इंदिरा गांधींचा वारसा सांभाळता येईल?

मृणालिनी नानिवडेकर
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

इंदिरा गांधींच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे. कॉंग्रेसच्या भवितव्याची, जडणघडणीची चर्चा सुरू असताना इंदिराजींच्या नेतृत्वाचे स्मरण होणे स्वाभाविक आहे. नव्या नेतृत्वाने शिकण्यासारखेही खूप आहे.

भारताच्या राजकारणाचा गेली 100 वर्षे मुख्य स्वर राहिलेल्या कॉंग्रेसचे वर्तमान आणि (असलेच तर) भविष्य राहुल गांधी या आठवड्यात मुंबईत मुक्‍कामी होते. नरेंद्र मोदींनी निर्माण केलेल्या वावटळीत टिकून राहण्यासाठी किंवा अल्पसंख्याकांतील गमावत चाललेला जनाधार टिकवण्यासाठी सध्या कॉंग्रेसने "दिग्विजय डॉक्‍ट्रीन'ची कास धरली आहे. हिंदुत्ववादी संघटनांवर टीका करत धर्मनिरपेक्षतेची मोट बांधण्यावर या विचारधारेचा भर. निवडणूक प्रचारादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या टीकेमुळे राहुल गांधींना एका सामान्य व्यक्‍तीने न्यायालयात खेचले आहे. प्रथम या प्रकरणात माफी मागण्याचा राहुल गांधींचा इरादा असल्याचे सांगितले गेले; पण नंतर मात्र पक्षाला वैचारिक संघर्ष अधिकच गडद करायचा असल्याने रणनीतीचा भाग म्हणून राहुल गांधी यांनी या खटल्याला सामोरे जाण्याचे ठरवले. त्यासाठीच ते मुंबईत दाखल झाले होते. आजकाल त्यांच्या मुंबईतल्या मुक्‍कामाचे ठिकाण झाले आहे, बांद्रा कुर्ला परिसरात उभे राहिलेले क्रिकेट असोसिएशनचे संकुल. नोटांसाठी रांगेत उभ्या राहणाऱ्या हजारो नागरिकांच्या व्यथा राहुल यांनी पत्रकारांसमोर मांडल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार मल्ल्यांसारख्या बड्या उद्योगपतींना माफ करते आणि गरिबांना रांगेत उभे करते. "मी मोदींच्या पातळीवर जात नाही, त्यामुळे त्यांच्या मातोश्री पैसा काढण्यासाठी रांगेत का उभ्या राहिल्या, याचे विश्‍लेषण मी करणार नाही,' असे नमूद करण्यासही ते विसरले नाहीत. राहुल यांनी दुसऱ्या दिवशी मुंबई परिसरात फेरफटका मारला; पण या दौऱ्याला कुठेही प्रतिसाद नव्हता. भिवंडीपर्यंत जाणाऱ्या मार्गावर जागोजागी कमानी बांधून, मंच उभारून त्यांचे स्वागतही केले गेले; पण या सर्व प्रकारांत कुठेही आत्मा दिसत नव्हता. या दौऱ्यावर लक्ष ठेवून असलेल्या एका ज्येष्ठ पत्रकाराने फार मार्मिक टिप्पणी केली. नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राणाभीमादेवी थाटात केलेली कॉंग्रेसमुक्‍त भारताची घोषणा प्रत्यक्षात येईल काय माहीत नाही; पण इंदिरा गांधींच्या जन्मशताब्दी वर्षात महाराष्ट्रात आणि मुंबईत कॉंग्रेस संकटात आहे. सध्याची कॉंग्रेसची अवस्था पाहिल्यानंतर अनेक कॉंग्रेसजनांना इंदिरा गांधींच्या धडाडीची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

खरे पाहिले तर इंदिरा गांधींच्या जडणघडणीत महाराष्ट्राचा वाटा मोठा. त्या 13 वर्षांच्या असताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांना पुण्यात शिक्षणासाठी पाठवले. तीन वर्षे त्या पुण्यात वास्तव्याला होत्या. 13 ते 16 हे वय म्हणजे कुठल्याही व्यक्‍तीच्या घडण्याचा काळ. नेहरू त्यांना डेक्‍कनवरच्या दीक्षितांच्या इंटरनॅशनल बुक स्टॉलमधून पुस्तके आणण्याची सूचना पत्राद्वारे करत. तरुण वयातील या महाराष्ट्रसंबंधांबरोबरच इंदिरा गांधींच्या राजकीय कारकिर्दीतही महाराष्ट्राचे महत्त्वाचे स्थान होते. 1957 साली कॉंग्रेस पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीवर त्यांची निवड झाली. त्या महिलांशी त्या काळात अधिकाधिक संवाद साधू लागल्या. 58 साली त्या निवडणूक उमेदवार निश्‍चित करणाऱ्या समितीवर गेल्या. 59 साली ज्येष्ठ कॉंग्रेस नेते ढेबर यांनी गोविंद वल्लभ पंत यांच्या मागे लागून इंदिराजींना कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष केले. नेहरू यांनी पक्षाच्या एका कार्यक्रमात मी पंतप्रधान असताना माझ्या मुलीने अध्यक्ष असणे योग्य वाटत नाही, असे नमूद केले खरे; पण प्रत्यक्षात त्यांनी ही नेमणूक रद्द करायला लावली नाही. इंदिरा गांधी संघटनात्मक कार्यात रस तर घेऊ लागल्याच; पण थोड्याच काळात त्या पक्षातील महत्त्वाच्या निर्णयांवर प्रभाव टाकू लागल्या. हा काळ भाषावार प्रांतरचनेच्या पुरस्काराचा होता.

पंडित नेहरू यांच्या मनात महाराष्ट्राबद्दल आकस होता, असे त्यांचे विरोधक कायम नमूद करतात. त्यांच्या मनातले हे कंगोरे बोथट करण्यास इंदिरा गांधींनी हातभार लावला, असे मानण्यास जागा आहे. एक भाषक प्रदेशांचे एक राज्य व्हायला हवे या युक्तिवादाचा इंदिरा गांधी यांनी पुरस्कार केला. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी, ती भौगोलिकदृष्ट्या महाराष्ट्रात असणे योग्य; पण या महानगरात गुजराती बांधवांनी मोठी गुंतवणूक केलेली. मुंबईचा समावेश कोणत्या राज्यात व्हावा याबद्दल वाद सुरू झाले, तेव्हा इंदिरा गांधी पक्षाध्यक्ष नव्हत्या; पण वडिलांचे मन वळवायला त्यांनी मोठीच मदत केली असावी. स्व. यशवंतराव चव्हाण यांनी त्या काळात इंदिरा गांधींशी सतत संपर्क ठेवला. राहुल गांधींना ज्ञात असेल किंवा नसेल; पण शिवसेनेसह सर्व मुंबईकरांनी हे महानगर महाराष्ट्रात येण्यास इंदिरा गांधी काही अंशी कारणीभूत आहेत, हे समजून घ्यायला हवे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमित्ताने भारतातील विचारवंतांचे कमालीचे ध्रुवीकरण झाले आहे. बांगलादेश मुक्‍तीसंग्रामात रणरागिणी, जागतिक नेत्या ठरलेल्या या महिलेबद्दलही टोकाची मते व्यक्‍त केली जात. आणीबाणीच्या निर्णयानंतर इंदिरा गांधी पराभूत झाल्या. दरारा संपला, नशिबी अटकेचीही नामुष्की लिहिली गेली. जनता राजवट यशस्वी ठरणार नाही, हे लक्षात आले, त्या सुमारास बेलचीचा भाग तर इंदिरा गांधींच्या मदतीला आलाच; पण त्याचबरोबर 1980 च्या निवडणुकीत इंदिरा कॉंग्रेसने महाराष्ट्रात लक्षणीय जागा घेतल्या. देशाच्या प्रवाहातून पतीत झालेल्या इंदिरा गांधींना महाराष्ट्राने हात दिला. विदर्भात तर इंदिरा गांधींचे नाव घेऊन उभा केलेला कुणीही निवडून येईल असे वातावरण असे. इंदिराजींनी महाराष्ट्राच्या नेतृत्वाच्या चाचपणीची प्रयोगशाळा म्हणूनही वापर केला काय, असे मानायला जागा आहे.

महाराष्ट्रातील सहकार चळवळीला, विचार प्रवाहांना त्यांनी कायम पाठिंबा दिला. महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दलच्या आत्मियतेमुळेच त्यांनी आवर्जून परिधान केलेला नववारी साडीतला त्यांचा फोटो आजही अवघ्या राज्याच्या स्मरणात आहे. पंडित नेहरुंकडून इंदिरा गांधींना वारसाहक्‍काने नेतृत्व मिळाले असेलही; पण भारतीयांच्या मनावरही काही काळ त्यांनी अधिराज्य गाजवले, हे नाकारता येत नाही. त्यांचा संवाद थेट सर्वसामान्य लोकांशी होत असे. बायाबापड्या त्यांना इंदिराअम्मा म्हणजे आईच म्हणत. त्या बळावरच त्या आत्मविश्‍वासाने वाटचाल करत. धरसोड आणि दोलायमानता यापेक्षा कणखर आणि ठोस निर्णय क्षमता त्यांच्याकडे होती. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे. त्यांनी आत्मविश्‍वासाने आणि धडाडीने पक्ष वाढवला. आता हा पक्ष कायम विरोधी बाकावर चाचपडत बसेल की पुन्हा देशाचा मुख्य स्वर होईल ? महाराष्ट्रापुरते बोलायचे तर येथील जनतेवर तसाही पगडा कॉंग्रेसचाच. येथील भगवे राजकारण पुन्हा एकदा बदलेल का? या प्रश्‍नाचे उत्तर कॉंग्रेसला शोधावे लागणार आहे. इंदिराजींच्या नेतृत्व कौशल्याचे स्मरण त्यासाठी उपयोगी आणि प्रेरणादायी ठरू शकते, हे नक्की.

Web Title: Can we manage legacy of Indira Gandhi?