british nandi's dhing-tang coloum
british nandi's dhing-tang coloum

र...र....रईस! (ढिंग टांग)

‘‘प प्याऽऽऽ....पप्याजीऽऽऽ! क्‍यिही वॉहॉ हॉये होऽऽईऽऽ...,’’ कृष्णकुंज गडाच्या बालेकिल्ल्यातील अंत:पुरातून तो विलक्षण पुकारा दुमदुमला आणि गडाच्या पायथ्याशी असलेला शिवाजी पार्कचा परिसर थर्थरला. पार्कवर इव्हनिंग वॉकला बाहेर पडलेल्यांपैकी दोघे-चौघे दचकून धडपडले. वडापाव खाणाऱ्यांच्या हातात पाव उरला. वडा पडला!! राजियांची वामकुक्षी संपली, हे इतिहासानेही ताडले आणि पुढे घडणाऱ्या ऐतिहासिक भेटीची दफ्तरी नोंद करण्यासाठी तो लेखणी सर्सावून बसला.
...त्या पुकाऱ्याने तिन्हीसांजेला घराकडे परतून येणारी पाखरे घाबरून अबौट टर्न करू लागली. कुणी तरी त्यांना ‘ऑ ऑ ऑ ऑ’ करत बोलावू लागल्याचा आवाज राजियांच्या कानी पडला. तेव्हा एक उशी त्यांच्या मस्तकावर विराजमान होती. टीव्हीवर ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ चालू असावा, असा कयास बांधून राजियांनी दुर्लक्ष केले.

...अंगी सावधपण बाळगणारा कदीम सेवक पप्याजी फर्जंद तटकन (स्टुलवरून) उठला. ‘क्‍यिही वॉहॉ हॉये हो...’ ह्याचा अर्थ ‘किती वाजले रे’ असा होतो, हे कळणारा पृथ्वीतलावरचा एकमेव मर्त्य जीव म्हंजे पप्याजी फर्जंद!
‘‘लौकरच दिवेलागणी होईल, राजे!,’’ पप्याजीने हलकेच गुप्त माहिती पुरविली. आभाळातल्या सूर्याला आता मुकाट अरबी समुद्रात डुबकी घेणे, क्रमप्राप्तच होते. पप्याजीने घाईघाईने वर्दी दिली, ‘‘बांदऱ्याच्या खाडी प्रांतातून खासा रईस खान मन्नत मागण्यासाठी दारी येवोन ठेपला आहे. आपली वामकुक्षी आटोपली असेल तर त्यास हाजिर करितो!’’
‘‘खान येकटाच आहे, की शिबंदी घेवोन आला आहे?,’’ राजे तटकन उठोन बसले.
‘‘एकलाच आहे. जेम्स आणि बाँड हे दोघेही पाहारेकरी त्याच्याकडे पाहोन हसत आहेत...,’’ फर्जंदाने डिटेलवार खबर दिली.
खान आला! खान आला ना!! आल्या आल्या खानाने आपल्या नेहमीच्या लकबीनुसार दोन्ही हात पंख पसरल्याप्रमाणे पसरले. फर्जंदाने तेवढ्यात संधी साधून त्यास मॉलच्या रखवालदाराप्रमाणे टटोलून काढले. खान नि:शस्त्र असल्याची राजियांना खूण केली.
‘‘ कायाय?’’ राजियांनी प्रेमाने खेकसून त्याचे स्वागत केले.

‘‘ मैं आ गया हूं...ऊं ऊं ऊं...,’’ डोकीवरची झुलपे उडवत खान म्हणाला. त्याच्या गळ्याची घाटी कबुतराच्या मानेसारखी गुटगुट गुटगुट हालली. बराच वेळ कोणी मिठीत येईना, हे पाहून त्याने अखेर हाताचे पंख मिटले. म्हणाला, ‘‘बहोत दिनोंसे तुम्हे मिलने की तमन्ना थी. लेकिन-’’
‘‘कशॅलॅ?,’’ राजियांनी वस्सकन प्रेमाने विचारपूस केली.
‘‘अगर किसी चीज को दिल से चाहो, तो सारी कायनात तुम्हे उससे मिलाने में जुट जाती है!,’’ खान मुंडी हलवत म्हणाला.

‘‘ हंऽऽ कायनात वगैरे काही नाही! मुकाट्याने सैन्याच्या फंडात पाच कोटी टाका आणि पिक्‍चर लावा! पुन्हा पाकड्यांना घेऊन सिनेमा काढलात तर बांदऱ्याच्या समुद्राकाठी कानसफाईचा धंदा करावा लागेल, हे बरे समजून असा!!,’’ राजियांनी डायरेक्‍ट विषयाला हात घालून तिथल्या तिथे तो संपवलाही. खासा रईस खान बांदऱ्याच्या खाडीशी कठड्यावर बसून गिऱ्हाईकाचे कान साफ करतो आहे, हे रम्य चित्र बिचाऱ्या पप्याजीच्या मनात काही केल्या उमटत नव्हते; पण तो उगी राहिला...
‘‘ब...ब...ब...बिलकुल बिलकुल! प...प...पाकिस्तानी म...माहिरा खान को हम यहां नहीं बुलायेंगे. इतनाही नही, इस के बाद क...क...कायनातने चाहा तो भी हम पाकिस्तानी आर्टिस्टों को नही लायेंगे. आपका सपोर्ट नही होएंगा तो ‘रईस’ का नाम बदलकर ‘भिकारी’ रखना पडेंगा. म...म...मेहेरबानी करो और रईस को र...र...रईसही रहने दो!,’’ खान अजीजीने म्हणाला. राजियांनी मान डोलावली.
‘‘आपके पूरे पार्टी के लिए मैं ‘रईस’ के फ्री टिकट दुंगा. कितने टिकट चाहिए होंगे आपकू?,’’ दिलदारपणाने खानाने आपली रईसी दाखवली; पण तीच चूक झाली.
साफ पडलेल्या चेहऱ्याने खोल आवाजात राजे म्हणाले- ‘‘ दे तीन-चार तिकिटं पाठवून...उरलेत तरी किती?’’
असो!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com