गाणे तुमचे-आमचे! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

"राजे, सील करा अंगाला, ऐसे म्हटले होते. आपण तर नाकांस सील केले?'' अमात्य बाळाजीपंतांनी अगत्याने विचारिले. उत्तरादाखल राजे किंचितसे शिंकले. ओहो, महाराष्ट्राच्या नवनिर्मात्यास सर्दी जाहली आहे तर!! अंगी ज्वर तर नाही? बाळाजीपंत अमात्य अंमळ चिंतितसे झाले. एक थर्मोमीटर काढून त्यांनी राजियांसमोर गुलाबकळीसारखा धरिला.

इतिहासास नेमके आहे ठावें. कां की तो साऱ्या घटितांची व अघटितांची ठेवितो नोंद. दुर्मुखनाम संवत्सरात शके 1938 मध्ये माघातील वसंत पंचमीस इतिहासाने आपल्या खतावणीत काव्यमय नोंद केली :

अखेर पाहुनी टाळींची वाट। राजे जाहले उभेचि ताठ।
दावू आता कात्रजचा घाट। वदले गा दुश्‍मना।।
म्हणाले, मऱ्हाटी माणसासाठी। गर्दभाचेही पद चाटीन।
परंतु प्रसंगी तेचि छाटीन। हे बरे जाणोनि असा।।
कसली तुमची ती भाजपा। येता जाता मारिती थापा।
त्यांना म्हणावे रस्ता नापा। आता झणि सत्वर।।
नको नको ती वादावादी। संभावितांना हवीच गादी।
वाघ लागला कमळेच्या नादी। आणि पडला तोंडघशी।।
सोडा त्यांची मन की बात। होईल बेमालूम हो घात।
तुमच्या राजाला द्या साथ। यंदा तरी लोकहो।।

...इतिहास नावाचा हा इसम अत्यंत ठुकरट कवी आहे, ऐसे ज्या कोणांस वाटेल, तो नतद्रष्ट आणि मऱ्हाटीद्रोही होय! असो. घडिले ते गद्यात सांगावयाचे तर असे :
वसंतपंचमीचें शुभमुहूर्तावर अखेर राजियांनी ठेविले आपुले पाऊल राजगडाबाहेरी. नवमहाराष्ट्राच्या नवनिर्माणाचे नवगायक द्वय अवधूतचंद्र गुप्त आणि स्वरस्वप्निल बांदोडकर गाऊ लागले...""तुमच्या राजाला साथ द्या... तुमच्याहा राहाज्यालाहा साहाथ द्याहा...''

नव्यानवेल्या नवनिर्माणगीताच्या धुंद चालीच्या गजरात राजियांनी म्हटले "पुनश्‍च हरिॐ'!!..अवघ्या मुंबापुरीत एक सुखद झुळूक धांव धांव धांवली, त्या झुळकीबरोबरच मराठी अस्मितेचा सुगंध दर्वळला. सारीजणें सुखावली, तेव्हा खुद्द राजियांनी मात्र लकबीने लावला नाकांस रुमाल!!

"राजे, सील करा अंगाला, ऐसे म्हटले होते. आपण तर नाकांस सील केले?'' अमात्य बाळाजीपंतांनी अगत्याने विचारिले. उत्तरादाखल राजे किंचितसे शिंकले. ओहो, महाराष्ट्राच्या नवनिर्मात्यास सर्दी जाहली आहे तर!! अंगी ज्वर तर नाही? बाळाजीपंत अमात्य अंमळ चिंतितसे झाले. एक थर्मोमीटर काढून त्यांनी राजियांसमोर गुलाबकळीसारखा धरिला.

""घ्या, राजे!'' बाळाजीपंत.
""हे कॅयाय?'' राजे प्रेमभराने खेकसले. राजियांचा अनुग्रह ऐसाच. आपलेपणाने ओरडले की मन कसे शुचिर्भूत होते. बाळाजीपंतांनी गुलाबकळीसारिखा धरिलेला थर्मोमीटर पाहून राजियांची भिवई वक्र जाहली. ओठांची भेदक हालचाल होऊन त्या थर्मोमीटरचे काय करायचे, ह्याच्या आक्रमक सूचना राजियांनी निव्वळ नजरेने केल्याने घाबरलेल्या बाळाजीपंतांनी तत्काळ ते पारायंत्र उपरण्याखाली दडविले.
""आपणांस ताप तर नाही ना आला राजे?'' बाळाजीपंत अमात्यांनी आवाजात जमेल तेवढा काळजीरस जमा करोन विचारणा केली. एव्हाना बॅंडवर अवधूतचंद्र गुप्त आणि स्वरस्वप्निल बांदोडकर ह्यांचे वीररसयुक्‍त नवनिर्माणाचे गाणे सुरू होते. पण राजियांच्या काळजीपोटी त्यांचे गाणे बाळाजीपंत अमात्यांना ""तुमच्या राजाला ताप द्या...'' ऐसे ऐकू येऊ लागले!! त्यांनी लागलीच गाणे बंद करावयास फर्माविले. म्हणाले : ""राजियांचे मस्तक दुखत्यें. ऐसे गाणे पुन्हा न गाणे...'' नवनिर्माणाचे नवगायक स्वरस्वप्निल बांदोडकर ह्यांनी ह्यावर निरागसपणाने विचारिले : राधा ही बावरी म्हणू? म्हणू? म्हणू?
इति.

Web Title: British Nandy Dhing Tang