बंबई का दोस्त! (ढिंग टांग)

ब्रिटिश नंदी
मंगळवार, 3 जानेवारी 2017

आजची तिथी : दुर्मुखनाम संवत्सरे श्रीशके १९३८, पौष शुद्ध चतुर्थी.
आजचा वार : मंडेवार.

आजचा सुविचार : बंबई से आया मेरा दोस्त...दोस्त को सलाम करो!

आजची तिथी : दुर्मुखनाम संवत्सरे श्रीशके १९३८, पौष शुद्ध चतुर्थी.
आजचा वार : मंडेवार.

आजचा सुविचार : बंबई से आया मेरा दोस्त...दोस्त को सलाम करो!

नमो नम: नमो नम: नमो नम: (नवा लक्ष पुरा करायला घेतला आहे...) अतिशय प्रसन्न वाटून ऱ्हायले आहे. ज्या शहराच्या गल्लीबोळात स्कूटरवर फिर फिर फिरलो, भिंतीवर पोस्टरे चिकटवली. दोस्तमंडळींसोबत चनापोहा, चिवडा खाल्ला. तिथे आज मी ‘नागभूषण’ ठरलो. काळ कसा झरझर गेला. नागपूर फौंडेशनचा नागभूषण पुरस्कार पाच-सहा वर्षांपूर्वी ‘मुन्नाभाई’वाल्या राजू हिरानींना मिळाला होता. तेव्हाच मलाही हा पुरस्कार मिळावा, असे वाटले होते. तेव्हाही माझे मार्गदर्शक, गुरू आणि स्नेही गडकरीसाहेब बाजूला उभे होते. त्यांना मी माझे स्वप्न बोलून दाखवले होते.
‘‘हंऽऽ...मले तं कठीण वाटून ऱ्हायलं!’’ ते म्हणाले होते. मी उजव्या तळहातावर डावी मूठ हापटून विचारले होते, ‘‘असं काहून वाट्‌टं तुम्हाला?’’
‘‘मिळाला तं मले मिळून जाईले! पुरस्कार मुन्नाभाईले नही, मुन्नाभाईच्या निर्मात्याले भेटतो जी!!’’ ते म्हणाले होते. मी गोरामोरा झालो होतो. (तेव्हापासून आजतागायत गोरामोराच आहे. असो.)  योगायोग असा, की मला पुरस्कार मिळाला तो गडकरीसाहेबांच्याच हस्ते. काळ मोठा कठीण असतो नाही? पण गडकरीसाहेबांच्या त्या उद्‌गारांनी मला प्रेरणा मिळाली. ज्याप्रमाणे राजू हिरानींनी मुन्नाभाईला बदलून दाखवले, त्याप्रमाणे मुंबई बदलून दाखवीन, अशी प्रतिज्ञा मी तेव्हा केली. त्याचे फळ म्हणजे हा नागभूषण पुरस्कार होय. बाकी नागपूरने मला काय दिले नाही? आमचे संत तुकडोजी महाराज म्हणतात त्याप्रमाणे :
राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली,
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या!
...इथे झोपडी हा शब्द काढून तिथे नागपूर हा शब्द घालावा! मी कुठेही गेलो तरी नागपूरचाच होतो, आहे आणि राहीन! मुंबईत ‘वर्षा’ बंगल्यावर राहायला गेल्यावर पहिले मी काय केले, तर आख्ख्या मलबार हिलला नागपूरची कळा आणली!  आमच्या नागपूरकरांचे एक बरे आहे. नागपूरकराने नागपूरचे भले केले नाही तरी चालेल, पण बाहेर जाऊन झेंडे गाडले पाहिजेत, एवढाच त्यांचा आग्रह असतो. मी हे ब्रीद पाळले आहे. हेच हेरून मी माझ्या भाषणात ठणकावून सांगितले, की ‘मुंबई बदलून टाकीन, तेव्हाच नावाचा नागपूरकर!!’ कसल्या टाळ्या पडल्या! 
खरेच, मला मुंबईचा चेहरामोहरा बदलून टाकायचा आहे. इतिहासात अशी नोंद व्हावी, की एक नागपूरचा माणूस इथे येऊन पाचेक वर्षे (मलबार हिलवर) राहून गेला. त्यानं मुंबई बदलून दाखवली. जे मुंबईकरांना इतकी वर्षे जमले नाही ते एका नागपूरकराने ‘करुन दाखवले’!! नागपूरचे काय व्हायचे ते होवो. मुंबई बदलली पाहिजे, ही माझी प्रतिज्ञा आहे. नव्हे, तो माझा नव्या वर्षाचा संकल्प आहे.
अगदी प्रामाणिकपणाने सांगायचे तर मुंबई बदलून टाकणे हे मुंबईकराचे कामच नाही. बदललेल्या मुंबईत जगत राहणे, हे मुंबईकराचे काम असते. मुंबई बदलण्याचा पराक्रम आम्हा नागपूरकरांवर सोडावा! बघा, किती झपाट्याने मुंबई बदलेल ते! 
मुंबईतील वडापावची जागा वडाभाताने घ्यावी, हे माझे उराशी बाळगलेले जुने स्वप्न आहे. मिसळीचा महिमा संपून चनापोहाचा प्रसार व्हावा, ही माझी महत्त्वाकांक्षा आहे. मुंबईचा कायापालट हाच माझा खर्राखुर्रा (ह्यातील ‘खर्रा’ नागपूरचा हं!) संकल्प आहे...
आणखी पाचेक वर्षांनी मला मुंबईभूषण पुरस्कार मिळणार, ह्यात मला तरी काही शंका नाही! नाही!! नाही!! मग मी दिल्ली बदलायला जाईन म्हणतो! बघू, पुढचे पुढे!!
ता. क. : कालच्या नागभूषणमधील माझ्या भाषणानंतर आमचे परममित्र उधोजीसाहेब ह्यांचे लागोपाठ सोळा मिस्ड कॉल आले आहेत!! काय काम असेल? असो.

Web Title: bumbai ka dost