्मामॅडम : (हनुवटीला हाताचा आधार देत शांतपणे) ते कळलं! पण करणार काय आहेस?

बेटा : (युद्धाचा पवित्रा घेत) कितीही हल्ले झाले तरी मी प्रश्न विचारत राहणार! शांत चित्ताने उत्तर देत राहणार!

मम्मामॅडम : (संभ्रमात पडून) एक काय ते ठरव…प्रश्न विचारणार आहेस की उत्तरं देणार आहेस?

बेटा : (निर्णायकपणे) अस्सं? तर मग उत्तरं क्यान्सल! फक्त प्रश्न विचारीन!!

मम्मामॅडम : (धोरणीपणाने) पुढे काय करायचं ठरवलं आहेस, हे सांगत का नाहीस?

बेटा : (खांदे उडवत) त्यात सांगायचं काय आहे? लढणार!

मम्मामॅडम : (विचारपूर्वक) शत्रू बलाढ्य आहे!

बेटा : (बेफिकिरीने) असू दे!

मम्मामॅडम : (सावध करत) त्याच्या हातात सत्ता आहे!

बेटा : (बेधडकपणे) असू दे!

मम्मामॅडम : (आणखी सावध करत) त्याच्याकडे बहुमताचं अमोघ अस्त्र आहे! कार्यकर्त्यांची प्रचंड फौज आहे! प्रसिद्धितंत्रात तो वाकबगार आहे! तेरे पास क्या है बेटा?

बेटा : (फिल्मी अंदाजात) मेरे पास मां है…

मम्मामॅडम : (कृतक रागानं) काहीतरीच तुझं…!

बेटा : (अभिमानाने) आय मीन…सच और अहिंसा यह दोनों अस्त्र मेरे पास है! (गायकी ढंगाने खाकरत)…सच्वाई छुप नहीं सकती बनावट के उसुलोंसे…, और खुशबू आ नहीं सकती कागज के फूलांसे…!

मम्मामॅडम : (उदासपणे) नुसता अभिनिवेश असून उपयोग नाही बेटा! आपल्याला आता ठोस कृती करावी लागेल!

बेटा : (दिलासा देत) तेच मी करणार आहे मम्मा! तुम देखते रहना!! अशी काही कृती करतो की या कमळवाल्याची पळता भुई थोडी होईल!

मम्मामॅडम : (काळजीच्या सुरात) ते तर तुलाच माफी मागा असं सांगताहेत ना?

बेटा : (तिरस्काराने) हुं:!! माफी माय फूट! मैं कभी माफी नहीं मांग सकता!! मेरा नाम तो सुना होगा!!

मम्मामॅडम : (सुस्कारा सोडत) आडनावाच्या पुण्याईवर निवडणुका जिंकण्याचे दिवस गेले, बेटा!

बेटा : (निर्धाराने) पुन्हा येतील ते दिवस! आपला पक्ष सत्याचा आहे!! विजय आपलाच आहे!!

मम्मामॅडम : (नकारार्थी मान हलवत) आपल्या पक्षाला उभारी घेण्याची ही सुसंधी आहे, असं सगळे सांगताहेत! पण काय बरं करावं?

बेटा : (चुटकी वाजवत) मी पुन्हा एकदा ‘भारत जोडो यात्रा’ काढू का?

मम्मामॅडम : (हादरुन) पुन्हा ती पायपीट नको!

बेटा : (चुटकी वाजवत) आयडिया! मी आता ‘कमल तोडो’ यात्रा काढतो!

मम्मामॅडम : (डोकं खाजवत) …पुढल्या वर्षी निवडणुका आहेत, हे विसरु नकोस!

बेटा : (हाताची घडी घालत करारी बाण्याने) सच्वाई के सामने चुनाव भी कोई मायने नहीं रखता!

मम्मामॅडम : (विषय बदलत) बऱ्याच दिवसात तू विपश्यनेला गेला नाहीस? का बरं?

टॅग्स :political