भेटीत धृष्टता मोठी..! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

आजची तिथी : दुर्मुखनाम संवत्सरे श्रीशके 1938 माघ कृष्ण चतुर्थी.
आजचा वार : व्हॅलेंटाइन डेचा उपवास!
आजचा सुविचार : ऋणानुबंधाच्या पिचून पडल्या गाठी...भेटीत धृष्टता मोठी!! हहहह!!!

आजची तिथी : दुर्मुखनाम संवत्सरे श्रीशके 1938 माघ कृष्ण चतुर्थी.
आजचा वार : व्हॅलेंटाइन डेचा उपवास!
आजचा सुविचार : ऋणानुबंधाच्या पिचून पडल्या गाठी...भेटीत धृष्टता मोठी!! हहहह!!!

नमो नम: नमो नम: नमो नम: (108 वेळा लिहिणे) काल रात्री पुण्याहून आलो. रात्रभर तळमळत होतो. डोळ्याला डोळा नाही. शेवटी सकाळी उठून बसलो. तरीही भयंकर बेचैन वाटून ऱ्हायले होते. इतके उदास वाटत होते की सकाळी उठून पंकज उदासच्या गझला लावून एकटा बसलो होतो. सकाळच्या पारी पंकज उदासच्या गझला ऐकणे म्हंजे... जाऊ दे. तेवढ्यात आमचे पीए आले आणि म्हणाले, ""सर, निघायला हवं!'' मी म्हटले, ""हं!''
""सोलापूरला प्रचाराला जायचे आहे!'' पीए.
""हं!..कसला प्रचार?'' मी.
पीए प्यांटीतल्या प्यांटीत काचकन दचकून पळून गेले. सीएमसाहेबांना काहीतरी झाले आहे, ही बातमी एव्हाना मंत्रालयात पसरली असणार. बंगल्यातील खानसामा येऊन न्याहरी तयार आहे, असे सांगून गेला. जिभेची चवच निघून गेल्यावर अन्न कुठले पोटात जायला? कशीबशी तीन प्लेट साबुदाणा खिचडी, दोन प्लेट साबुदाणा वडा, एक प्लेट उपवास मिसळ आणि तीन केळी एवढेच पोटात ढकलले!! म्हटले नाहीतरी अंगारकी आहे. चार घास कमी खाल्ल्याने काही होत नाही. मनात भलभलते विचार येत होते. हृदयात कलकलत होते.
सारा प्रसंग चित्रपटातल्या स्लोमोशनसारखा डोळ्यांसमोर सारखा तरळतो आहे. चित्रपटात नायक आणि नायिका क्‍लायमॅक्‍सला स्लोमोशनमध्ये एकमेकांकडे धावत येतात... अगदी तस्सा...
अगदी तस्सेच काल घडले. पुण्याच्या विमानतळावर...

प्रचाराची सभा आटोपून घाईघाईने मुंबईकडे यायला निघालो. पुण्यात एक बरे असते. कुणीही चहा वगैरे फारसा विचारत नाही!! भाषण संपल्यावर लगेचच गाडीत बसलो आणि चालकाला "विमानतळाकडे घे', असे फर्माविले.
संध्याकाळची वेळ होती. गावाकडे गाईगुजी घराकडे परतण्याच्या वेळेला पुण्यातील हॉटेले गजबजू लागतात. त्या वेळेला मी विमानतळावर पोचलो... पाहातो तो काय!
...कोपऱ्यात हाताची घडी घालून ती उभी होती. ती तीच ना? माझ्या अंगावर रोमांच आले. (ते रोमांच नसून काटा होता, हे मागाहून कळले. असो.) तोच निळसर-हिरवा कुर्ता. तोच शोभून दिसणारा चष्मा. तश्‍शीच तोंडावर रुमालाची घडी धरण्याची ती लकब. तिचं लक्ष नव्हतं बहुतेक. मी वेगाने विमानाकडे निघालो होतो. तेवढ्यात तिनं पाहिलं. नक्‍की पाहिलं.

कसनुसा हसलो. ती हसली की नाही, कळलं नाही. कारण तिने तोंडावर रुमाल धरला होता. रुमालाआड तोंड लपवून माणूस हसतोय की शिव्या देतोय कळत नाही. मग मी दोन पावले पुढे झालो. ती दोन पावलं मागे गेली. मग मी दोन पावलं घाईघाईने मागे आलो. ती दोन पावले ताड ताड पुढे आली...
असं दोन-तीन वेळा झाले. शेवटी मी हात हलवला. तिने तोंड फिरवले. मी ओशाळून तोच हात (स्वत:च्या) केसांमधून फिरवला. तेवढ्यात तिने हात केला. मी बघत राहिलो. तिने तोच हात वर नेऊन आळस दिल्यासारखे केले.
एकदाची आमची नजरानजर झाली. आम्ही हसलो. मी कमळाचे फूल वाहिल्याची ऍक्‍शन केली. तिने धनुष्याला बाण लावून तो माझ्यावर सोडण्याची ऍक्‍शन केली. मी जीभ काढून मान टाकण्याचा अभिनय केला!! तिने हसून टाळी वाजवली. म्हंजे एक टाळी स्वत:च स्वत:ला दिली! हाहा!!

तेवढ्यात विमान आल्याची घोषणा झाली. निरोपादाखल मी ओठ हलवून "जय महाराष्ट्र' म्हटले. त्यासरशी तिचा प्रेमळ भाव बदलून चेहरा अचानक संतप्त झाला. ओठांची भेदक हालचाल झाली. दगड उचलायला इकडे तिकडे बघतात, तशी ती शोधक नजरेने बघत असतानाच मी विमानाकडे सटकलो.
बस्स...इतकीच आमची भेट! व्हॅलेंटाइन डेच्या पूर्वसंध्येला झालेली. अजूनही ती डोळ्यांसमोर येत्येय.
ती...ती...ती व्यक्‍ती म्हंजे आमचे मित्रवर्य उधोजी! असो.

Web Title: british nandi's dhing-tang coloum