राजधानी दिल्ली : पाच निवडणुका, एकच चेहरा!

modi
modi

विधानसभांच्या निवडणुकांमधील निकाल हे केंद्र सरकारच्या कामगिरीचे मूल्यमापन दर्शवितात काय, हा प्रश्‍न राजकीय पंडितांमध्ये नेहमीच चर्चिला जात असतो. केंद्रात सत्तारूढ असलेला पक्ष संबंधित राज्यात किंवा राज्यांमध्ये निवडणूक लढवीत असेल तर अंशतः का होईना, त्या पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कामगिरीबद्दलच्या जनभावनेचे प्रतिबिंब निकालात पडू शकते. परंतु तो केंद्र सरकारबद्दलचा कौल ठरु शकत नाही. याचे कारण शेवटी ज्या राज्यात विधानसभा निवडणूक होत असते, त्या राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले स्थानिक मुद्देही निवडणुकांत महत्त्वाचे ठरतात व निकालात प्रतिबिंबित होतात. गेल्या काही वर्षांपासून व्यक्तिकेंद्रित राजकारणाचे पुनरुज्जीवन झाले असल्याने केंद्रस्थानी असलेल्या नेतृत्वाच्या नावाने मते मागण्याचे, व्यक्तिमाहात्म्य व व्यक्तिस्तोम वाढविण्याचे प्रकार सुरु झाले आहेत. इंदिरा गांधी; काही प्रमाणात राजीव गांधी यांच्या काळात व्यक्तिस्तोमावर आधारित राजकारण प्रचलित होते व आता त्याचे गेल्या काही वर्षांपासून पुनरुज्जीवन करण्यात आले आहे.

आसाम, केरळ, पुद्दुचेरी, तमीळनाडू आणि पश्‍चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. पाच राज्यात मिळून विधानसभेच्या ८२४ जागांसाठी निवडणूक होणार आहे. पश्‍चिम बंगाल(२९४), तमीळनाडू(२३४), केरळ(१४०), आसाम(१२६) आणि पुद्दुचेरी(३०). या पाच राज्यात मिळून लोकसभेच्या ११६ जागा आहेत. लोकसभेच्या एकंदर जागांपैकी जवळपास एक-पंचमांश किंवा त्याहून किंचित कमी जागांसाठी निवडणूक होत आहे. आसामात सध्या भाजपच्या नेतृत्वाखाली संयुक्त सरकार सत्तारूढ आहे. अन्य चार राज्यांमध्ये बिगर-भाजप व विरोधी पक्षांची सरकारे सत्तेत आहेत. कोणत्याही राजकीय पक्षाला संपूर्ण भारत देश आपल्याच पक्षाच्या छत्राखाली असावा, अशी महत्त्वाकांक्षा असण्यात गैर काही नाही. एकेकाळी कॉंग्रेस पक्षाची स्थिती अशीच होती. परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो काळ होता आणि विरोधी पक्षदेखील अस्तित्वात येण्यासाठी प्रयत्न करीत होते. त्यावेळच्या सत्ताधारी पक्षाने म्हणजेच कॉंग्रेसने "विरेधी पक्ष-मुक्त' भारताचे एकसुरी आणि अतिरेकी उद्दिष्ट बाळगलेले नव्हते. सध्या विरोधी पक्ष-मुक्त भारतासाठी प्रयत्न नव्हे तर जाणीवपूर्वक व योजनाबद्ध रीतीने पावले टाकली जात आहेत, जी बाब संसदीय लोकशाहीच्या मुळावर येणारी आहे. एखाद्या राज्यात विरोधी पक्षाचे सरकार असणे हा भारतीय विविधतेचा आविष्कर आहे. परंतु संपूर्ण भारताला एकरंगी करण्याच्या महत्त्वाकांक्षेने पछाडलेल्यांना विविधता मान्य नसल्याने कोणतीही निवडणूक ही मतपेटीची स्पर्धा न मानता युद्ध मानून लढण्याचा आणि विरोधी पक्ष हे शत्रू असल्याचे मानण्याचा एक नवा प्रकार अस्तित्वात आलेला आहे.

पश्‍चिम बंगालला प्राधान्य

भाजपने आपल्या सत्ताविस्तारासाठी पश्‍चिम बंगालला सर्वोच्च प्राधान्य दिलेले आहे. त्याचप्रमाणे पुद्दुचेरी या छोटेखानी व केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा स्थानिक पक्षाच्या मदतीने काबीज करुन दक्षिणेत आणखी एक लहानसे राजकीय पाऊल पुढे टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. केरळ व तमीळनाडूमध्ये सत्तेत येण्याची शक्‍यता नसली तरी संख्याबळ, काही जागा जिंकणे आणि मतांची टक्केवारी वाढविणे हे सर्वसाधारण उद्दिष्ट पक्षाने मनाशी बाळगले आहे. पश्‍चिम बंगालबद्दल भाजपला विशेष ममत्व निर्माण झाले आहे. त्यासाठी योजनापूर्वक रीतीने त्यांनी पश्‍चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक आठ तुकड्यात किंवा टप्प्यात विभागलेली आहे. एकंदर ८२४ विधानसभा मतदारसंघांत व पाच राज्यांत होणाऱ्या निवडणुकीच्या वेळापत्रकावरुनच सत्तापक्षाचे मनसुबे लक्षात येतील. ८२४ पैकी ४८१ विधानसभा मतदारसंघात एकाच दिवशी म्हणजे ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यामध्ये तमीळनाडू(२३४), केरळ(१४०), पुद्दुचेरी(३०) या तीन राज्यांचा समावेश आहे. यात आसाममधील ४७ व पश्‍चिम बंगालच्या ३० पहिल्या टप्प्यातील मतदारसंघांचा समावेश केल्यास एकंदर ४८१ जागा होतात. आसाममध्ये तीन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. थोडक्‍यात पश्‍चिम बंगालमध्ये

सत्ताविस्तारासाठी आखलेला डाव

या पाच राज्यांमधील स्थानिक मुद्दे हे वेगवेगळे राहणे नैसर्गिक आहे. परंतु देशपातळीवरील घडामोडींचा प्रभावही या निवडणुकांवर राहणार आहे. यामध्ये महागाई, पेट्रोल-डिझेल-स्वयंपाकाचा गॅस यांची असह्य दरवाढ हे मुद्दा महत्त्वाचे ठरतील. याखेरीज राम मंदिर उभारणी, नागरिकत्व दुरुस्ती कायदा उर्फ "सीएए', राष्ट्रीय नागरिक नोंदणीपुस्तक किंवा "एनआरसी' हे मुद्देही मतदानावर परिणाम करतील. करोना साथीच्या हाताळणीचा मुद्दा राज्यवार स्थानिक पातळीवरील सरकारशी संबंधित राहील, असे अपेक्षित आहे. आसाम आणि पश्‍चिम बंगाल या राज्यांसाठी "सीएए' व "एनआरसी'

हे मुद्दे ठरतील महत्त्वाचे

तमीळनाडू हे भाजपच्या दृष्टीने आणखी एक प्रमुख "लक्ष्य'. परंतु तेथील राजकारणावर असलेला द्रविडी विचारसरणीचा प्रभाव कमी होताना आढळत नसल्याने भाजपची अडचण होत आहे. भाजपने रजनीकांत यांच्यामार्फत तेथील राजकारणात शिरकाव करण्याचा केलेला प्रयत्न फसला. त्यामुळे आता अण्णा द्रमुकबरोबर आघाडी करुन आणि त्यांनी दिलेल्या जागा (३०) स्वीकारुन त्यांच्याबरोबर राहणे आणि त्यांचे सरकार आल्यास मागील आसनावर बसून ते चालविणे यात पक्षाला तूर्तास समाधान मानावे लागेल. अर्थात यावेळी द्रमुकचा आलेख चढता असल्याचे मानले जाते आणि त्यामुळेच एकंदर अण्णा द्रमुकच्या विजयाची फारशी आशा नसल्याने तुरुंगातून सुटलेल्या अण्णा द्रमुकच्या नेत्या व जयललितांच्या सहकारी शशिकला यांनी राजकारण संन्यासाची घोषणा केलेली आहे, असे सांगण्यात येते. पराभूत अण्णा द्रमुक पक्ष एकत्र ठेवण्यासाठी त्या पक्षाचे नेते शशिकला यांच्या दरबारातच येतील आणि त्यानंतर तो पक्ष पूर्णत्वाने काबीज करायचे त्याचे मनसुबे आहेत. त्यांच्या साथीला त्यांचे महत्त्वाकांक्षी भाचे टीटीव्ही दिनकरण पण आहेतच. त्यांची ही राजकीय खेळी कितपत यशस्वी होते, ते पाहायचे.

मिथुनची एन्ट्री

केरळमध्येदेखील केंद्रातील सत्तापक्ष भाजपला पाय रोवण्यासाठी धडपड करावी लागत आहे. केरळमधील नारायण गुरु संप्रदाय किंवा तत्सम संस्था-संघटनांच्या माध्यमातून तसेच रा.स्व.संघाच्या माध्यमातून भाजपने गेली अनेक वर्षे केरळमध्ये प्रवेश करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. त्याला म्हणावे तसे यश मिळालेले नाही. या निवडणुकीच्या निमित्ताने त्यांनी ‘कोकण रेल्वे’चे निर्माते आणि भारतात "मेट्रो-मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ई.श्रीधरन यांना पक्षात निमंत्रित करुन त्यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार करण्याचा खटाटोप चालू केला आहे. श्रीधरन यांचे वय ८९ आहे आणि त्यामुळेच भाजपला अद्याप केरळमध्ये सुयोग्य चेहरा मिळत नसल्याचे स्पष्ट होते.

आसाममध्ये भाजपचे सरकार आहे आणि भाजपचे मुख्यमंत्री तेथे असल्याने तेथे चेहऱ्याचा प्रश्‍न निर्माण झालेला नाही. परंतु ज्या पश्‍चिम बंगालमध्ये सत्तेसाठी भाजप आसुसलेला आहे तेथेदेखील पक्षाकडे ममता बॅनर्जी यांना आव्हान देणारा चेहरा किंवा नेता नाही. क्रिकेटपटु सौरव गांगुली यांना भाजपने भरपूर सांकडे घातल्याचे समजते; परंतु अद्याप त्याबाबत काही प्रगती झालेली नाही. गांगुली गळाला लागले नसले तरी मोहन भागवतांच्या सांस्कृतिक संपर्क मोहिमेमुळे अभिनेते मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये सामील झाले आहेत. त्यांची उपयोगिता लवकरच कळेल. थोडक्‍यात भाजप या निवडणुकाही पंतप्रधानांच्या चेहऱ्याने व त्यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचे स्पष्ट झाले आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com