सुखी माणसाचा सदरा

British_Nandi
British_Nandi

सुखी असावे की समाधानी? सुख म्हंजे काय, नि समाधान म्हंजे काय? अशा गहन प्रश्‍नांसंबंधी चिंतन करण्यासाठी आम्ही वस्तुत: फडताळात जाऊन बसणे पसंत करतो; पण हल्ली तेथे झुरळे फार झाली आहेत! अतएव, आम्ही कालर फाटलेला आमचा सदरा व्यवस्थेशीरपणे खुंटीवर टांगून ठेवून चटईवरच आडवारलो आहो. चिंतनाचा आम्हाला लागलेला घोर तुम्हाला स्पष्ट ऐकू येत असेलच. असो.

‘‘मला स्सांगाआ... सुख म्हंजे नक्‍की काय असतं अं?...काय अस्तं की जेऽऽऽ घरबस्ल्या मिळ्तं... टुंग टुंट टुडुंग टुंग...

आधुनिक मराठी संगीत रंगभूमीला भर दुपारी पडलेले स्वप्न जे की सुयोगगंधर्व पं. दामले ह्यांच्या ह्या सुप्रसिद्ध गीतपंक्‍ती गुणगुणत आम्ही सर्वप्रथम आमच्या चिंतनबुद्धीला आवाहन केले व कामास लागलो.

....निळ्याशार समुद्रकिनाऱ्यावर पहुडलेले आम्ही. दूरवर एखादे होडके लाटांवर डुचमळत्ये आहे. सीगल पक्ष्यांचे काही चुकार थवे निळ्याभोर आभाळात घिरट्या घालीत आहेत... लांबवर पसरलेला वाळूचा किनारा. सोनेरी रंगाच्या मऊशार वाळूत पोटावर पडलेले आम्ही. (खुलासा : पोटावर पडून राहाणे, हे ‘सुटलेल्या’ पन्नाशीतले एक स्वप्नच असते. कळले?) इतक्‍यात... लाटांच्या फेनफुलांच्या आडून एक आकृती उगवली. ओहो... तिनं ओलेचिंब केस झटकले. हे काय? ‘स्लो मोशन’मध्ये ती कमनीय आकृती आमच्याच दिशेने येत आहे की! कोण बरे ही? ‘बोलेरो’ ह्या तरुणपणी (चोरून) पाहिलेल्या हॉलिवुडी चित्रपटातली बो डेरेक? ‘सागर’ चित्रपटातली डिंपल? की आपली नुसतीच बिपाशा? छे, छे, हे तर स्वर्गीय सौंदर्य आहे. सागरतळीच्या साम्राज्यातली एखादी जलपरी तर नसेल? ती पाहा, ती आलीच...

तिच्या अंगप्रत्यंगावर वाळूचे कण चिकटले आहेत. लकी लेकाचे! तो पठ्ठ्या एक सीगल पक्षी धिटाईने तिच्या जवळ जाऊ पाहात आहे. तोही लकी लेकाचा... ते साक्षात सौंदर्य आमच्या दिशेनेच येत आहे.... आलेच की!

आम्ही तसेच (पोटावर) पडून राहिलो. छातीतील हृदय नावाचा अवयव धडधड करू लागला. घशाला कोरड पडली. किनाऱ्यावरच्या वाऱ्यावरही घामाचे ओघळ कानामागून निघाले. (खुलासा : होय, आम्ही थोडेसे घामट आहो) ती आमच्याकडे बघून मंद हसली. शंभर व्हायोलिन एकदम वाजावेत, तसे काहीसे झाले. तिने आमच्याकडे पाहून नाक उडवले. हृदयाची धडधड अचानक थांबून आमचे प्राणोत्क्रमण झाल्याची जाणीव झाली. मंद मंद पावले टाकीत ती आमच्या नजीक आली. हातातला अर्धओला टॉवेल आमच्या अंगावर टाकत तिनं तिचे ओष्ठद्वय काही बोलण्यासाठी विलग केले. पाच ते सात युगे तिच्या ओठांची जीवघेणी थर्थर सहन केल्यानंतर ते शब्द ऐकू आले :

‘‘अंघोळीला जा! भर दुपारी घोरत पडलाय घाणेरडा माणूस... शीः!!’’

...इथं आम्हाला दचकून जाग आली. जलपरीचा आवाज इतका बिर्याणीचा टोप सरकवल्यासारखा? किंवा उंदीर मारण्यासाठी कपाट सर्कवल्यासारखा? छे!
आमच्या पथारीशेजारी कमरेवर हात ठेवून कुटुंब उभे होते. आम्ही मुकाट्याने उठून न्हाणीघर गाठले.

स्नान करतानाच आम्हाला वरील कूटप्रश्‍नाचे उत्तर गवसल्याने आम्ही ‘युरेका, युरेका’ असे ओरडत बाहेर आलो. (खुलासा : सॉरी, तपशील मिळणार नाही! आंबटच आहा!!) आम्हाला गवसलेले सत्य असे : 

आमच्या स्वप्नात (ह्या वयात) अशी सुंदरी येणे, हे सुख!... आणि ‘ते स्वप्न होते’ ही वास्तवाची जाणीव म्हंजे समाधान! खुंटीवरचा कॉलर फाटलेला सदरा आम्ही पुन्हा एकदा प्रेमाने अंगावर चढवला आणि गुणगुणतच पुन्हा घराबाहेर पडलो... ‘मला स्सांगा, सुख म्हंजे नक्‍की काय असतं? कॅय ॲस्तं की जेऽऽ घरबस्ल्या मिळ्तं... टुंग टुंग टुडुंग टुंग!
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com