नाही जुमानत कर्कव्याधीला

naked mole rat
naked mole rat

मानवाच्या इतर व्याधींचे प्रमाण कमी झाले आणि जोडीनेच परिसर अधिकाधिक प्रदूषित होत गेला, तसा कर्करोग उफाळू लागला आहे. पण कर्करोगाला बिलकुल न जुमानणारा आठ-दहा सेंटिमीटर लांबीचा व तीस-पस्तीस ग्रॅम वजनाचा, एक छोटुकला प्राणी नुकताच सापडला आहे. आपल्याला अगदी तुच्छ भासणाऱ्या, आपण ज्यांना चिरडून टाकायला पाहतो अशा मूषक कुळातला. या बहाद्दराचे नाव आहे नेकेड मोल रॅट. हा विलक्षण प्राणी मुंग्या, मधमाश्‍यांप्रमाणेच समाजप्रिय आहे आणि जन्मभर एका मोठ्या परिवाराचा घटक म्हणून तो जगतो; पण नेकेड मोल रॅटच्या परिवारातले नर मुंग्या- मधमाश्‍यांच्या नरांप्रमाणे ऐदी नसतात; अगदी माद्यांच्या बरोबरीने ते परिवाराच्या सर्व जबाबदाऱ्या उचलतात. या मूषक परिवारात विसापासून तीनशेपर्यंत सदस्य असतात; त्यातले राजे-राणी सोडून इतर सदस्य आजन्म ब्रह्मचर्य पत्करत श्रमिकांची किंवा सैनिकांची भूमिका बजावतात. श्रमिक अन्न गोळा करतात, बिळाचा विस्तार वाढवत राहतात, पिलांची निगा राखतात, तर सैनिक हे परिवाराचे संरक्षण करतात. नेकेड मोल रॅट राणी इतर माद्यांहून आकाराने मोठी, पन्नास ग्रॅमपर्यंत वजनाची असते; केवळ तिच्याच देहात पुनरुत्पादन प्रेरक हॉर्मोन आढळतात.

ही राणी दोन-तीन नरांना प्रियकर म्हणून पसंत करते. इतर नावडते नर निमूटपणे काबाडकष्ट करत जगतात. नेकेड मोल रॅट इतर तेवढ्याच आकाराच्या मूषकांहून खूपच जास्त, तीस तीस वर्षे जगतात; त्यांची मादी जन्मभर तिच्या साजनांशी समागम करत पिले घालत राहते. राणीच्या मृत्यूनंतर उरलेल्या माद्यांत भांडणे जुंपतात; अखेर एक मादी यशस्वी होऊन माद्यांचे हार्मोन बनवायला लागते आणि नवी राणी बनते.

आफ्रिकावासी नेकेड मोल रॅट सगळा जन्म जमिनीखालच्या तीन ते पाच किलोमीटर लांब पसरलेल्या बिळांत, सुरणासारख्या मोठ-मोठ्या कंदांना वाढत राहून देऊन कुरतडत-कुरतडत खात व्यतीत करतात. त्यांच्यापुढचे मुख्य आव्हान असते बिळांतला प्राणवायूचा तुटवडा आणि अतोनात कार्बन डायॉक्‍साइड साचणे. याला तोंड देण्यासाठी नेकेड मोल रॅट ही सस्तन पशूंतील एकमेव थंड रक्ताची जात बनली आहे. प्राणवायूचा संपूर्ण अभाव असतानाही ते 18 मिनिटे आणि केवळ पाच टक्के प्राणवायू असलेल्या वातावरणात पाच तास जगू शकतात. अशा परिस्थितीत शरीरात आम्लाचे प्रमाण खूप वाढते; पण त्वचेत वेदनांचे संवेदन पूर्ण स्थगित असलेल्या नेकेड मोल रॅटना हे सहज सहन करता येते. संथ शरीरव्यापार चालवणाऱ्या नेकेड मोल रॅटची आयुर्मर्यादा त्यांच्या आकाराच्या इतर सस्तन पशूंच्या दसपट असते. या दीर्घायुष्याचे रहस्य शोधताना शास्त्रज्ञांना ते कर्करोगालाही बळी पडत नाहीत, असा शोध लागला आहे. हे कसे साधते?

कर्करोगाने पेशींचे भराभर विभाजन होऊ लागल्यावर त्यांची दाटीवाटी वाढते. नेकेड मोल रॅटच्या जनुक संचात पेशींची अशी दाटी झाल्यावर त्यांचे विभाजन थांबवणारे खास जनुक आढळले आहेत; हे आपले काम हायलुरोनान या साखरेसारख्या खूप मोठ्या आकाराच्या रेणूंचे प्रमाण भरपूर वाढवून करतात. शास्त्रज्ञांना जबरदस्त आशा आहे, की एक दिवस पेशींची दाटी झाल्यावर त्यांचे विभाजन थांबवणारे नेकेड मोल रॅटचे खास जनुक उचलून मानवाच्या जनुक संचात ठीक-ठाक बसवता येतील आणि आपणही कर्करोगमुक्त होऊ.

नव्वद वर्षांपूर्वी पेनिसिलिनचा शोध लागला आणि वैद्यकात एक प्रचंड क्रांती झाली. हे पेनिसिलीन आपल्याला एरवी टाकाऊ वाटणाऱ्या अशा एका बुरशीचे उत्पादन आहे. आता कदाचित काही वर्षांत अशाच आपल्या लेखी क्षुद्र उंदराच्या कृपेने आपण कर्करोगावर मात करू. इसापची एक कहाणी आहे. उन्हाळ्यात, एक सिंह आंब्याच्या थंड छायेत सुस्त निजला होता; तेथे त्याला उंदरांनी फार सतावले. त्यामुळे जागा होऊन, त्याने पंजात एक उंदीर धरला आणि त्यास फाडून टाकणार इतक्‍यात, त्या उंदराने त्याची प्रार्थना केली, "आपण थोर, सर्व श्वापदांचे राजे, मी आपल्यापुढे केवळ रंक, माझ्या रक्ताने आपले हात विटाळू नयेत. मला जीवदान द्यावे, हेच आपणास उचित आहे.' ते ऐकून सिंहास त्याची दया आली आणि त्याने त्यास सोडून दिले. पुढे एके दिवशी सिंह अरण्यात फिरत असता, त्याच आंब्याजवळ पारध्याने जाळे मांडले होते, त्यात तो सापडला. त्या वेळी त्याने आपले सगळे बळ खर्चून फार धडपड केली. पण त्याची सुटका होईना. तेव्हा तो निराश झाला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला. ते ओरडणे ऐकून तो उंदीर त्या ठिकाणी आला आणि सिंहास म्हणाला, "राजा,भिऊ नको, स्वस्थ बस.' इतके बोलून, त्याने आपल्या दातांनी ते जाळे कुरतडले व सिंहाची सुटका केली. इसाप तात्पर्य सांगतो ः जे मोठे आहेत त्यांचेही एखादे मोठे काम लहानाच्या हातून, एखादे वेळी होते. यासाठी कोणास क्षुद्र समजून त्याचा उपहास करू नये किंवा त्यास दुखवू नये. लहानाच्या हातूनही उपकार होऊ शकतात, हे लक्षात ठेवावे.
पृथ्वीतलावर आपल्याबरोबर ज्यांच्याबद्दल आजपावेतो काहीही अभ्यास झाला नाही अशा अगणित, निदान पन्नास लाख जीवजाती नांदताहेत. आज आपण पृथ्वीला ओरबाडत, खणत- खोदत, विष पेरत त्यांचा नायनाट करण्यात मग्न आहोत. पण इसाप म्हणतो त्याप्रमाणे लहानांच्या हातूनही थोरांचे मोठे काम होऊ शकते, हे श्वापदांचे राजे बनलेल्या मानवांनी लक्षात ठेवणे शहाणपणाचे आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com