चलो ओडिशा! (ढिंग टांग)

dhing tang
dhing tang

आजची तिथी : हेमलंबीनाम संवत्सर, श्रीशके 1939 चैत्र कृष्ण पंचमी. 
आजचा दिवस : ओडिशात! 
आजचा वार : संडेवार! 
आजचा सुविचार : संडे हो या मंडे, कभी न खाओ रसगुल्ला!! (यमक नंतर जुळवू...) 

नमो नम: नमो नम: नमो नम: (एकशेपाच वेळा मोठ्यांदा म्हणणे...) महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ओडिशात मुख्यमंत्र्यासारखाच हिंडतो आहे, ह्याचे संपूर्ण श्रेय आमचे गुरुवर्य श्रीश्री नमोजी ह्यांनाच द्यावे लागेल. शनिवारी एअर इंडियाच्या विमानाने भुवनेश्‍वरला सुरक्षित पोचलो. सेफ्टी बेल्ट लावला होता, आणि पायात सॅंडलऐवजी बूट घातले होते. मी फार सावध आणि निर्मोही स्वभावाचा आहे, त्याचेच हे द्योतक. भुवनेश्‍वरच्या जनता मैदानात आमच्या कमळ पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. त्यासाठी येथे ऑफिशियली आलो. ऑफिशियली एवढ्याचसाठी म्हटले, की परवा अहमदाबादला अनऑफिशियली (पक्षी : वेष बदलून) गेलो होतो, तरी लोकांनी ओळखले! अर्थात, ती चूक माझी नव्हती. रात्री दहा वाजता नवाकोरा कोट घालून कुणाच्या घरी जाऊ नये, हे आमच्या शेजारच्या राणेदादांना कोण सांगणार? जाऊ दे. 


भुवनेश्‍वरच्या विमानतळावर स्वागतासाठी प्रचंड गर्दी जमलेली पाहून मी हरखूनच गेलो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे केवढे जंगी स्वागत! माझी मराठी छाती अभिमानाने भरून आली. पिकते तिथे विकत नाही, हेच खरे. मुंबईत (आम्हाला न्यायला आणायला) फक्‍त एक मोटार येते!! पण तेवढ्यात मागोमाग अमितशहाजी आले, सगळी गर्दी त्यांच्यामागे धावली. शेवटी मी एकटाच एका मोटारीत बसून जनता मैदानात गेलो, झाले! 
''2019च्या निवडणुका आपण सगळ्यांनी श्रीश्री नमोजी ह्यांच्या नेतृत्वाखालीच लढायचा संकल्प करूया!'' असा प्रस्ताव मी भर सभेत मांडला. वास्तविक ह्या प्रस्तावात काहीही नवीन नव्हते. पण आमच्या लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. नमोजींचे नाव घेतल्यावर टाळ्या वाजवल्या नाहीत, तर माणसाला नरकवास प्राप्त होतो, अशी आमच्या लोकांची काहीतरी समजूत झाली आहे. त्यात तथ्यही असावे!! ते काहीही असो, हा प्रस्ताव ठेवण्याचा मान मला मिळाला, ह्यातच मला भरून पावले!! (पोट भरले, असे म्हणण्यात अर्थ नाही. भोजन राहिले होते...) जळणारे जळतात, त्यांचे काय एवढे मनावर घ्यायचे? माझ्यासारख्या तरुण मुख्यमंत्र्याला हा मान मिळाल्याचे पाहून बाकीच्या राज्यांचे मुख्यमंत्री मात्र खट्‌टू झाले. (शिवराजजी चौहानजींनी तर नंतर जेवणाच्या मांडवात माझ्या पाठीवर इतक्‍या जोरात थाप मारली, की हातातल्या प्लेटमधली छेना झिल्ली, आणि आठ-दहा रसगुल्ले समोरच्या रमणसिंहजींच्या अंगरख्यावर उडाले!!) भाषणानंतर मी इकडे तिकडे पाहत असतानाच, एका कार्यकर्त्याने 'भोजनाची व्यवस्था पलीकडच्या मांडवात आहे' असे माझ्या कानात (उगीचच) सांगितले. मला भूक लागली की ती चेहऱ्यावर दिसते की काय? छे!! इतकी पारदर्शकताही बरी नव्हे!! मी विमानात थोडे खाल्ले आहे, असे गुळमुळीत बोलून पलीकडे गेलो... 


बुफेच्या लायनीत प्लेट घेऊन उभे असताना अचानक गडबड उडाली. भोजनकक्षाच्या क्षितिजावर साक्षात योगीजी आदित्यनाथजी उगवले! 'पूरबसे सूर्य उगा, जगा उजियारा... 'अशी ओळ मनात चमकून गेली. मांडवात योगीजी त्यांच्या तेजाने तळपत होते. 

माझ्याकडे बघून किंचित हसले. मी अजिबात हसलो नाही. ह्या योगीजींमुळे महाराष्ट्रात भांडणे लागली, हे मी विसरू शकत नाही. कमंडलूतले पाणी शिंपडावे, तितक्‍या सहजतेने ह्यांनी यूपीच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊन टाकली. आमची पंचाईत झाली. यूपीच्या कर्जमाफीच्या योजनेचा अभ्यास चालू आहे, असे सांगून वेळ टाळली आहे, एवढेच. 
भोजनाच्या 'मेनू'मध्ये लक्ष घातले. रसगुला, घुगनी, पोडा पिठा, कच्च्या फणसाची कढी, साग मुगा, बटाटा डोलमा, छेना तरकारी, दही भिंडी, झालेच तर रसगुल्ला, खिरी, रसबाली... मी मेनू बघत होतो. 
तेवढ्यात योगीजी कानाशी येऊन पुटपुटले,- 'कैसे चल रहा है अभ्यास?'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com